Thursday, September 4, 2014

अंडकोष

 शहरांत रोज होणार्‍या हजारो अपघातांसारखच त्या गाडीचा अपघात झाला. बहुतांश अपघातांप्रमाणेच इथेही चालवणार्‍याचीच चूक होती आणि त्याचाच मृत्यु. त्याच्या मागे बायको आणि दोन मुलं. नशिबाने ती वाचली. अ‍ॅम्बुलंस आली, आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण काही उपयोग झाला नाही. शरीर छिन्नविछिन्न झालेलं होतं, मेला ते एका अर्थी बरंच झालं.

आणि मग तू मला भेटलास.

"काय.. काय झालं? कुठे आहे?, भेदरून जाऊन तू विचारलंस.

"तू मेला आहेस" मी शांतपणे सांगितलं, उगाच शब्दांना सोन्याचा मुलामा देण्यात काय अर्थ होता?

"माझ्या समोर तो ट्रक अचानकच आला... मी कचकाऊन ब्रेक मारला..."

"हो" मी म्हणालो.

"मी .. मी मेलोय ??"

"हो. वाईट वाटून घेऊ नकोस, सगळेच कधी ना कधी मरतात."

तू आजूबाजूला बघितलंस .. नुसतीच पोकळी. रंगहीन, गंधहीन, भकास.  तिथे फक्त तू आणि मी, दोघंच. "मी कुठाय मग? हे मृत्युनंतरचं जग? स्वर्ग की नरक?"

"ते अजून ठरायचंय" मी म्हटलं.

"तू कोण आहेस? देव... परमेश्वर??" तू संभ्रमीत होऊन विचारलंस.

"हो" मी म्हणालो "तुम्ही ज्याला देव म्हणता तो मीच आहे"

"माझी मुलं.. माझी बायको .."

"त्यांचं काय? " मी विचारलं.

"ते सर्व सुरक्षित आहेत ना? त्यांचं सगळं नीट होईल ना?" काळजीच्या सुरात तू विचारलंस.

"मला तुझं हेच वागणं आवडतं." मी म्हणालो "तू नुकताच मेला आहेस. पण तुला मुख्य काळजी तुझ्या कुटूंबियांची.  चांगली गोष्ट आहे."

तू माझ्याकडे पाहिलंस, तुझी नजर मला जोखत होती. तुझ्या मनात जसं देवाचं चित्र असतं तसा मी अजिबातच नव्हतो. विराटरूप वगैरे सोडा, मी तर अगदीच साधा दिसत होतो. एखाद्या शाळामास्तरासारखा.

"काळजी करू नकोस, सगळं ठिक होईल त्यांचं" मी म्हणालो "तुझ्या मुलांना तुझी आठवण एक प्रेमळ बाप अशीच राहिल. ती अजून लहानच असल्यामुळे तुझ्याविषयी त्यांना प्रेमच वाटत होतं, आणि आता तुला त्यांचं प्रेम टिकवण्यासाठी काहीच करण्याची गरज नाही. त्यांच्या तुझ्याकडनं कुठल्याच अपेक्षा नसल्याने आता तू त्यांचा अपेक्षाभंगही करू शकणार नाहीस. तुझी बायको रडेल चार दिवस आणि मग तिच्या जगात रमून जाईल. खरं तर ती मनातून थोडी सुखीच होईल. तुमचं लग्न फार काळ टिकणार नव्हतंच. पण तरीही मनातून होत असलेल्या थोड्या समाधानाचीच तिला शरम वाटत राहिल."

तू गप्प होतास. तुलाही हे नवं नव्हतंच.

"मग पुढे काय? मी स्वर्गात जाणार की नरकात" तू विचारलंस.

"कुठेच नाही, किंवा आपण असं म्हणू की ते तूच ठरवायचं आहेस. तुला पुनर्जन्म मिळेल"

"काय? माझा पुनर्जन्म वगैरे थोतांडावर कधीच विश्वास नव्हता.. म्हणजे ते हिंदू धर्मात सांगीतलं आहे ते बरोबर आहे तर!" काहिश्या नाराजीनेच तू म्हणालास.

"माझा जेव्हा पुनर्जन्म होईल, मी पुन्हा कोर्‍या पाटीसारखाच असेन ना? छोटं बाळ? मी आजवर जे आयुष्य जगलो, पैसे कमावले, वेगवेगळे अनुभव घेतले, ते सर्व वायाच गेलं!" तू थोडा हताश होत म्हणालास.

"नाही, तुला आजवर आलेले सगळे अनुभव तुझ्या जवळ सुरक्षित आहेत. फक्त तुला ते आत्ता आठवत नाहीयेत."

काही न कळल्याने तू नुसतंच माझ्याकडे पाहीलंस,

मी आपुलकीने तुझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, "तुझा आत्मा ही अजब गोष्ट आहे. सर्वात सुंदर आणि तितकीच क्लिष्ट. तू कल्पनाही करू शकणार नाहीस अशी. तुझं मन हे तुझ्या आत्माच्या एक सहत्रांशा इतकाही भाग साठवू शकत नाही. म्हणजे बघ, आंघोळ करण्या आधी बादलीतलं पाणी गार आहे की गरम हे समजण्यासाठी बादली अंगावर ओतण्याची गरज नसते, एक बोट जरी पाण्यात बुडवलंस तरी त्या पाण्याची अनुभूती तुला होते. तुझ्या बुद्धीचा वापर करून तू त्या पाण्याच्या उष्णतेचा अनुभव घेऊ शकतोस. तशीच मनाचा वापर करून तू आत्म्याची अनुभूती घेऊ शकतोस."

"तू गेले चौतीस वर्ष मानव रूपात पृथ्वीवर होतास, म्हणून तूला आधीचे आठवायला पुरेसा वेळ मिळाला नाही. जर आजून काही वर्षं जगला असतास तर कदाचीत तुला तुझीच ओळख पटली असती."

"म्हणजे...आजवर मी कितीवेळा असा पुनर्जन्म घेतलाय?"

"कित्येक वेळा, आणि प्रत्येक वेळा मानवाचाच नव्हे तर पशु, पक्षी आणि झाडांचा सुद्धा" मी शांतपणे म्हणालो, " ह्या वेळी तू हजार वर्षापूर्वीच्या एका गरीब चिनी शेतकर्‍याची मुलगी म्हणून जन्म घेशील"

"का.. काय? तू मला पुन्हा भूतकाळात पाठवतो आहेस? मी भूतकाळात जन्माला कसा.." चक्राउन तू विचारलंस.

"हो. एका अर्थी तुझं बरोबरच आहे. तुझ्या दृष्टीने काळ हा फक्त पुढेच जातो.  एखाद्या नदीत पडलेल्या पानाप्रमाणे तू उलटा प्रवास करू शकत नाहीस. माझं तसं नाही. मी काठावर उभा आहे. माझ्यासाठी काळ स्थिर आहे. म्हणून मी मागे किंवा पुढेही जाऊ शकतो."

"पण जर मी भूतकाळातही असेन तर मीच मला कधीतरी भेटू शकतो.. हे कसं शक्य आहे?" अजूनही तुझा विश्वास बसत नव्हता.

"भेटू शकतो नव्हे, भेटतोच. अगदी नेहमी. पण तुला ते कळतही नाही कारण तुझा प्रत्येक जीवन काल दुसर्‍यापासून वेगळा आहे"    

"मग ह्या सगळ्यला काय अर्थ आहे?" तू त्रासून विचारलंस

"तोच तुला शोधायचा आहे. त्यासाठीच तुझा हा आटापिटा चालला आहे. किंबहुना जन्ममृत्यूचा उलगडा व्हावा म्हणूनच हे विश्व निर्माण केलं आहे मी. तूझी प्रगती व्हावी, तुला आत्मज्ञान मिळावं म्हणून."

"माझी म्हणजे .. मानवजातीची? तू मानवजातीच्या प्रगतीसाठी हे विश्व निर्माण केलं आहेस?" गोंधळून तू विचारलंस.

"नाही, फक्त तुझ्यासाठी. प्रत्येक जन्ममृत्युच्या फेर्‍या नंतर तू अजून मोठा होतो आहेस, ज्ञानी होतो आहेस."

"फक्त माझ्यासाठी? का? मग बाकीच्यांचं काय?" पुन्हा गोंधळून तू विचारलंस.

"बाकी कोणीच नाही." मी म्हणालो. "ह्या विश्वात फक्त आपण दोघेच आहोत. तू आणि मी."

या शब्दांचा अर्थ शोधत असल्याप्रमाणे तू थोडावेळ गप्प राहिलास. मग माझ्याकडे बघून पुन्हा विचारलंस "पण मग पृथ्वीवरचे सगळे लोक..."

"तूच आहेस." तुला मधेच थांबवत मी म्हटलं. "तुझेच वेगवेगळे जन्म. तुझीच वेगवेगळी रुपं"

"म्हणजे.. मीच आहे सगळीकडे ?" स्वतःशीच विचार करत तू म्हणालास.

"बरोबर!" खांद्यावर थाप मारत मी आनंदाने म्हणालो, "आता कळतंय तुला!"

"पृथ्वीवरचा प्रत्येक जीव म्हणजे मीच?"

"वर्तमानातला, भूतकाळातला आणि भविष्यातला सुद्धा"

"म्हणजे मी गांधी, मी शिवाजी? मी करोडपती, मीच  भिकारी?" अविश्वासाने तू विचारलंस

"हो"

"मी हिटलर सुद्धा?" पुन्हा तू विचारलंस.

"आणि ज्या लोकांचा त्याने छळ केला तेसुद्धा तूच."

"मी राम, कृष्ण आणि बुध्द ?"

"आणि त्याचे शेकडो हजारो अनुयायी."

तू शांत झालास.

"जेव्हा जेव्हा तू दुसर्‍या जीवाला त्रास दिलास तो तू स्वतः स्वतःलाच देत होतास. तू आजवर जितक्या लोकांना मदतीच हात दिलास ती मदत तू स्वतःलाच करत होतास."

"का" तू मला विचारलंस "कशासाठी हे सगळं मायाजाल?"

"कारण एके दिवशी तू माझ्यासारखा होशील. कारण मूळात तूही माझ्यासारखाच आहेस. एकमेवाद्वितीय."

"थांब थांब.. मी तुझ्यासारखा होईन? मी ईश्वर होईन ?" पुन्हा अविश्वास.

"अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे तुला. तुझी वाढ अजून पूर्ण व्हायची आहे. एकदा का तू सर्व आयुष्य जगून काढलीस की तुझा खर्‍या अर्थाने जन्म होईल."

"म्हणजे एक विश्व म्हणजे .. " तू म्हणालास "विश्व म्हणजे एक .. "

"एका प्रकारे हे विश्व्  म्हणजे अण्डकोष ..." मी उत्तरलो "चल आता तुला जायला हवं"

आणि तू तुझ्या मार्गावर पुन्हा चालू लागलास.

(समाप्त)

(अँडी वेर यांच्या "अ‍ॅन एग" ह्या कथेचा स्वैर अनुवाद)


Tuesday, July 10, 2012

विश्वास (भाग - १)


सुमेधा रंगपटात आली तरी प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट चालूच होता. आज तिच्या नाटकाचा पन्नासावा प्रयोगही हाऊसफुल होता.

"एक्सिलंट ! माइंड ब्लोइंग परफॉर्मंस !!' टाळ्या वाजवतच रमेश आत आला. थकल्या चेहर्‍यावरचा मेकप पुसता पुसता आरशातूनच तिनं रमेशकडे पाहिलं. रमेशचा फ्रेश हसरा चेहरा पाहून तिचा सगळा थकवा कुठल्याकुठे पळून जात असे.

रमेशचा स्वभावही असाच होता. त्याच्या सहवासात आल्यावर क्षणभरातच तो कोणालाही आपलंस करून घेत असे. रमेश म्हणजे सुमेधाचा जुना मित्र. अगदी कॉलेजमधे असल्यापासून. कॉलेजमेधे त्यांचा मोठा ग्रूप होता. रमेश त्या ग्रूपचा प्राण. सुमेधाच काय पण कॉलेजमधल्या यच्चयावत पोरी त्याच्यावर फिदा असायच्या. पण अर्थात त्यावेळी कॉलेजमधल्या फटाकड्या पोरींच्या गर्दीतून त्याचं लक्ष सुमेधाकडे फारसं कधी गेलंच नव्हतं. यथावकाश कॉलेज संपलं, आणि बहुतेक वेळेला होतं त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात गुरफटत गेला. सुमेधा तिच्या उपजत अभिनयकौशल्यामुळे नाटकांतून कामं करू लागली. अगदी थोड्याच वर्षांमधे एक यशस्वी अभिनेत्री म्हणून सुमेधा नावारूपाला आली. रमेश कुठल्याश्या कंपनीत कारकूनी करत असल्याचं तिच्या कानावर आलं होतं. पण दोन वर्षांपूर्वी जेव्हा रमेश अचानक तिच्या घरी आला तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला. रमेशला तर प्रथम तिनं ओळखलंही नाही. दाढी वाढलेली, खप्पड गाल, एकेकाळचा हसरा गोड चेहरा पार काळवंडून गेला होता. चौकशी केल्यानंतर रमेशची नोकरी जाऊन जवळ जवळ एक वर्षं झालं होतं. दुर्दैवाने कुठेच नोकरी मिळत नव्हती. जवळचे असे कोणते नातेवाईक त्याला नव्हतेच पण जे होते त्यांनीही पाठ फिरवली होती. एके काळचे दोस्त आता ओळखही दाखवत नव्हते. अशा वेळी एका नाटकाच्या पोस्टरवर सुमेधाचं चित्र बघून त्याला तिची आठवण झाली आणि तिला भेटायला तो आला. सुमेधाने त्याची सगळी हकीकत ऐकली. सुमेधाच्या आईने त्याला खाउ-पिऊ घातलं. सुमेधाला त्याची अवस्था बघवली नाही आणि तिच्या मॅनेजरची जागा रमेशला मिळाली. तेव्हापासून रमेश तिच्या सोबत सावली सारखा राहू लागला होता. तिच्या प्रत्येक छोट्यात छोट्या गरजांची मनापासून काळजी घेत होता.

"दमलीस ?" रमेशने हळूवारपणे तिच्या डोक्यावर थोपटत विचारलं.

"थोडं पाणी देतोस?" रमेशने तत्परतेने तिला थंड पाण्याची बाटली दिली. दमल्यानंतर थंड पाण्याच्या एखाद्या ग्लासाने तिचं कधीच समाधान व्हायचं नाही. सरळ थंड पाण्याची बाटलीच तोंडाला लावायची तिची सवय. तिच्या अशा सगळ्या सवयी रमेशला आतापावेतो चांगल्या माहित झाल्या होत्या.

"आज खरंच खूपच छान काम झालं तुझं. शेवटच्या सीन मध्ये घाबरून थरथर कापतानाचा तुझा अभिनय तर इतका अप्रतिम होता की मलासुद्धा क्षणभर वाटलं की तू खरोखरच घाबरली आहेस की काय!" रमेश तिच्या जवळ बसत म्हणाला.

"रमेश...मला... " सुमेधाने वाक्य पूर्ण केलं नाही.

"काय गं? काय झालं? काही होतंय का?" रमेशने विचारलं

"रमेश, तुला आज तो पहिल्या रांगेत कोपर्‍यात बसलेला माणूस आठवतोय?"

"कोणाविषयी म्हणते आहेस?"

"अरे तो दाढीवाला? काळ्या रंगाचे कपडे घातले होते आणि डोळ्यांना मोठ्या फ्रेमचा चष्मा लावला होता तो?" सुमेधाच्या आवाजात भिती डोकावत होती.

"नाही गं. मला असा कोणी प्रेक्षकांत बसलेला आठवत नाहीये. काय झालं त्याचं?"

"मला.. मला त्या माणसाची फार भिती वाटत होती रे" सुमेधाच्या डोळ्यात पाणी उभं राहीलं.

"ए वेडाबाई, घाबरायला काय झालं? अगं आज पहिल्यांदा का तू दाढीवाला माणूस बघते आहेस? आजवर इतक्या प्रेक्षकांच्या पुढे इतक्या सगळ्या नाटकांमधून कामं केली आहेस तू. आजच असं का होतंय?"

"मी त्याला आधीपण पाहिलं आहे!"

"कुठे?"

"मागच्या आठवड्यात आपला नाशिक दौरा होता. तेव्हा तिथेही तोच माणूस होता!"

"काय सांगतेस काय? पण असेल कोणीतरी तुझा चाहता! त्यात घाबरण्यासारखं काय आहे?" रमेश स्वतःलाच समजावल्यासारखा बोलत होता.

"ह्म्म.. खरं आहे तू म्हणतो आहेस ते. जाऊ दे, आज मी खरंच खूप दमलेय. आज मला घरी सोडशील?" रमेशच्या चेहर्‍यावर काळजी बघून सुमेधा मनातल्या मनात सुखावली होती. 'रमेशला कोणतीही गोष्ट फार जास्त सिरियसली घ्यायची सवय आहे. तो उगाचच माझी काळजी करत बसेल.' असा विचार करून सुमेधाने तिच्या डोक्यातून त्या दाढीवाल्याचा विचार काढून टाकायचं ठरवलं.

"ऑफ कोर्स!" रमेश लगेच उठला, आणि तिचं सगळं सामान बॅगेत भरू लागला. सुमेधाने थोडा वॉश घेतल्यावर तिलाही जरा बरं वाटलं. गाडीने रमेशने सुमेधाला तिच्या पारल्याच्या घरी सोडलं.

"अरे आज गाडी घेऊन जा ना. आता कुठे तुला रिक्षा मिळणार आहे?" गाडी पार्क करण्यासाठी रमेशने गाडी पार्किंगच्या दिशेने वळवल्यावर सुमेधा म्हणाली. "नाहीतरी उद्या लवकर येणारच आहेस ना!"

"नको नको! तुझी गाडी घरी घेऊन गेलो तरी आमच्या चाळीपुढे कुठलं आलाय पार्किंग! रस्त्यावर गाडी लावली आणि गाडीला काही झालं तर मी कुठून भरून देणार आहे? त्यापेक्षा माझी अकरा नंबरची बसच मस्त !" सुमेधाकडे बघून हसून त्याने डोळे मिचकावले आणि वळून अंधारात दिसेनासा झाला.


सुमेधाने ब्लॉकचा दरवाजा उघडला. घरात आल्यानंतर अंधार असलेला तिला मुळीच आवडायचा नाही. त्यामुळे घरात एकतरी दिवा नेहमी लावलेलाच असयचा. तिची आई होती तेव्हा ठीक होतं. घरी आई वाट बघत बसायची. आपण दमून घरी येतो तेव्हा कोणीतरी आपली वाट बघत आहे ही जाणिव किती चांगली आहे, हे सुमेधाला आई गेल्यावरच समजलं. आईला जाऊन आज सहा महिने होत आले. आता घरात ती एकटीच. रिकामं घर खायला यायचं. त्यामुळे ती बहुतेक वेळ घराबाहेरच घालवायची. एक रमेश सोडला तर दुसरे कोणी मित्र मैत्रीणीही तिला नव्हत्याच. अर्थात नाटक सिनेमा धंद्यात असणार्‍यांना "मित्र मैत्रिणींची" कमतरता कधी भासत नसते पण सुमेधाच्या मैत्रीच्या व्याख्येत बसू शकतील असे मित्र तिला मिळाले नव्हते. वेगवेगळ्या पार्ट्यांना जाणे, लोकांशी मिळून मिसळून वागणे हे सगळं ती सुद्धा करायची पण फक्त एक शिष्टाचार म्हणून. कोणालाच एका ठराविक मर्यादेपेक्षा तिने जवळ येऊ दिलं नाही. अपवाद फक्त रमेशचा. रमेश जरी आवडत असला तरी तिने रमेशचा 'नवरा' ह्या दृष्टीकोनातून विचार केला नव्हता. रमेशनेही तिला कोणत्याही प्रकारे असं काही भासू दिलं नव्हतं. तिला रमेशमधला समजूतदार मित्रच फार आवडायचा.

नेहमी प्रमाणे रात्रीचं गरम दूध पिऊन तिने अंथरूणावर अंग टाकलं. दिवसभरातले प्रसंग डोळ्यांपूढून जायला लागले तशी ती पुन्हा अस्वस्थ झाली. रंगमंचावर असताना तिच्या डोळ्यांचा वेध घेणारे ते भेसूर डोळे तिला दिसू लागले.आज जरी त्या दाढीवाल्याचा चेहरा ती नीट बघू शकली नसली तरी रंगमंचावर असताना त्याचे भेसूर निर्विकार डोळे तिचा पाठलाग करत असल्याचं तिला जाणवत होतं. कितीही प्रयत्न करून सुमेधा शांत झोपू शकली नाही. शेवटी झोपेची गोळी घेतल्यावर थोड्या वेळाने ग्लानीतच झोपली.

सकाळी रमेशने दाराची बेल वाजवली तेव्हा सुमेधा झोपलेलीच होती. तीन चार वेळा बेल मारल्यानंतर सुमेधाने दरवाजा उघडताच रमेशचा पहिला प्रश्न आलाच "काय झालं गं? किती वेळ बेल मारत होतो मी. इतका वेळ कशी झोप लागली? तब्येत बरी आहे ना?"

"अरे हो हो! किती प्रश्न विचारशील? काल उशीरा झोप लागली, म्हणून उठायल उशीर झाला बाकी काही नाही!"

"आज सौदामिनीच्या शूटींगसाठी जायचं होतं नऊ वाजता. मी फोन करून त्यांना कळवतो आपल्याला उशीर होणार आहे ते. पहिल्या सिरियलचं शूटींग आहे मॅडम! उशीर करून चालणार नाही अजून!!" सुमेधाच्या डोक्यावर टप्पल मारत रमेश म्हणाला आणि फोन घेऊन गॅलरीत गेला.

स्टूडियोत पोहोचले तेव्हा दहा वाजले होते. पण नंतर शूटिंग पटपट आटोपलं. सुमेधा आणि रमेश स्टूडियोतल्या खुर्च्यांवर बसले होते तेवढ्यात सुमेधाचं लक्ष लांबच्या दरवाज्याकडे गेलं "रमेश रमेश अरे तो बघ!! "सुमेधा जवळ जवळ किंचाळलीच!

"कोण" रमेशने त्या दिशेने बघितलं!

"अरे असं काय करतो आहेस? तो बघ ना दरवाजात! तोच दाढीवाला"

रमेश धावत धावत दरवाज्यापाशी गेला. पण त्याला कोणीच दिसलं नाही.

"कोणीच नाहीये गं तिथे? मी बाहेर जाऊन पण पाहिलं, बाहेरच्या लोकांनापण विचारलं. कोणालाच कोणी दाढीवाला माणूस दिसला नाही!"

"म्हणजे मी खोटं बोलते आहे असं तुला म्हणायचंय का?" अतिशय दुखावलेल्या स्वरात सुमेधाने विचारलं

"अगं असं नाही. पण तुला काल नीट झोप पण लागली नव्हती, त्याचाच विचार करत होतीस ना! भास झाला असेल तुला."

"अरे भास नव्हता रे. तो खरंच तिथे उभा होता. मला त्या माणसाची फार भिती वाटतेय रे! त्याचे ते डोळे !! आई गं!" सुमेधाने ओंजळीत तोंड खूपसून घेतलं.

आता तिला कसं समजावायचं ते रमेशला समजेना. "सुमेधा, आपण पोलिसांकडे जायचं का?"

"नको पोलिसांकडे नको. पण तू माझ्यावर विश्वास ठेव! तो होता तिथे."

"बरं बरं. मी बघून घेतो त्याला. पुढच्या वेळेला दिसला तर मला सांग ! मी बरोब्बर हॅंडल करतो! ठिक आहे!? डोंट वरी!" शक्य तितक्या समजावणीच्या सुरात रमेश बोलला.

पुढच्याच आठवड्यात तोच प्रसंग पुन्हा घडला. ह्या वेळेला मध्यांतराचा आधीच सुमेधाला तो दाढीवाला दिसला. यावेळी प्रेक्षागृहाच्या दरवाज्याजवळच तो होता. विंगेत जाताच सुमेधाने रमेशला त्याच्या बद्धल सांगितलं. "दरवाज्याजवळच्याच खुर्चीवर तो बसलाय!" "ठीक आहे. आज बघतोच त्याला!" रमेशने तिला दिलासा दिला.

मध्यंतरानंतर नाटक सुरू झालं तेव्हा रमेश दरवाज्याजवळ उभा राहिला. सुमेधा स्टेजवर आली. रमेश दरवाजात उभा राहून सगळ्या प्रेक्षकांवरून नजर फिरवत होता. 'पण त्याला त्याच्या समोरच असलेला दाढीवाला का दिसत नाहिये? अरे रमेश असं काय करतो आहेस?' सुमेधाचं लक्ष संवादांमधून अगदी उडालं. विंगेत आल्यानंतर रमेशनेच तिला विचारलं, "बाहेर कोणी दाढीवाला नाहिये गं!"

"अरे असं काय करतोयस? तुझ्या पुढेच तर तो बसला होता. इतकंच काय तुझ्या पुढूनच तर तो सरळ दार उघडून बाहेरही गेला. आणि तू म्हणतोयस की तुला दिसला नाही?" सुमेधाचा धीर आता सुटला होता. भितीचं रुपांतर आता रागात व्हायला लागलं होतं.

"हे बघ सुमेधा, तुला खात्री वाटत नसेल तर आपण दरवाज्या बाहेरच्या स्टॉलवाल्याला विचारूया"

"चल"

अर्थात स्टॉलवाल्यालाही कोणी दिसलं नव्हतं. विषेशतः नाटक सुरू असताना कोणी बाहेर गेल्याचं त्याला नक्कीच कळलं असतं. सुमेधा पुन्हा एकदा तिच्या खोलीत जाऊन रडली. रमेशने मनातल्या मनात काही निश्चय केला आणि तिच्या खोलीचं दार ठोठावलं.

(क्रमशः)

Friday, January 27, 2012

कुरियर बॉय! (भाग - २)


"अरे काय विचारू नको. धंदा एकदम जोरात चालू आहे. जवळपास हजार चिठ्ठ्या जमल्या आहेत. मी आता याच बिल्डिंगमधे वरच्या मजल्यावर राहतो. मस्त आहे खोली. येतोस आत्ता?"
"आता नको. मला बर्‍याच डिलीवरी करायच्या आहेत. नंतर कधीतरी." मी तिथून सटकलो.
पण आमची भेट लवकरच होणार होती.
आता पुढे...

त्यादिवशी नंतर बरेच दिवस रघू दिसला नाही. आणि जेव्हा दिसला तेव्हा त्याची एका वेगळ्याच अर्थाने ओळख पटली नाही. मला वाटलं होतं आता पर्यंत त्याने भरपूर पैसा जमवला असेल आणि मस्तपैकी बस्तान बसवलं असेल. पण त्याच्या कडे पाहून एकूण त्याचं काही खरं नाही इतकं मात्र जाणवलं.

रात्री दोन वाजता माझ्या खोलीचं दार खाडखाड वाजत होतं. दिवसभराच्या कामानंतर मी अगदी गाढ झोपेत होतो. सालं कुरियर बॉय म्हणजे दिवसभर नुसती तंगडतोड! त्यामुळे दार वाजल्यावर उठावंसंच वाटत नव्हतो. पण थोड्या वेळाने दार उघडलं नसतं तर कदाचित तो दार तोडूनच घरात शिरला असता. मी आधीच झोपेत होतो आणि त्यातून अशा भलत्या वेळी रघूला माझ्या दारात पाहून मी जाम गोंधळलो.

"काय रे? तू आत्ता ह्या वेळी? पोलिस बिलिस लागलेत की काय पाठिमागे" त्याच्या मागे पोलिस वगैरे असतील तर आत्ता मला तो घरात नको होता. मी लाईट लावू लागलो.

"लाईट नको लाउ आणि आधी दार बंद कर. मग सांगतो"
तो पटकन आत येत म्हणाला. त्याच्या एकून वागण्यावरून तो जाम घाबरला वाटत होता. पण त्याच वेळी त्याची भीती लपवायचा पण प्रयत्न करत होता. नक्कीच कायतरी भानगडीत अडकला असणार. पण च्यायला माझ्या घरी येऊन मला त्यात उगाचच गुंतवलं तर नसतं झंजट माझ्या मागे लागेल. मी दरवाजा लावला. रघू खोलितल्या खोलीत येरझारा घालत होता.

"काय लफडं झालं रे?" मी त्याला पाणी देत विचारलं.

अधाशासारखं पाणी पिउन झाल्यावर तो म्हणाला "यार मन्या, ती बाई माझ्या पाठी लागलीय!"

"आँ! बाई पाठी लागलीय?" च्यायला आमच्या पाठी कोण नाय लागत म्हणून आम्ही रडतो, आणि ह्याच्या पाठी बाई लागलेय म्हणून ह्याची तंतरलीय? मला तशा वातावरणात पण एकदम हसायलाच आलं.

"हसतोय काय साल्या. जिथं जाईन तिथं ती मागावर असते. एकवेळ पोलिस परवडले पण ही बया नको. आजकाल रात्री झोपपण लागत नाही मला. कारण ही बया बाहेर उभी राहून माझी वाट बघत असणार हे मला माहितेय. मी घराच्या बाहेर पडलो की लगेच पाठलाग सुरू. कुठेही गेलो आणि मागं वळून बघितलं की असतेच. अगदी खाली पानवाल्याकडे पण जायची चोरी!"

" .. मग तिला विचारलंस का की बाई तू का माझ्या पाठी पाठी करतेस?" माझं हसणं  आतल्या आत दाबत शक्य तितक्या शांत पणे परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत म्हणालो.

"तिने माझी पेपर मधली जाहिरात वाचली आणि मला भेटायला आली होती. मी तिची चिठ्ठी आणी पैसे घेतले."

"बरं मग"

"मग काय... आता माझ्या मरणाची वाट बघतेय ती!"
मला हसू आवरेनासं झालं. त्याच्या स्किममधला हा धोका त्याच्या लक्षातच आला नव्हता.

"तू एकटाच आहेस ना इथं?" रघूने इथे तिथे बघत विचारलं.

" तुला काय वाटतं? ती बाई इथे पण येईल?"

"काही सांगता येत नाही. आली तर काही आश्चर्य वाटायला नको. सालीला झोप वगैरे काही नाहीच! येडीच वाटते यार. "

"मग! तुला काय वाटलं? शहाणी लोकं तुझी जाहिरात वाचून तुला पैसे पाठवत असतील?" पुन्हा एकदा माझा खवचट प्रश्न. पण रघूचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो त्याच्या तंद्रीतच बोलत होता.

"मी नक्की कधी चिठ्ठी देणार ते हवाय माझ्या कडून तिला. पैसे दिल्यानंतरच्या दुसर्‍या दिवसापासून तिचे फोन चालू. दिवसाच काय रात्री बेरात्री कधी पण. वैताग साला! मग मी फोन घ्यायचं बंद केलं. तेव्हापासून मग अशी पाठलाग करत फिरत असते."

"काय नक्की  प्रॉब्लेम काये तिला?"

"म्हणते की एकदम अर्जंट निरोप आहे तिचा. तिच्या नवर्‍यासाठी. येडी साली. नुकताच मेलाय म्हणे नवरा. अर्जंट म्हणे! मायला तो एक आधीच मेलेला आणि त्यात बायको अजून त्याला अर्जंट चिठ्ठ्या पाठवतेय. बिचार्‍याचं नशिबच वाईट असणार म्हणून असली बायको मिळाली. कदाचीत त्याने स्वतःलाच खलास केलं असेल ह्या असल्या बायकोमुळे.

"ह्म्म. चिठ्ठीत काय लिहिलंय?"

"फार काही नाही, फक्त 'मला माफ कर' इतकंच. मला चिठ्ठी देताना सांगत होती, एकदा म्हणे तिचं तिच्या नवर्‍याशी भांडण झालं आणि नवर्‍याला हार्ट अ‍ॅटेक येऊन मेला. .. मेला कसला, सुटला असल्या येडीच्या तावडीतून ! गळफास लावला असणार त्यानं. तिला आता खूप वाईट वाटतंय म्हणून आता पुन्हा पुन्हा मला सांगत होती. तो मेल्यावर अक्कल आलीय हिला."

"बरं मग आता जर तुला तिचा त्रास होत असेल तर तिचे पैसे परत करून टाक सरळ. नाय जमणार म्हणावं!"

"तेच करायला लागणार बहुतेक."

"मग आत्तापर्यंत का नाही केलंस?"

"सॉल्लिड पैसे दिलेले रे तिने! माझा नेहमीचा रेट हजार रुपये... पण तिने दहा हज्जार दिलेत!"

"तिला काय एक्स्प्रेस डिलेवरी वाटली काय?" मी गमतीत म्हणालो, पण बहुतेक तिला तसंच वाटलं असण्याची शक्यताही होती.

रघू खिडकीच्या पडद्याआड उभं राहून बाहेर बघत होता.
"आयला !!!"

"काय झालं?"

"ती बघ. बाहेर उभी आहे"

"कुठे?" मी कुतूहलाने खिडकीपाशी जाउन डोकावलो. मला बाहेरच्या अंधारात फारसं काहीच दिसलं नाही. रस्ता सुनसान होता. पलिकडे झोपडपट्टी होती तिथे पण काही हालचाल नव्हती. इथे तर रस्त्याला लाईटपण नव्हते. कोण बाई या वेळी इथे असणारे? ह्या रघ्याला भास होत असणार.

"कोण पण नाहीये तिथे."

"तिथे खाली रस्त्याच्या त्या साईडला, त्या खोपटाच्या मागच्या बाजूला बघ. हातातलं घड्याळ चमकताना दिसताय बघ! साली सारखी सारखी घड्याळात बघत असते. बसची वाट बघतात तशी माझ्या मरायची वाट बघतेय! काय पण अवदसा पाठी लागलेय"

मी त्या दिशेने बघितलं. थोडा वेळ गेला तरी मला कोणी दिसेना. मी वळणार इतक्यात त्या खोपटाच्या मागच्या बाजूला काहीतरी चमकलं. नीट बघितलं तर खरोखरच कोणीतरी उभं होतं.
"आयला हो रे! कोणीतरी उभं आहे तिथे."

"कोणीतरी नाय, तीच आहे."

"मग आता काय करणार. सरळ जाऊन तिला भेट ना. जा बाई तुझे पैसे घेऊन. तुला निदान शांतपणे झोप तरी लागेल." मी म्हणालो.

रघू अजूनही खिडकीतून बाहेर बघत उभा होता. रघ्या चांगलाच हडबडला होता.

"उद्याच तिला तिचे सगळे पैसे परत देउन टाकतो." माझ्याकडे न बघताच रघु तोंडातल्या तोंडात बोलला.
"मी आजच्या रात्री इथे झोपलो तर चालेल का? आता बाहेर पडायची हिंमत नाही आपली. शिवाय आत्ता या वेळेला माझ्याकडे एवढे पैसे पण नाहियेत. उद्या खोलीवर जाउन सकाळीच पैसे देऊन टाकतो मग सगळं नीट होईल. चालेल ना?"

"ठिकाय. पण माझ्याकडे फक्त ही फाटकी सतरंजी आहे."

"चालेल चालेल यार. माझीच एवढी फाटलेय.. सतरंजीचं काय मग" रघू उसनं हसत हसत म्हणाला.

"उद्या सकाळी सकाळी मामला खतम करून टाक. "

"हो रे बाबा" फाटक्या सतरंजीला सरळ करून रघू त्यावर आडवा झाला.
इतके दिवस ऐषारामात जगणारा असा एकदम जमिनीवर झोपलेला पाहून त्याच्या बद्धल मलाच वाईट वाटायला लागलं. चांगलं डोकं दिलंय देवाने. चांगल्या जागी वापरलं असतं तर? जाउदे. मी पण पांघरूण डोक्यावर घेऊन झोपून गेलो. रघू पण थोड्याच वेळात घोरायला लागला.

सकाळी सकाळी रघूनेच मला उठवलं. "मन्या तू पण चल माझ्या बरोबर यार."

रघु स्वतःच्या खोलीवर घेऊन गेला. अपेक्षेप्रमाणे ती बया आमच्या पाठलागावर होतीच. मग पैसे घेऊन आम्ही तसेच त्या बाईच्या समोर गेलो. रघू रस्त्यातच तिला पैसे देत होता. पण तिच म्हणाली,  "मला खूप भूक लागलीय, आपण समोरच्या उडप्याकडे जाऊया का?"

बाई बोलायला तर बरी वाटत होती. पण अवतार मात्र बघण्यासारखा होता. हॉटेलात गेल्यावर रघूने पुन्हा बोलायला सुरवात केली.

"बाई, मी गेल्या आठवड्यात डॉक्टरांकडे जाऊन सगळ्या टेस्ट केल्या. डॉक्टरांनी मला अजून सहा महिने तरी काही होत नाही असं सांगितलंय! तुम्हाला तुमची चिठ्ठी पोचवायची घाई आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे व चिठ्ठी परत घ्या"

बाई थोडा वेळ काही बोललीच नाही. मग एकदम म्हणाली, "असं कसं म्हणाले डॉक्टर? नक्की त्यांनी सगळ्या टेस्ट बरोबर केल्या ना? कधी कधी डॉक्टरांचं चुकतं. पुन्हा एक्दा टेस्ट करुया का?"

तब्येत चांगली आहे म्हणून जास्त दिवस जगायला मिळणार, ह्याची कम्प्लेन करणारी बाई मी पहिल्यांदाच बघत होतो! रघू म्हणाला ते बरोबरच होतं. हीच्या डोक्यावर नक्कीच परिणाम झालेला असणार.

रघू शक्य तेवढा सरळ चेहरा ठेवत म्हणाला "हो बाई, मी काही इतक्यात मरत नाही."

हे ऐकल्यावर बाईचा चेहरा थोडा रडवेला झाल्यासारखा वाटला. रघूने टेबलवर ठेवलेले पैसे तिने हातात घेतले आणि पर्स मधे ठेवले. थोडावेळ खिडकीबाहेर बघत राहिली. काहीतरी विचार करत असावी. मनात मग विचार पक्का झाल्यासारखं तिनं रघूकडे पाहिलं. पुन्हा पर्स उघडली, वाटलं की पैसे परत करते की काय? पण काही कळायच्या आतच पर्समधून एक चाकू काढला आणि रघूच्या गळ्यात आरपार घुसवला. माझी तर सॉल्लिड फाटली आणि मी खुर्चीवरून बाजूला होता होता पडलोच! रघूला तर अजिबातच हलता आलं नाही. चाकू नराड्यात घेऊन तो खुर्चीवरच कोसळला ! टेबलावर रक्ताचं थारोळं झालं. बाकीचे गिर्हाईक बाहेर पळू लागले. ती बाई अजूनही रघूच्या समोरच बसून होती. रघू नीट मेलाय ना याची खात्री करत असावी. नंतर तिची चिठठी तिने रघूच्या खिशात कोंबली.  कुरियर बॉयला त्याच्या शेवटच्या डिलेवरीसाठी तिने पाठवून दिलं होतं. काही मिनिटांचं पोलीस, ऍम्ब्युलन्स, डॉक्टर वगैरे आले . आणि त्या बाईला आणि रघूला घेऊन गेले.

रघूच्या स्किमचा शेवट असा होईल असं मला वाटलंच नव्हतं. पण त्याचं मरणं अगदीच फुकट गेलं नाही. पोलिसांनी त्या बाईला ताब्यात घेतलं. तिच्यावर तिच्या नवर्‍याच्या खूनाचापण आरोप होता म्हणे. पण सिद्ध होत नव्हता. रघूच्या खुनाचा आरोप सिद्ध व्हायला काहिच प्रॉब्लेम आला नाही. रघूच्या नंतर त्याचे सगळे पैसे त्याने ठेवलेल्या बाईने घेतले आणि ती कोणातरी दुसर्‍या बरोबर पळाली असं कळलं.

बरीच वर्ष झाली आता या गोष्टीला पण अजूनही या सगळ्या प्रकाराचा मी कधी कधी उगाचच विचार करतो. रघूने त्या सगळ्या चिठ्ठ्या दिल्या असतील का? जर दिल्या असतील तर ह्या त्याच्या स्किम मधे कोणतीच फसवणूक नव्हती. बरोबर ना? काही काही गोष्टी बरोबर का चूक हे कधीच सांगता येत नाही. त्यातलीच ही पण एक गोष्ट.

(समाप्त)

Thursday, January 26, 2012

कुरियर बॉय! (भाग - १)

रघू आता या जगात नाही. मरताना त्याच्याकडे एकूण दोन हजार आठशे पंधरा पत्रं होती. अर्थात त्याच्या डायरीतल्या नोंदींप्रमाणे. त्याची ही स्किम नक्की कधी सुरु झाली? म्हणजे जेव्हा त्याने तो उद्योग सुरू केला तेव्हा ती एक 'स्किम'च होती. नंतर मात्र काहीतरी भलतंच होऊन बसलं.

दोन वर्षापूर्वी ऑक्टोबर महिन्यात एका दुपारी त्याच्याशी बोलताना प्रथम त्याने मला त्याच्या ह्या नविन स्किमबद्धल सांगितलं. तो त्याच्या एका खोलीच्या जागेत एकुलत्या एका खुर्चीवर आरामात दारु ढोसत बसला होता. दुपारच्या उन्हाने तापलेले पत्रे.. अंगाची नुसती काहिली होत होती आणि रघू मात्र जणु फुल्ल एसी चालु असल्यासारखा आरामात होता. अंगात बनियन आणी लुंगी. बनियनला इतकी भोकं होती की त्याने ती न घालता उघडाच राहिला असता तरी काही बिघडलं नसतं.  सगळीकडे त्याच्या देशी दारुचा वास भरून राहिला होता. मला तर श्वास घेणंही नकोसं होत होतं. पण तरीही मी तिथे त्याच्या समोर बसून होतो. त्याला समजावणं मी माझं कर्तव्य समजत होतो.

"तुला काहीतरी कामधंदा तर करायलाच हवा ना!" मी त्याला म्हंटलं.

चकण्याच्या बशीतले थोडे दाणे तोंडात टाकत बेफिकीर नजरेने तो माझ्याकडे बघत होता. संपलेली बाटली त्याने कोपर्‍यात फेकली. खोलीत एका कोपर्‍यात बाटल्यांचा ढीग झालेला होता. तीन चार दिवसांचे वाढलेले दाढीचे खुंट खाजवत बसलेल्या रघूचा मला अतिशय राग येत होता.

"अरे, तुझ्याकडे या दारुसाठीतरी कुठून पैसे आले?"

उत्तरादाखल रघु माझ्याकडे बघून थोडं हसला. गूढ की काय म्हणतात ना तसं काहीसं. गेले चार पाच महिने रघु बेकार होता. आधी माझ्याबरोबरच कुरियर बॉय म्हणून काम करायचा. पण डिलीवरीमधे सारखे सारखे घोळ व्हायला लागले तसा सायबांनी बांबू दिला. पण आपला पुर्वीपासूनचा मित्र, म्हणून अडीनडीला धा-वीस रुपये मी त्याला देत होतो. पण गेला महिनाभर त्याने माझ्याकडूनपण पैसे घेतले नव्हते. शिवाय बघावं तेव्हा या खोलीत पीत बसलेला!

"हसतोस काय!" मी घुश्श्यातच बोललो, "काही काम करणं सोडा, पण या खुर्चीवरनं बुड तरी उचलंल आहेस का इतक्या दिवसात?"

त्याने बोटानेच मला गप्प राहण्याची खूण केली. खुर्चीवर बसल्याबसल्यासुधा तो भेलकांडत होता.
"कामधंदा करण्याचे सगळे प्रयत्न करून झालेले आहेत माझे", रघ्याने तोंड उघडलं एकदाचं.

"अरे, काम मिळत नसेल तर मला सांग, मी तुझ्यासाठी काहीतरी शोधून ठेवतो" मी समजूतीच्या स्वरात म्हणालो.

"मन्या, तुला शाण्या माणसातला आणि येड्या माणसांतला फरक माहितेय?" त्याने विचारलं, मी त्यावर काही बोलणार इतक्यात प्रवचनकर्त्याच्या थाटात तो पुढे बोलायला लागला, "येडी लोकं पडेल ते काम करतात. का म्हाईतीये? तर आपण नुस्तं बसून र्‍हायलो आपल्याला कोण काय म्हणेल या भितीने. पण शाणी  माणसं मंजे एकदम सुम्मधे असतात ! जो पर्यंत आपल्याला काही करायची गरज पडत नाही तोवर ते लोक काय म्हणतील याची पर्वा न करता ते आरामात असतात!"


त्याचं हे जगावेगळं तत्वज्ञान ऐकून मला हसावं का रडावं ते समजेना.

त्याने मला थांबायला सांगितलं, आणि लडखडत भिंतीवरच्या कपाटातून आणखी एक बाटली आणि कोणतातरी पेपर घेउन आला. बाटली अर्थात माझ्यासाठी आणली नव्हती. पेपर पुढे करून म्हणाला "हे वाच!"

पेपरमधे "छोट्या जाहिरातीचं" पान काढलं होतं. त्यातल्याच एका जाहिरातीभोवती पेनाने गोल केला होता. मी वाचायला लागलो

__ तुमच्या प्रिय मृत व्यक्तींना पत्रं पाठवा  !__


"हा काय प्रकार आहे?" मला काही समजलं नव्हतं.

"कोन म्हनलं मी कायपण करत नाही?" तो म्हणाला "ही माझी नवी स्कीम आहे. लोकं आपल्या मेलेल्या नातेवाईकांना निरोप पाठवण्यासाठी कितीही पैसे द्यायला तयार असतात!"

"क्काय?" मला काय बोलावं तेच सुचेना.

"बिहारमधे कोणीतरी असं केलेलं म्हणे.. चिक्कार पैसे कमवले!" रघू महाराज माहिती देत होते.
"कधी ना कधी नाहीतरी मी मरणारच आहे.म्हटलं त्यापुर्वी आपला फायदा करून घ्यावा. लोकं
ह्यापेक्षा कितीतरी गंडवागंडवीचे प्रकार करतात!"

अजूनही रघूची स्किम माझ्या टाळक्यात शिरेना. हा काय आता आत्महत्या वगैरे करणार की काय?   "अरे पण त्यापेक्षा सरळ काही तरी काम का नाही करत? मरायची कसली घाई तुला? आणि मेल्यावर तुला ह्या पैशाचा काय उपयोग?"

"तू पण साला येडाच आहे मन्या! मेल्यावर नाही आत्ताच पैसे मिळणार मला. हे काय 'क्याश ऑन डिलेवरी' वाटलं काय तुला?" रघ्या तोंड उघडं  टाकून मोठ्याने हसला.

मी तोंडात मारल्यासारखा गप्प झालो आणि त्याची जाहिरात पुन्हा वाचायला लागलो.
"हे इथे काय लिहिलंय? तुला क्यांसर आहे आणि लवकरच तू मरणार आहेस? हे काय आता?"

निर्विकारपणे खांदे उडवत रघू सांगू लागला "हे लिहिल्याशिवाय कोण मला पैसे देईल? शिवाय कित्येक वर्षं मी डॉक्टरांकडे गेलेलो नाही. मला क्यांसर नाहीच हे कसं कळणार?"
रघूकडे माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं.

"तू आणि मी त्या भिक्कार कुरीयर कंपनीत किती वर्षं आहोत.. काय फरक पडला आपल्या आयुष्यात इतक्या वर्षात.. ही भिकारडी खोली आणि ही बाटली! साला वैताग आलाय आपल्याला सगळ्याचा आता"

"म्हणून मग आता हे धंदे? लोकांना फसवण्याचे?"

"काय फसवणं फसवणं लावलंय रे? जर मी पैसे घेऊन त्यांचे निरोप पोचवले नाहीत तर मी त्यांना फसवेन! पण तो पर्यंत मी त्यांना फसवतोय हे सिद्ध तरी करता येईल का?" 
रघूने एकूण फारच खोलात जाउन याचा विचार केलेला दिसतोय!

"आणि ह्या निरोप पोचवायच्या बदल्यात तुला काय मिळणार?"

"तीनशे रुपये फक्त"

"काय बोलतो!" आश्चर्यापेक्षा माझ्या आवाजात अविश्वास जास्त होता. "एका निरोपाचे तीनशे रुपये! आणि त्याबदल्यात तू काय करणार?"

"गिर्‍हाईक मला फक्त एक चिठ्ठी देणार. आणि मी मेल्यावर ती चिठ्ठी त्यांच्या मेलेल्या नातेवाईकांना देणार! जन्मभर कुरीयरगिरी केलीच आहे! त्यातुनच तर ही आयडिया आली आपल्याला" रघू मोठ्या अभिमानाने सांगत होता.

"आणि लोकं खरंच पैसे देतात? काय भंकस करतो काय? लोकं हे वाचतात तरी का?"

"चिक्कार! दररोज मला कोण ना कोणतरी भेटून पैसे देतंय हे वाचल्या पासून. मी येत्या आठवड्यात पुन्हा जाहिरात टाकणारे!"

"लोकं खरंच पैसे देतात?" माझा विश्वासच बसत नव्हता!

"अर्थात! एकदम शिंपल मामला आहे! ते पैसे देतात आणि मी खर्च करतो!"

"आणी ह्यात काही चुकतं आहे असं तुला अजिबात वाटत नाही ना?"

"अजिबात नाही" 
रघूला उपहास वगैरे फारसं कळत नाहीच "फक्त माझ्या प्लॅन मधे फक्त एकच प्रॉब्लेम आहे!"

"फक्त एकच ??!" माझा पुन्हा रघूवर वाया गेलेला उपरोधिक सवाल. 

"ज्या लोकांचा देवधर्मावर विश्वास नाहीये त्यांना कसं पटवायचं हे समजत नाहिये!"


मी कपाळावर हात मारला. रघू काहीही बोलण्याच्या पलिकडे गेला होता. मी त्याचा नाद सोडला आणि निघून आलो.

रघूने त्याच्या नविन स्किम बद्धल मला सांगितल्यानंतर लवकरच त्याच्या चाळीतल्या सगळ्यांना सुद्धा सांगून टाकलं. काही लोकांना तो लवकरच मरणार म्हणून त्याची दया येत होती तर काहींना त्याने मृत्यूनंतरही अंगावर घेतलेल्या कामगिरीसाठी त्याच्या बद्धल आदर वाटू लागला होता.  त्याने मला म्हटल्याप्रमाणे त्याच्या जाहिराती पेपरमधून वरचेवर दिसू लागल्या होत्या. त्याला भेटून चिठ्ठी देणार्‍यांच्या संख्येत चांगलीच वाढ होत होती. अगदी लांबून लांबून त्याला लोकं पैसे आणि चिठ्ठ्या पाठवू लागले.

हां हां म्हणता पठ्ठ्याने चांगलंच बस्तान बसवलं. एक सेकंडहँड बाईकसुद्धा घेतली. अंगावर नवीन कपडे, पायात चकचकीत बूट. एखाद्या बी ग्रेड पिच्चरच्या होरोसारखा दिसू लागला होता. अर्थात त्याचा "रेट" तीनशे रुपयांवरून वाढत वाढत हजार रुपयांवर गेला होता. त्याच्या आधीच्या कोंदट खोलीतून त्याच्याच बाजूला नुकत्याच झालेल्या बिल्डींगमधे दोन रून भाड्याने घेऊन राहण्यापर्यंत त्याची प्रगती झाली होती. शिवाय, कुठलीतरी बाई आणून त्या खोलीत ठेवल्याची कुजबूजही आजकाल ऐकू येत होती.

नंतर एकदा आम्ही भेटलो तेव्हा मला तो ओळखूसुद्धा आला नाही. मी त्याच्या बिल्डींगमधे काही पार्सल पोचवायला गेलो होतो. जिन्यात रघू समोरून भारीतल्या कपड्यांमधे तोंडात सिगारेट ठेउन उतरत होता.

"मन्या!" त्याने हाक मारली आणि पाठीवर जोरदार दणका देऊन मला म्हणाला " काय यार! विसरला काय आपल्याला?"

"अरे रघू! काय साला ओळखलंच नाही तुला! काय चालंलंय आजकाल!" त्याचं काय चाललंय याची पूर्ण माहिती असूनही मी वेड पांघरायचं ठरवलं.

"अरे काय विचारू नको. धंदा एकदम जोरात चालू आहे. जवळपास हजार चिठ्ठ्या जमल्या आहेत. मी आता याच बिल्डिंगमधे वरच्या मजल्यावर राहतो. मस्त आहे खोली. येतोस आत्ता?"

"आता नको. मला बर्‍याच डिलीवरी करायच्या आहेत. नंतर कधीतरी." मी तिथून सटकलो.

पण आमची भेट लवकरच होणार होती.

(क्रमशः)

Monday, September 19, 2011

आठवणी


आपल्या आयुष्यात काही काही आठवणी अशा असतात की कितीही प्रयत्न केला तरी त्या विसरल्या जात नाहीत. आयुष्याच्या संध्याकाळी मग कधी कधी ह्या आठवणी मनात पिंगा घालायला लागतात. जसं जसं मागं जावं तशा तशा ह्या आठवणी थोड्या विरळ होत जातात. एकाद्या धूसर चित्रांचा अल्बम बघावा तशा.... एखाद्या सुराचा, एखाद्या गंधाचा किंवा एखाद्या प्रसंगाचा संदर्भ घेउन अडगळीत पडलेल्या असतात. अडगळीप्रमाणेच.. कधी कधी तर आठवणी अगदीच असंबद्ध असतात. त्या स्मृतींची अडचण अजून का डोक्यात साठली आहे असा प्रश्न पडतो. प्रत्येक स्मृती एखाद्या अद्भुत स्वप्नासारखी वाटते आताशा. लहानपणीच्या त्या आठवणी .. जेव्हा पर्‍यांची राज्य खालसा झाली नव्हती. वाढत्या वयासोबत निरागसता हरवत गेलेली असली तरी त्यांच्या स्मृती अजूनही शाबूत आहेत.

माझ्या काही आठवणीतर कुठल्याही संदर्भाशिवाय उगाच डोक्यात ठाण मांडून बसल्या आहेत. आमच्या गावातल्या छोट्या घरात आजोबांच्या मांडीवर बसून आरती करायचो. जशी आजोबा आजींची प्रेमळ नजर अजूनही मला तितकीच स्पष्टपणे आठवतेय तसंच एकदा अंगणात भर दुपारच्या उन्हात मुंग्यांच्या रांगेमागे चालत जाउन त्यांचं वारुळ शोधल्याचंही आठवतंय.  काही काही आठवणींवर तर माझा स्वतःचाच विश्वास बसत नाही.. म्हणजे त्या आठवणी खर्‍या आहेत की माझी स्वप्नं तेच समजत नाही.

आता हीच आठवण बघा ना! मला तो प्रसंग अगदी जशाच्या तसा आठवतोय. अगदी त्यातल्या सगळ्या बारिकसारिक तपशीलांसह. पण तो प्रसंग खरा की ते एक स्वप्न होतं ते मला अजूनही नक्की कळलेलं नाही. 
 
त्यावेळेला आम्ही, म्हणजे मी आणि दादा, गावातल्या घरात आजी आजोबांकडे राहायला गेलो होतो. मी साधारण पाच सहा वर्षांचा असेन, आणि दादाचं वय आठ-नऊ. मला आणि दादाला आजोबांनी एक वेगळी खोली दिली होती. आमची थोडी खेळणी आणि सटर फटर इस्टेट आम्ही ठेवली होती. त्याच खोलीत आजोबांनी आमच्या खाटा ठेवल्या होत्या. 

एकदा रात्री कधीतरी मला तहान लागून जाग आली. सगळीकडे गुडूप्प अंधार होता. पण इतक्यात सण्णकन विज चमकली. गडगडाटाच्या भितीने मी कान झाकून घेतले पण काहीच ऐकू आलं नाही. बाहेर पाउस कोसळत होता... कारण मातीचा पाण्याचा वास मला येत होता. पण काही ऐकू येत नव्हतं. खिडकी उघडी होती. त्यामुळे खोली खूपच थंड झाली होती. आजी नेहमी खिडकी लाऊन घ्यायची. आज कशी काय विसरली? हळूवार वार्‍यामुळे खिडकीचे पडदे हलत होते. पण बाहेरून झाडांच्या पानांचा आवाज येत नव्हता.  शांतता कधी कधी इतकी भीषण असते की आवाजासाठी कान आसुसतात. 

मी खाटेवर पालथा झोपलो होतो. डावा आत खाटेखाली घालून तिथे पाण्याचा पेला आहे का ते मी चाचपडून बघायला लागलो. हात जमीनीला लागला तेव्हा जमिन थोडी उबदार वाटली. इतक्यात मला हातावर थोड्याथोड्या वेळाने हलकेच हवेची झुळूक जाणवत होती...म्हणजे फुंकर नव्हे पण कोणाचे तरी श्वास-निःश्वास असावेत असं काहीसं. इतक्यात हातावर काहीतरी हुळहुळल्यासारखं वाटलं. आणि मी हात वर घेतला. 

खाटेखालून एक बाई हळूहळू सरकत बाहेर आली. तिचे पांढरे केस मोकळे सुटलेले होते. सावली वरून मला तर ती माझी आजीच वाटली. लहान मुलांचं मन किती वेगळ्या प्रकारे विचार करतं नै! मी तिला अजिबात घाबरलो नव्हतो. "आजी माझ्या खाटेखाली काय शोधतेय?"  हा विचार तेव्हा माझ्या डोक्यात आला होता. मी तिला हाक मारायला तोंड उघडलं.. पण तोंडातून शब्द बाहेर येईना. का माझं मलाच ऐकू येत नव्हतं? त्या बाईचा चेहरा मला काही दिसत नव्हता. चेहर्‍याच्या जागी नुसतं धुकं दिसत होतं. ती रांगत रांगत माझ्या दादाच्या खाटेपाशी गेली. तिची प्रत्येक हालचाल अगदी सहज होत होती... जणू तिचे हात पाय जमिनीला लागतच नव्हते. वार्‍यावर हलकेच उडणार्‍या पांढर्‍या चादरीसारखी. नंतर मला झोप लागली असावी कारण नंतर काय झालं ते मला आठवत नाही.

पण दुसर्‍या दिवशी दादा त्याला रात्री पडलेल्या विचित्र स्वप्नाबद्धल सांगत होता. त्याच्या स्वप्नात एक बाई जमिनीखालून बाहेर आली आणि बाहेर पावसात खेळायला निघून गेली.खेळून दमल्यानंतर परत घरात आली आणि जे कोणी झोपले असतील त्यांच्या कानाशी लागून त्यांना तिच्या खेळाबद्धल सांगत होती. दादाला ते स्वप्न पुन्हा पुन्हा पडत होतं. अगदी आम्ही आमची सुटी संपवून परत गेलो तेव्हा पर्यंत.. आजी आजोबा त्याच वर्षी एका पाठोपाठ एक असे ह्रुदयविकाराच्या झटक्याने वारले. आम्ही सुद्धा पुन्हा त्या घरी गेलो नाही. 

मानवी मन सुद्धा काय काय आठवणी जपून ठेवतं! 

(काल्पनीक)

Monday, May 2, 2011

वास्तव

सातव्यांदा राहुल आरशात डोकावला. गळ्यातली सोन्याची चेन आत टाकत, कोपर्‍यातल्या तंबोर्‍याकडे नजर टाकली. कधी नव्हे ते राहुलला आजच्या कार्यक्रमाआधी थोडी जास्त धाकधुक वाटत होती. अर्थात त्याला कारणही तसंच होतं. मुंबईतला त्याचा हा पहिलाच कार्यक्रम होता. काही तासांपुर्वीच थेटर हाऊसफुल्ल असल्याचं त्याला कळलं होतं. आणि जशी जशी कार्यक्रमाची वेळ जवळ येत होती तशी तशी त्याच्या मनातील हुरहूर वाढतच होती. राहुल गाण्याचे मेळावे करायला लागल्या पासून त्याची ख्याती सर्वदूर पसरली होती. लोकांना त्याचं गाणं, त्याचा आवाज खूपच आवडत होता.. इतका की लोक त्याची तुलना संगीतक्षेत्रातल्या दिग्गजांशी करायला लागले होते. राहुल आरशात बघत असतानाच दरवाजा वाजला.

“राहुल दिवेकर, दोन मिनीटं उरली आहेत.” पलिकडून आवाज आला.

“मी तयार आहे.” राहुलने उत्तर दिलं.

केसांवरून शेवटचा कंगवा फिरवून आणि कुर्ता पुन्हा एकदा नीट करून तो ड्रेसिंगरूमच्या बाहेर आला. बॅकस्टेजच्या पॅसेजमधून वाट काढत विंगेत येऊन उभा राहिला. पडदा अजून पडलेला होता. सुत्रधार राहुलची ओळख करून देत होते. बाहेर प्रेक्षागृहात सगळे प्रेक्षक एका अप्रतिम संगीत सोहळ्याच्या प्रतिक्षेत बसले होते. पडदा हळू हळू वर जात होता. आणि टाळ्यांच्या कडकडाटात राहुल रंगमंचावर येत होता. हा त्याच्या करियरसाठी अतिशय महत्वाचा कार्यक्रम होता. राहुलने अतिशय आत्मविश्वासाने गणेशवंदनेला सुरवात केली.

*****

रात्री सगळ्यांच्या नाईट देऊन झाल्यानंतर जोगळेकरांनी राहुलच्या हातात त्याच्या मानधनाचं पाकिट ठेवलं. राहुल आपल्या ड्रेसिंगरूममधे आला. अंग सैलावत आरामखुर्चीत बसतो न बसतो तोच दारावर थाप पडली. “कोण आहे?” थोड्या त्रासिक आवाजातच राहुलने विचारलं. “मी... गजानन देशपांडे”. नाव ऐकताच ताडकन उठून राहुलने दरवाजा उघडला. त्याच्या समोर साठीचे एक गृहस्थ उभे होते. अंगात मलमली कुडता आणि पांढरं शुभ्र धोतर, पायात कोल्हापुरी वहाणा आणि एका हातात काठी. गजाननबुआ देशपांडे म्हणजे त्याचं दैवत. त्यांना पाहताक्षणीच राहुल झटकन त्यांच्या पाया पडला. “यशवंत हो” साक्षात गजाननबुआंचा आशिर्वाद.

“बुआ तुम्ही इथे? मुंबईत?” राहुलला अजूजही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

“मी आत येऊ का?” आपल्या नेहमीच्या नम्र स्वरात बुआंनी विचारलं. त्यासरशी गडबडत जाउन राहूलने त्यांची माफी मागितली आणि दरवाज्यातून बाजूला झाला. त्यांच्या मागे दार बंद करून राहुलने त्यांना बसायला खुर्ची दिली. बुआंचं येण्याचं प्रयोजन काय असावं याचा राहुल विचार करत होता.

“बुआ, तुम्ही स्वतः माझ्या कार्यक्रमाला आलात हाच माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे. तुम्ही स्वतः इथे माझ्या ड्रेसिंगरूममधे आहात यावर माझा विश्वासच बसत नाहिये”.

काही न बोलता बुआंनी खोलीभर नजर फिरवली. खोलीत राहुलचं ड्रेसिंग टेबल, एक दोन खुर्च्या, एक आराम खुर्ची, तंबोरा आणि इतर थोडं सामान या व्यतिरिक्त फारसं काही नव्हतं. एका रिकाम्या खुर्चीकडे बोट करून त्यांनी राहुलला बसायला सांगितलं.

“तुमचं गाणं फार चांगलं झालं आज दिवेकर.” साक्षात गजाननबुआंच्या तोंडून स्वतःच्या गाण्याची स्तुती ऐकताना राहुलचं उर भरून आलं होतं. हे स्वप्न आहे का सत्य असं क्षणभर त्याला वाटून गेलं.

“बुआ, तुम्ही असं बोलून माझ्या सारख्या सामान्य गवयाला फार फार मोठं करताय”

“अर्थात अर्थात”

“छे छे! या सगळ्या शिष्टाचाराला आपण थोडावेळ बाजूला ठेउया. मी तुला राहुल म्हटलं तर चालेल ना ?” बुआंनी मोकळं हसत विचारलं.

“राहुल, तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं”

राहुलच्या मनात उगाच थोडी चलबिचल झाली. ‘म्हणजे फक्त माझं कौतुक करायला बुआ आलेले नाहीत तर’. मनातली खळबळ चेह‌र्‍यावर दाखवू न देण्याचा प्रयत्न करत राहुलने प्रश्नार्थक चेहरयाने बुआंकडे पाहिलं. क्षणभर त्याच्या डोळ्यात बघत पुढच्याच क्षणी बुआंनी नजर फिरवली. बुआ पुन्हा बोलू लागले.

“खरंतर, मी तुझ्या कार्यक्रमाबद्धलच बोलणार आहे.... पण नेहमी सारखं नाही. मला तुला जे सांगायचं आहे ते फार महत्वाचं आहे. पण त्या आगोदर मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. खरं खरं उत्तर देशील? तू हे गाण्याचे कार्यक्रम का करतोस?”

एक दोन क्षण राहुलला याचं उत्तर काय द्यावं हेच समजत नव्हतं. काही वेळापूर्वी आपल्या गाण्याची तारिफ करणारे बुआ त्याला असा प्रश्न विचारत होते. त्याच्यासारख्या गायकाने गाण्याचे कार्यक्रम का करावेत याचं उत्तर स्पष्टच होतं. “गाणं हेच माझं काम आहे बुआ.”

बुआंच्या कपाळावर सूक्ष्म आठी उमटली. “नाही, गाण्याशिवाय इतर अनेक गोष्टी तू करू शकतोस की. तुझे हे कार्यक्रम हेच काही एकमेव तुझ्या उपजिवीकेचं साधन नाही. गायक एक कलाकार असतो.”

“मला तुमचं म्हणणं नीटसं समजलं नाही” मनातला राग मनात ठेवत आणि आवाज संयमीत ठेवत राहुल म्हणाला.

“माझं म्हणणं एवढंच आहे की सगळीच माणसं दैवी गळा घेऊन जन्माला येत नाहीत. काही लोकांकडे तुझ्यासारखी दैवी देणगी नसते.”

त्यांच बोलणं मधेच तोडत राहुल म्हणाला... “म्हणजे मी मला मिळालेल्या देणगीची कदर करत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का?”

“मला म्हणायचं आहे की दैवी देणगी ही जन्माला येतानाच मिळते. आणि प्रत्येकाला ती मिळतेच असं नाही.”

राहुलने जरा त्रासूनच निःश्वास टाकला. बुआंना नक्की काय म्हणायचंय हे त्याला अजूनही कळलं नव्हतं. हे असं कोड्यात बोलून बुआंना काय साध्य करायचं आहे हेच त्याला समजत नव्हतं. उगाच आपण त्यांना काही भलतं सलतं बोलून जाऊ असं त्याला वाटू लागलं होतं.

“बुआ, कृपा करून तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला स्पष्टपणे सांगा.”

“तु गायक नाहीस राहुल. मला तुला हे सांगताना फार काही आनंद होत नाहीये.” बुआ ड्रेसिंगरूमकडे हात दाखवत म्हणाले “आणि आपण ह्या ज्या खोलीत बसलोय ती तुझी ड्रेसिंगरूमही नाहीये”.

राहुल बुआंच्या चेहर्‍यावर वेडाची झाक दिसते का ते पाहू लागला. ही माझी ड्रेसिंगरूम नाही तर मग काय आहे? हा माझा आरसा, माझी आवडती आराम खुर्ची आणि हा पांढरी चादर घातलेला छोटा पलंग … क्षणभर थबकून राहूलने पुन्हा पलंगाकडे नजर फिरवली. “हा पलंग इथे कुठून आला? माझ्या ड्रेसिंगरूममधे असा पलंग नव्हता... ही .. ही माझी ड्रेसिंगरूम नाही. काय चालंलय काय इथं?” ओरडतच राहूल उठून उभा राहिला. पण बुआ अजुनही शांतपणे त्याच्याकडे बघत होते. त्यांनी त्याच्या पाठीमागे बोट दाखवत बुआ पुढे सांगू लागले.

“ते मला म्हणाले की तु माझा फार मोठा चाहता होतास. म्हणूनच मला त्यांनी इथं बोलावलं तुझ्याशी बोलायला. तुझी मदत करायला.”

राहुलने चकित होत पाठीमागे वळून पाहिलं. त्याची ड्रेसिंगरूमची भिंत पूर्वीसारखीच दिसत होती. गजाननबुआंच्या असंख्य फोटोंनी आणि वर्तमानपत्रांच्या कात्रणांनी भिंत भरून गेली होती. गजाननबुआंबद्धल छापून आलेली प्रत्येक बातमी इथे भिंतीवर चिकटवलेली होती. राहुलला हे सगळं इथे कधी चिकटवलं हे मात्र त्याला आठवलं नाही.

“माझी मदत करायला?” राहुलने डोकं गच्च धरून ठेवलं. डोक्यावर कोणीतरी घणाघाती आघात करताहेत असं त्याला वाटू लागलं होतं.

“वास्तवाचा सामना करायला हवंस तू राहूल. आज १९९० हे साल चालू नाही. आणि हे मुंबईतलं नाट्यमंदिर नाही. हे ठाण्याचं हॉस्पिटल आहे. मी मघाशी म्हटलं तसं, तू गाण्याचे कार्यक्रम करणारा मोठा गायक नाहिस, तर ह्या थेटरमधे काम करणारा एक कारकून आहेस. तुझ्या घरी तुझी बायको आणि छोटी मुलगी आहे. तुझ्यावर प्रेम करणारं कुटूंब हीच तुझी देणगी आहे.” बुआंनी एका दमात सगळं सांगितलं पण शब्दा शब्दाला राहुलचं डोकं सुन्न होत होतं.

“नाही..तुम्ही खोटं बोलताय. हे सगळं खोटं आहे.. बस्स करा. मी कोण आहे ते मला पक्कं माहित आहे.” राहुलला हे दुःस्वप्न संपायला हवं होतं.

निराशेने मान हलवत बुआ म्हणाले, “डॉ. जोगळेकर, मी जे काही करू शकत होतो ते मी केलं... माझ्याने या माणसाचे हाल नाही बघवत.” बुआ दरवाज्याकडे चालत गेले. दरवाजा उघडताच पांढरा कोट घालून जोगळेकर आत आले.

“गजाननबुआ, तुम्ही जी काही मदत केलीत त्याबद्धल आभार. खरंतर राहुल दिवेकरांच्या वागण्यात थोडी सुधारणा होतेय आता. पण अशा केसेस मधे पेशंट बरा व्हायला किती वेळे लागेल हे कोणीच सांगू शकत नाही. कधी ना कधी ते पुन्हा वास्तवात जगतील ही आशा ठेवायची.. इतकंच आपल्या हातात आहे.”

“राहुल दिवेकर तुमचे फारच मोठे चाहते होते. तुमच्या व्यावसायिक आयुष्यातली प्रत्येक गोष्ट त्यांना माहीत आहे. मला वाटतं आयुष्यात आपणही तुमच्यासारखं मोठं गायक व्हावं ही त्यांची सुप्त ईच्छा असावी. त्यांनी गायकी शिकण्याचा प्रयत्नही खूप केला. इतकंच काय पण स्वतःचा एक कार्यक्रमही त्यांनी केला होता. त्यात त्यांनी तुमच्या गायकीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. समिक्षकांनी त्यावर भरपूर ताशेरे ओढले. नैराश्याच्या गर्तेत असताना कधितरी त्यांनी स्वतःचीच एक खोटी प्रतिमा निर्माण केली आणि स्वतः त्या खोट्या विश्वात रमायला लागले.”
बुआ तंद्रीतच म्हणाले “मुंबई”.. “इथेच मला प्रथम मोठं यश मिळालं. माझ्या आयुष्यच्या एका महत्वाच्या वळणावरचा कार्यक्रम होता तो”

बुआंनी वळून राहुलकडे शेवटचं पाहिलं. “अच्छा राहुल, ..” पण राहुलचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं.

बुआंचा आणि जोगळेकरांचा आवाज टाळ्यांच्या कडकडाटात त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हता. राहुल त्याच्या पुढच्या कार्यक्रमासाठी स्टेजवर चालत होता. लंडन, न्युयोर्क जगात सगळीकडे त्याचे कार्यक्रम होत होते. हेच त्याच्यासाठी वास्तव होतं.

Friday, March 11, 2011

अबोला


मिटींग संपता संपत नव्हती. ऑफिसमधून घरी पोहोचायला सुधाला कमीत कमी एक तास उशीर होणार होता.  जास्त उशीर झाला तर सुहास पुन्हा अबोला धरणार. सुधाने पुन्हा एकदा हातातल्या घडाळ्यावर नजर टाकली. "ह्या मिटींग्ज वेळेत घ्यायला काय होतं ह्या अय्यरला ! ऑफिस सुटायच्या वेळेला बरोब्बर मिटींग घ्यायला सुचतं याला. शिवाय मिटींगचा उपयोग काही नाही."

"सुधा, सुधा! "

सुधाने चमकून अय्यरकडे पाहिलं.

"मी तुम्हाला डिस्टर्ब नाहि ना केलं?" अय्यर तिच्याकडे पाहून कुत्सितपणे हसून म्हणाला.

"अं! नाही सर. माझं लक्ष आहे सर." सुधा मनातला सगळा राग चेहर्‍यावर दिसू न देता चेहर्‍यावर खोटं स्मित आणून म्हणाली.

अय्यरने घसा खाकरून त्याचं बोरिंग भाषण पुढे चालू ठेवलं. सध्याची इकॉनॉमी, कंपनीचा सेल्स चार्ट, नविन क्षेत्रात घुसण्यासाठी कंपनी कसे प्रयत्न करत आहे वगैरे वगैरे.

सुधा पुन्हा सुहासचा विचार करू लागली. लग्नाला दोन अडिच वर्ष होत आली होती त्यांच्या. वरवर पाहता सगळं सुरळीतच होतं. पण गेले सहा सात महीने सुधाच्या नोकरीमधल्या जबाबदार्‍या खूप वाढल्या होत्या. अर्थात सुधाला प्रमोशन मिळवण्यासाठी जास्त काम करणं आवश्यकच होतं. मात्र सुधाला घरी यायला उशीर झाला की सुहास तिच्यावर रागवायचा. राग व्यक्त करायची त्याची नेहमीची पद्धत म्हणजे तिच्याशी अबोला धरणं. पण सुधाला त्याचा राग घालवायची ट्रिक आत्तापर्यंत माहीत झालेली होती. त्यामुळे त्याचा राग फारसा टिकत नसे. त्याच्या त्या खोट्या खोट्या रागाची आठवण झाली अन सुधाच्या चेहर्‍यावर नकळतच स्मिताची रेषा उमटली.

खुर्च्या सरकल्याचा आवाज आला आणि मिटींग संपल्याचं सुधाच्या लक्षात आलं.  पटकन उठून ती तिच्या केबिन मधे आली. पर्स खांद्याला लावली.  तिच्या इतर सहकार्‍यांना "बाय" वगैरे म्हणण्याच्या मनस्थितीत आज ती नव्हतीच. आधीच  अय्यरने डोकं खाल्लेलं होतं त्यात आणखीन कोणी थांबवू नये म्हणून कोणाशीही न बोलता तिने लिफ्ट्च्या दिशेने चटचट पावलं उचलायला सुरूवात केली. उतावीळपणे लिफ्टचं बटण दोन दोन वेळा दाबलं पण लिफ्ट काही येत नव्हती. लिफ्ट अजून आठव्या मजल्यावरच होती. त्रासून तिनं जिन्यांकडे जाणारा दरवाजा उघडला. ऑफिस तिसर्‍या मजल्यावरच होतं त्यामुळे लिफ्ट पोहोचायच्या आगोदरच आपण खाली पोहोचू असा तिचा अंदाज होता. जणू प्रत्येक सेकंद वाचवून तीचा गेलेला वेळ भरून येणार होता. जिन्यात अर्थात कोणी नव्हतं. सुधा भराभर जिने उतरायला लागली. तिने घडाळ्याकडे पटकन नजर टाकली तर घडाळ्यात आठ वाजत आले होते."म्हणजे आज दोन तास उशीर होणार आपल्याला पोहोचायला".  तिच्या मनात विचार आला. तोच पट्कन पायरी निसटून तिचा तोल गेला. नशिबाने तिने कठडा धरला आणि पडता पडता वाचली. "हील गेली वाटतं" तिनं पायातल्या सँडलकडे बघितलं. हील अजूनही शाबूत होती.

मग न थांबता ती बिल्डिंगच्या बाहेर आली. रस्त्यावर सगळीकडे माणसंच माणसं. एकमेकांकडे बघूनही न बघितल्यासारखं करणारी... गर्दीतही एकटी राहणारी माणसं. त्या गर्दीत मिसळून जाउन तिनं स्टेशन गाठलं. गाडीमधली गर्दी, भांडणांचे आवाज, विचित्र वास सगळ्याची सवय झाल्यामुळे त्याही परिस्थितीत गाडी तरी वेळेवर मिळाली याचंच तिला थोडं बरं वाटत होतं. एका हाताने वरची कडी पकडून तिनं थोडावेळ डोळे मिटले.  पुन्हा सुहासच्या विचारांत मन गुंतलं. "सुहाससारखा समजूतदार नवरा मिळणं हे माझं भाग्यच आहे खरं तर. एकदा माझं प्रमोशन पक्क झालं की कुठेतरी मस्त फिरायला जायला पाहिजे आठवडाभर."

स्टेशन आलं तसं  पुरात लोटून दिल्यासारखं तिनं स्वत:ला गर्दीत लोटून दिलं आणि प्लॅटफोर्मवर आली. भरभर जिने चढून स्टेशनच्या बाहेर पडली. आज एकही रिक्षावाला तिच्या हाकेला थांबत नव्हता. "माज आलाय सगळ्यांना" तिनं नेहमीचं वाक्य उच्चारलं आणि झरझर पावलं टाकत घर गाठलं.

रस्त्यातून नेहमी प्रमाणे घराच्या खिडकीकडे लक्ष गेलं. लाईट लागलेला होता. सुहास वाट पाहात असेल. तिनं दरवाजा हळूच उघडला. "सुहास! " तिनं हाक मारली.  अर्थात सुहास तिला ओ देईल असं तिला वाटत नव्हतंच.. त्याचं काहीच प्रत्युत्तर आलं नाहीच. स्वैपाकघरात ओट्यावर गार गार झालेला चहा तिला दिसला. सुहासने आज हॉटेलमधून खास तिच्या आवडीचं जेवण पण आणलं होतं. आता एका अपराधीपणाची भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. सुहास टिव्ही लाउन सोफ्यावर बसला होता.

सुधा त्याच्या शेजारी जाउन बसली. "सुहास ! सॉरी रे, आज त्या  अय्यरने शेवटच्या क्षणी मिटींगमध्ये बोलाऊन घेतलं... मी आज वेळेवरच येणार होते."   पण सुहासचा मूड आज खरोखरच वाईट असावा. त्याने तिच्याकडे अजिबात बघितलं नाही. उगाच घडाळ्याकडे एक कटाक्ष टाकून तो उगाच रिमोट ची बटणं दाबत राहिला.  "अरे असं काय करतोस. मला प्रमोशन मिळालं ना की आपल्या संसारालाच त्याचा उपयोग होणार आहे ना रे." तिच्या डोळ्यात चटकन पाणी उभं राहीलं. पण सुहासचं टी-व्हीवरचं लक्ष काही कमी झालं नाही.

इतक्यात फोन वाजला. सुहासने पटकन उठून फोन उचलला.

"नाही" सुहास कोणालातरी सांगत होता. "आजही उशीर ... हं.... आजकाल रोजचंच व्हायला लागलं आहे तिचं."

सुहास सुधाच्या देखत कोणा तिसर्‍याकडे तिची तक्रार करत होता... सुधाला विश्वासच वाटत नव्हता. सुहास असं करणार्‍यातला नाही. उलट दुसर्‍यांपुढे तोच आपल्याला किती सांभाळून घेतो. क्षणात त्याच्याशी बोलण्याची तिची ईच्छाच गेली. "मी थोडावेळ ग्यालरीत बसतेय" असं म्हणून ती ग्यालरीतल्या टांगलेल्या झोपाळ्यावर जाऊन बसली.

सुहास अजूनही फोनवरच बोलत होता. सुधाचं घरातलं अस्तित्वच त्याने वजा करून टाकलं होतं. थोडावेळ ग्यालरीत बसल्यानंतर मोकळ्या हवेत सुधाला थोडं बरं वाटलं. थंड हवेत किंचीत काळ तिचा डोळा लागला. जाग आली तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते. बाहेर आता थोडी थंडी पडायला लागली होती. सुधा पुन्हा घरात  आली. सुहासने ओट्यावरचं सगळं साफ करून ठेवलं होतं. टिव्ही पण बंद होता. 'बहुतेक झोपायला गेला असेल' असा विचार करून सुधा बेडरूम मधे आली. सुहास बेडवर पडला होता. पण कुठलसं पुस्तक वाचत होता. सुधा हळूच त्याच्या बाजूला येउन बसली. "सुहास, असं रे काय करतोस. बोल ना माझ्याशी" पण सुहास अजूनही अबोला धरून होता. आता मात्र सुधाला त्याचा राग येऊ लागला होता. "आज असं काय विशेष आहे ? तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे ? जरा उशीर झाला म्हणून इतकं रागवायचं ? मी काही स्वतः मजा करण्यासाठी बाहेर गेले नव्हते ना ! आणि शिवाय मी माफीपण मागितली तुझी.. यु आर टेकिंग इट टू फार" सटसट गोळ्यांसारखी तिची वाक्य निघून गेली. पण सुहासवर त्याचा काडीचाही परिणाम झाला नाही. पुन्हा एकदा घडाळ्यावर नजर टाकून त्याने दिवा मालवला आणि कूस बदलून घेतली. सुधा बेडच्या एका टोकाला डोळ्यांवर हात टाकून पडून राहीली.

रात्री कधीतरी बेलच्या आवाजाने दोघांनाही जाग आली. "मी उठते" असं सुधा म्हणेपर्यंत सुहास उठलासुद्धा होता. सुधा बाहेर आली तेव्हा सुहास दार उघडत होता.

"मी इन्स्पेटर साळवी, आपण मि. साठे का?" सुहास आणि सुधा दोघही गोंधळून गेले होते. सुहासने मान डोलावली.

"मी दोन मिनीटं आत येऊ का?" साळवी म्हणाले. सुहासने मागं होऊन दार उघडलं. सुधा जरा बावरूनच गेली होती. सुहासच्या बाजूला उभी राहून ती साळवींना म्हणाली "काय झालं इन्स्पेक्टर साहेब?"

"सौ. सुधा साठे तुमच्या पत्नी का?" साळवींनी विचारलं तसं सुधा तडक म्हणाली "अर्थात. दिसत नाही का तुम्हाला?" सुहासने होकारार्थी मान हलवली.

साळवींनी सुहासच्या खांद्यावर थोपटत म्हटलं "आज संध्याकाळी त्यांच्या ऑफिसच्या इमारतीच्या जिन्यातून पाय निसटून त्या पडल्या, डोक्याला जबरद्स्त मार बसला आणि जागच्या जागीच त्यांचा मृत्यु झाला. त्याच्या ऑफिसमधून तुमचा पत्ता मिळाला. बॉडीची ओळख पटवायला तुम्हाला यावं लागेल."

"अहो काय वाट्टेल ते काय बोलताय तुम्ही!.. अरे सुहास मी इथेच आहे रे.. ती कोणीतरी दुसरीच बाई असणार.." सुधा ओरडत होती... आणि सुहासच्या तोंडून अजूनही शब्द फुटत नव्हता.