Tuesday, July 10, 2012

विश्वास (भाग - १)


सुमेधा रंगपटात आली तरी प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट चालूच होता. आज तिच्या नाटकाचा पन्नासावा प्रयोगही हाऊसफुल होता.

"एक्सिलंट ! माइंड ब्लोइंग परफॉर्मंस !!' टाळ्या वाजवतच रमेश आत आला. थकल्या चेहर्‍यावरचा मेकप पुसता पुसता आरशातूनच तिनं रमेशकडे पाहिलं. रमेशचा फ्रेश हसरा चेहरा पाहून तिचा सगळा थकवा कुठल्याकुठे पळून जात असे.

रमेशचा स्वभावही असाच होता. त्याच्या सहवासात आल्यावर क्षणभरातच तो कोणालाही आपलंस करून घेत असे. रमेश म्हणजे सुमेधाचा जुना मित्र. अगदी कॉलेजमधे असल्यापासून. कॉलेजमेधे त्यांचा मोठा ग्रूप होता. रमेश त्या ग्रूपचा प्राण. सुमेधाच काय पण कॉलेजमधल्या यच्चयावत पोरी त्याच्यावर फिदा असायच्या. पण अर्थात त्यावेळी कॉलेजमधल्या फटाकड्या पोरींच्या गर्दीतून त्याचं लक्ष सुमेधाकडे फारसं कधी गेलंच नव्हतं. यथावकाश कॉलेज संपलं, आणि बहुतेक वेळेला होतं त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात गुरफटत गेला. सुमेधा तिच्या उपजत अभिनयकौशल्यामुळे नाटकांतून कामं करू लागली. अगदी थोड्याच वर्षांमधे एक यशस्वी अभिनेत्री म्हणून सुमेधा नावारूपाला आली. रमेश कुठल्याश्या कंपनीत कारकूनी करत असल्याचं तिच्या कानावर आलं होतं. पण दोन वर्षांपूर्वी जेव्हा रमेश अचानक तिच्या घरी आला तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला. रमेशला तर प्रथम तिनं ओळखलंही नाही. दाढी वाढलेली, खप्पड गाल, एकेकाळचा हसरा गोड चेहरा पार काळवंडून गेला होता. चौकशी केल्यानंतर रमेशची नोकरी जाऊन जवळ जवळ एक वर्षं झालं होतं. दुर्दैवाने कुठेच नोकरी मिळत नव्हती. जवळचे असे कोणते नातेवाईक त्याला नव्हतेच पण जे होते त्यांनीही पाठ फिरवली होती. एके काळचे दोस्त आता ओळखही दाखवत नव्हते. अशा वेळी एका नाटकाच्या पोस्टरवर सुमेधाचं चित्र बघून त्याला तिची आठवण झाली आणि तिला भेटायला तो आला. सुमेधाने त्याची सगळी हकीकत ऐकली. सुमेधाच्या आईने त्याला खाउ-पिऊ घातलं. सुमेधाला त्याची अवस्था बघवली नाही आणि तिच्या मॅनेजरची जागा रमेशला मिळाली. तेव्हापासून रमेश तिच्या सोबत सावली सारखा राहू लागला होता. तिच्या प्रत्येक छोट्यात छोट्या गरजांची मनापासून काळजी घेत होता.

"दमलीस ?" रमेशने हळूवारपणे तिच्या डोक्यावर थोपटत विचारलं.

"थोडं पाणी देतोस?" रमेशने तत्परतेने तिला थंड पाण्याची बाटली दिली. दमल्यानंतर थंड पाण्याच्या एखाद्या ग्लासाने तिचं कधीच समाधान व्हायचं नाही. सरळ थंड पाण्याची बाटलीच तोंडाला लावायची तिची सवय. तिच्या अशा सगळ्या सवयी रमेशला आतापावेतो चांगल्या माहित झाल्या होत्या.

"आज खरंच खूपच छान काम झालं तुझं. शेवटच्या सीन मध्ये घाबरून थरथर कापतानाचा तुझा अभिनय तर इतका अप्रतिम होता की मलासुद्धा क्षणभर वाटलं की तू खरोखरच घाबरली आहेस की काय!" रमेश तिच्या जवळ बसत म्हणाला.

"रमेश...मला... " सुमेधाने वाक्य पूर्ण केलं नाही.

"काय गं? काय झालं? काही होतंय का?" रमेशने विचारलं

"रमेश, तुला आज तो पहिल्या रांगेत कोपर्‍यात बसलेला माणूस आठवतोय?"

"कोणाविषयी म्हणते आहेस?"

"अरे तो दाढीवाला? काळ्या रंगाचे कपडे घातले होते आणि डोळ्यांना मोठ्या फ्रेमचा चष्मा लावला होता तो?" सुमेधाच्या आवाजात भिती डोकावत होती.

"नाही गं. मला असा कोणी प्रेक्षकांत बसलेला आठवत नाहीये. काय झालं त्याचं?"

"मला.. मला त्या माणसाची फार भिती वाटत होती रे" सुमेधाच्या डोळ्यात पाणी उभं राहीलं.

"ए वेडाबाई, घाबरायला काय झालं? अगं आज पहिल्यांदा का तू दाढीवाला माणूस बघते आहेस? आजवर इतक्या प्रेक्षकांच्या पुढे इतक्या सगळ्या नाटकांमधून कामं केली आहेस तू. आजच असं का होतंय?"

"मी त्याला आधीपण पाहिलं आहे!"

"कुठे?"

"मागच्या आठवड्यात आपला नाशिक दौरा होता. तेव्हा तिथेही तोच माणूस होता!"

"काय सांगतेस काय? पण असेल कोणीतरी तुझा चाहता! त्यात घाबरण्यासारखं काय आहे?" रमेश स्वतःलाच समजावल्यासारखा बोलत होता.

"ह्म्म.. खरं आहे तू म्हणतो आहेस ते. जाऊ दे, आज मी खरंच खूप दमलेय. आज मला घरी सोडशील?" रमेशच्या चेहर्‍यावर काळजी बघून सुमेधा मनातल्या मनात सुखावली होती. 'रमेशला कोणतीही गोष्ट फार जास्त सिरियसली घ्यायची सवय आहे. तो उगाचच माझी काळजी करत बसेल.' असा विचार करून सुमेधाने तिच्या डोक्यातून त्या दाढीवाल्याचा विचार काढून टाकायचं ठरवलं.

"ऑफ कोर्स!" रमेश लगेच उठला, आणि तिचं सगळं सामान बॅगेत भरू लागला. सुमेधाने थोडा वॉश घेतल्यावर तिलाही जरा बरं वाटलं. गाडीने रमेशने सुमेधाला तिच्या पारल्याच्या घरी सोडलं.

"अरे आज गाडी घेऊन जा ना. आता कुठे तुला रिक्षा मिळणार आहे?" गाडी पार्क करण्यासाठी रमेशने गाडी पार्किंगच्या दिशेने वळवल्यावर सुमेधा म्हणाली. "नाहीतरी उद्या लवकर येणारच आहेस ना!"

"नको नको! तुझी गाडी घरी घेऊन गेलो तरी आमच्या चाळीपुढे कुठलं आलाय पार्किंग! रस्त्यावर गाडी लावली आणि गाडीला काही झालं तर मी कुठून भरून देणार आहे? त्यापेक्षा माझी अकरा नंबरची बसच मस्त !" सुमेधाकडे बघून हसून त्याने डोळे मिचकावले आणि वळून अंधारात दिसेनासा झाला.


सुमेधाने ब्लॉकचा दरवाजा उघडला. घरात आल्यानंतर अंधार असलेला तिला मुळीच आवडायचा नाही. त्यामुळे घरात एकतरी दिवा नेहमी लावलेलाच असयचा. तिची आई होती तेव्हा ठीक होतं. घरी आई वाट बघत बसायची. आपण दमून घरी येतो तेव्हा कोणीतरी आपली वाट बघत आहे ही जाणिव किती चांगली आहे, हे सुमेधाला आई गेल्यावरच समजलं. आईला जाऊन आज सहा महिने होत आले. आता घरात ती एकटीच. रिकामं घर खायला यायचं. त्यामुळे ती बहुतेक वेळ घराबाहेरच घालवायची. एक रमेश सोडला तर दुसरे कोणी मित्र मैत्रीणीही तिला नव्हत्याच. अर्थात नाटक सिनेमा धंद्यात असणार्‍यांना "मित्र मैत्रिणींची" कमतरता कधी भासत नसते पण सुमेधाच्या मैत्रीच्या व्याख्येत बसू शकतील असे मित्र तिला मिळाले नव्हते. वेगवेगळ्या पार्ट्यांना जाणे, लोकांशी मिळून मिसळून वागणे हे सगळं ती सुद्धा करायची पण फक्त एक शिष्टाचार म्हणून. कोणालाच एका ठराविक मर्यादेपेक्षा तिने जवळ येऊ दिलं नाही. अपवाद फक्त रमेशचा. रमेश जरी आवडत असला तरी तिने रमेशचा 'नवरा' ह्या दृष्टीकोनातून विचार केला नव्हता. रमेशनेही तिला कोणत्याही प्रकारे असं काही भासू दिलं नव्हतं. तिला रमेशमधला समजूतदार मित्रच फार आवडायचा.

नेहमी प्रमाणे रात्रीचं गरम दूध पिऊन तिने अंथरूणावर अंग टाकलं. दिवसभरातले प्रसंग डोळ्यांपूढून जायला लागले तशी ती पुन्हा अस्वस्थ झाली. रंगमंचावर असताना तिच्या डोळ्यांचा वेध घेणारे ते भेसूर डोळे तिला दिसू लागले.आज जरी त्या दाढीवाल्याचा चेहरा ती नीट बघू शकली नसली तरी रंगमंचावर असताना त्याचे भेसूर निर्विकार डोळे तिचा पाठलाग करत असल्याचं तिला जाणवत होतं. कितीही प्रयत्न करून सुमेधा शांत झोपू शकली नाही. शेवटी झोपेची गोळी घेतल्यावर थोड्या वेळाने ग्लानीतच झोपली.

सकाळी रमेशने दाराची बेल वाजवली तेव्हा सुमेधा झोपलेलीच होती. तीन चार वेळा बेल मारल्यानंतर सुमेधाने दरवाजा उघडताच रमेशचा पहिला प्रश्न आलाच "काय झालं गं? किती वेळ बेल मारत होतो मी. इतका वेळ कशी झोप लागली? तब्येत बरी आहे ना?"

"अरे हो हो! किती प्रश्न विचारशील? काल उशीरा झोप लागली, म्हणून उठायल उशीर झाला बाकी काही नाही!"

"आज सौदामिनीच्या शूटींगसाठी जायचं होतं नऊ वाजता. मी फोन करून त्यांना कळवतो आपल्याला उशीर होणार आहे ते. पहिल्या सिरियलचं शूटींग आहे मॅडम! उशीर करून चालणार नाही अजून!!" सुमेधाच्या डोक्यावर टप्पल मारत रमेश म्हणाला आणि फोन घेऊन गॅलरीत गेला.

स्टूडियोत पोहोचले तेव्हा दहा वाजले होते. पण नंतर शूटिंग पटपट आटोपलं. सुमेधा आणि रमेश स्टूडियोतल्या खुर्च्यांवर बसले होते तेवढ्यात सुमेधाचं लक्ष लांबच्या दरवाज्याकडे गेलं "रमेश रमेश अरे तो बघ!! "सुमेधा जवळ जवळ किंचाळलीच!

"कोण" रमेशने त्या दिशेने बघितलं!

"अरे असं काय करतो आहेस? तो बघ ना दरवाजात! तोच दाढीवाला"

रमेश धावत धावत दरवाज्यापाशी गेला. पण त्याला कोणीच दिसलं नाही.

"कोणीच नाहीये गं तिथे? मी बाहेर जाऊन पण पाहिलं, बाहेरच्या लोकांनापण विचारलं. कोणालाच कोणी दाढीवाला माणूस दिसला नाही!"

"म्हणजे मी खोटं बोलते आहे असं तुला म्हणायचंय का?" अतिशय दुखावलेल्या स्वरात सुमेधाने विचारलं

"अगं असं नाही. पण तुला काल नीट झोप पण लागली नव्हती, त्याचाच विचार करत होतीस ना! भास झाला असेल तुला."

"अरे भास नव्हता रे. तो खरंच तिथे उभा होता. मला त्या माणसाची फार भिती वाटतेय रे! त्याचे ते डोळे !! आई गं!" सुमेधाने ओंजळीत तोंड खूपसून घेतलं.

आता तिला कसं समजावायचं ते रमेशला समजेना. "सुमेधा, आपण पोलिसांकडे जायचं का?"

"नको पोलिसांकडे नको. पण तू माझ्यावर विश्वास ठेव! तो होता तिथे."

"बरं बरं. मी बघून घेतो त्याला. पुढच्या वेळेला दिसला तर मला सांग ! मी बरोब्बर हॅंडल करतो! ठिक आहे!? डोंट वरी!" शक्य तितक्या समजावणीच्या सुरात रमेश बोलला.

पुढच्याच आठवड्यात तोच प्रसंग पुन्हा घडला. ह्या वेळेला मध्यांतराचा आधीच सुमेधाला तो दाढीवाला दिसला. यावेळी प्रेक्षागृहाच्या दरवाज्याजवळच तो होता. विंगेत जाताच सुमेधाने रमेशला त्याच्या बद्धल सांगितलं. "दरवाज्याजवळच्याच खुर्चीवर तो बसलाय!" "ठीक आहे. आज बघतोच त्याला!" रमेशने तिला दिलासा दिला.

मध्यंतरानंतर नाटक सुरू झालं तेव्हा रमेश दरवाज्याजवळ उभा राहिला. सुमेधा स्टेजवर आली. रमेश दरवाजात उभा राहून सगळ्या प्रेक्षकांवरून नजर फिरवत होता. 'पण त्याला त्याच्या समोरच असलेला दाढीवाला का दिसत नाहिये? अरे रमेश असं काय करतो आहेस?' सुमेधाचं लक्ष संवादांमधून अगदी उडालं. विंगेत आल्यानंतर रमेशनेच तिला विचारलं, "बाहेर कोणी दाढीवाला नाहिये गं!"

"अरे असं काय करतोयस? तुझ्या पुढेच तर तो बसला होता. इतकंच काय तुझ्या पुढूनच तर तो सरळ दार उघडून बाहेरही गेला. आणि तू म्हणतोयस की तुला दिसला नाही?" सुमेधाचा धीर आता सुटला होता. भितीचं रुपांतर आता रागात व्हायला लागलं होतं.

"हे बघ सुमेधा, तुला खात्री वाटत नसेल तर आपण दरवाज्या बाहेरच्या स्टॉलवाल्याला विचारूया"

"चल"

अर्थात स्टॉलवाल्यालाही कोणी दिसलं नव्हतं. विषेशतः नाटक सुरू असताना कोणी बाहेर गेल्याचं त्याला नक्कीच कळलं असतं. सुमेधा पुन्हा एकदा तिच्या खोलीत जाऊन रडली. रमेशने मनातल्या मनात काही निश्चय केला आणि तिच्या खोलीचं दार ठोठावलं.

(क्रमशः)