Wednesday, January 19, 2011

मनाचे खेळ (भाग ३)

या पूर्वी:


भाग १

भाग २
अंगावर सरसरून  काटा आला. सगळ्या भावना बाजूला सारून मनात फक्त भीती व्यापून राहिली. मी दरवाज्याची कडी घट्ट धरून ठेवली... "वाचवा! वाचवा! कोणी आहे का ?" वेड्यासारखा जोरजोरात ओरडायला लागलो..... दरवाज्यावर भिंतींवर जोरजोरात हात पाय आपटून आवाज करत होतो.. कोणीतरी माझ्या मदतीला येइल...  शुद्ध कधी हरपली हे मला समजलं नाही..


शुक्रवार  
म्हणजे मला वाटतंय की आज शुक्रवार आहे. परवा शुद्धीवर आल्यानंतर मी घराताली विजेवर चालणारी प्रत्येक वस्तू तोडून फोडून टाकली आहे. फक्त हा टेबलावरचा दिवा तेवढा शिल्लक आहे. कॉम्पुटर फोन वेब-कॅम सगळंच. जी कुठली वस्तू कोणीतरी बाहेरून माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी वापर करता येऊ शकेल अश्या सगळ्या वस्तूंचा मी पार भुगा करून टाकला. मी स्वतः कॉलेज मधे कॉम्प्युटर इंजिनीयरिंग करतोय, त्यामुळे मला माहित आहे.. मी माझ्याबद्धलची माहीती दिल्याशिवाय .. म्हणजे माझं नाव, फोन नंबर, पत्ता... कोणतीच माहिती बाहेरून मला आली नव्हती. मी आत्तापर्यंत लिहिलेल्या डायरीची पानं सारखी चाळून बघतोय .. विचार कर करून डोकं खूप दुखायला लागलं आहे. क्षणात ती अज्ञात अनामिक भीती तर क्षणात स्वतःच्या ह्या वेडेपणाबद्धल चीड अशा दोन परस्पर विरोधी विचारांमधे गुंतत चाललो आहे.  कधीकधी तर माझी अगदी खात्रीच होते की कोणीतरी मला घराबाहेर काढण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो आहे. अगदी अनिताचा पहिला फोन आला तेव्हापासून... ती मला बाहेर येण्यासाठीच सुचवतेय. परवा इथे आली तेव्हापण दार उघडून बाहेर घेउन जाण्यासाठीच आली होती.
मी मनात पुन्हा पुन्हा झाल्या प्रसंगाची क्रमवारी लावण्याचा प्रयत्न करतो आहे. एखाद वेळी वाटतं, की मला पार वेड लागलं आहे. कारण कधी कधी असं होतं ना की रस्त्यांवर कोणी माणसं दिसत नाहीत... तुम्हाला हवं तेव्हा चॅटवर कोणी गप्पा मारायला नसतं... .. अगदी अचानकच कोणतारी वायरस तुम्हाला जंक ईमेल पाठवतो..   नक्कीच होऊ शकतं. पण लगेच दुसर्‍या क्षणाला असं वाटतं की हे असं होण्याची शक्यता किती असेल? लाखात एकदा.. आणि कदाचीत यामुळेच "त्यांना" मी अजून सापडलो नसेन. मी ह्या बिल्डिंगच्या गेटबाहेर अजून पडलेलो नाही. मी माझ्या खोलीची खिडकीसुद्धा पूर्ण उघडू शकत नाही. आणि परवा तो कॅमेरा बाहेर ठेवल्या ह्या खोलीच्याही बाहेर मी पडलेलो नाही. जर मी प्रथम अनिताला फोन केला नसता तर...."ते" जे कोणी असतील त्यांना मी इथे आहे हे कळलं ही नसतं ! तो फोन जो लागला नाही.. उलट "त्यांनीच" मला फोन करून माझं नाव विचारून घेतलं.
प्रत्येक वेळी जेव्हा मी ह्या घटनाक्रमाचा विचार करतो तेव्हा तेव्हा त्या अनामिकाच्या भीतीने अंग गारठून जातं. ते छोटं.. असंबद्धपणे लिहिलेलं ईमेल.. कोणाकडून होतं ते? कोणीतरी इतरांना सावध करण्यासाठी पाठवलं होतं का? "ते" येण्याआगोदर मला सावध करण्यासाठी मित्रत्वाचा सल्ला म्हणून ?? "स्वतःच्या डोळ्यांनी ....... त्यांच्यावर विश्वास ठेऊ नको... ते.. .." .. अगदी मला ज्या गोष्टीची भीती वाटतेय तेच शब्द ! "ते" कुठल्यातरी पद्धतीने काँप्युटर, मोबाईल फोन हॅक करून माझी माहिती गोळा करत आहेत.. आणि त्याचा उपयोग करून आणि माझ्या मित्र्-मैत्रीणींचे आवाज काढून मला बाहेर बोलावताहेत.
पण... "ते" घरात का घुसत नाहीत ? म्हणजे जर त्यांनी काल अनिताच्या रूपात येऊन दरवाजा वाजवला याचा अर्थ ती भुतांसारखे बंद दरवाज्यामधून आरपार जाऊ शकत नाहीत. ह्या बिल्डींगमधल्या खोल्यांचे दरवाजेपण मजबूत आहेत. मी स्वतः प्रयत्न केला तरी एकट्याने दरवाजा तोडू शकत नाही. बिल्डिंग जुनी असल्याचा फायदा. पण ह्या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की त्यांना माझ्याकडून काय हवंय? जर मला ठार मारायचं असेल तर कितीतरी इतर मार्ग आहेत.. अगदी सोप्पा उपाय म्हणजे भुकेने तडफडून मारणं. गेले काही दिवस मी फ्रिजमधलं उरलं सुरलं अन्न खाउन जगतोय.. पण कधितरी ते संपेलच. म्हणजे मला बाहेर काढून ते मारणार नसावेत.. मग का ? मृत्युपेक्षाही भयंकर असं काय आहे  त्यांच्या मनात? देवा! मी या नरकातून बाहेर कसा पडू??
दरवाज्यात कोणीतरी आहे वाटतं ! होय.. दरवाजा कोणीतरी वाजवतोय!
****
"मला विचार करायला एक दोन मिनिटं द्या ! मग मी बाहेर येतो" मी बाहेरच्या लोकांना सांगितलं. मी आता हे इथे लिहून फक्त यासाठी ठेवतोय की जेणेंकरून माझे विचार भरकटणार नाहीत. बाहेरून कोणाच्यातरी बोलण्याचा आवाज येतोय ! पण माझं वेड  मला स्वस्थ बसू देत नाहिये.  हो, मला समजतंय की माझे विचार एखाद्या मनोरुग्णासारखेच आहेत. पण त्यांना माझ्यापर्यंत पोहोचायला तीन दिवस लागले? तीन दिवस "ते" काय करत होते?? बाहेर अनिताचा आवाज पण येतोय. आणखी काही माणसं आहेत. दोन पोलीस आणि एक डॉक्टर... कदाचीत ह्या तीन दिवसांमधे माझ्या "शंकांची" उत्तरं "ते" तयार करत असावेत.. .डॉक्टर तरी त्यातल्या त्यात जास्त समजूतदारपणे बोलतोय. म्हणजे जर मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर त्याच्या बोलण्यातून माझ्या सर्व शंकांचं नीट निराकरण होऊ शकतंय.... जर मी विश्वास ठेवला तर...
डॉक्टर साठीच्या आसपासचा असावा... त्याच्या स्वरात जरब आणि समजूतदारपणाचं मिश्रण आहे. त्याचा आवाज मला आवडला... अगदी माझ्या बाबांसारखाच आहे त्याचा आवाज. मी माझ्या डोळ्यांनी कोणालातरी बघायला अगदी उत्सुक झालोय. त्याच्या मते मला सायबर-सायकोसिस.. म्हणजे आंतरजालिय्-मनोविकार (?)  झाला आहे.  त्याची साथच पसरलेय म्हणे जगभरात. लाख्खो लोक त्यामुळे आत्महत्या करत आहेत. हे सगळं एका ईमेल मुळे झालं जे "कसंतरी निसटलं"... आई-शप्पथ त्याने हेच शब्द उच्चारले... "कसंतरी निसटलं"... मला वाटतं की त्याला म्हणायचं होतं की ते एक स्पॅम मेल होतं.. पण माझ्या मनात शंकेचं भूत पुन्हा किंचाळू लागलं. नक्कीच "त्यां"च्या तोंडून खरं काय ते बाहेर पडलं होतं. तो डॉक्टर सांगत होता की... माझं हे वागणं हे ह्या रोगाची लागण झालेल्या इतर लोकांसारखंच आहे. एकटेपणामुळे  वाटणारी पराकोटीची भीती...  आणि त्यातून मग मनाचे खेळ सुरू होणे...सगळं फक्त इतर लोकांशी डायरेक्ट संपर्क न ठेवल्यामुळे. सगळी लक्षणं मला लागू पडत होती.  ह्या रोगाची लागण सुद्धा अशीच होते.. एखादा रुग्ण वेडाच्या भरात इतर लोकांना ईमेल किंवा फोनवरून इतर लोकांना संदेश पाठवतो. संदेश मिळणार्‍याने त्याचा विचार करायला सुरूवात केली की त्यालाही याची लागण होते.
त्याच्या बोलण्यातून त्या विचित्र ईमेलचं कारण मला समजलं. तसंच मी माझ्या फोनवरून सगळ्यांना पाठवलेला तो संदेशही आठवला. "गेल्या काही दिवसांत तुम्ही कोणाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय का ?"... म्हणजे या रोगाचा प्रसार मी सुद्धा नकळत केला होता. कदाचीत माझा संदेश वाचून आत्ता या झणी कोणितरी या भीतीला बळी पडत असेल. कारण त्या संदेशाचा अर्थ कोणीही कसाही लाउ शकेल.
डॉक्टर मला समजावत होते.. म्हणाले "तुझ्यासारखी एकलकोंडी मुलं या रोगाच्या जाळ्यात सहजच अडकतात.  शिवाय आजकालच्या जमान्यात माणसं एकमेकांना प्रत्यक्ष भेटतही नाहीत. त्यामुळे या रोगाचा प्रसार फार झपाट्याने वाढला आहे. 'मला आणखी एकाला गमवायचं नाहिये' !   "
एक मात्र मानलं पाहिजे.. त्याचं स्पष्टीकरण खरोखरच चांगलं होतं. माझ्या जवळ जवळ प्रत्येक शंकेचं उत्तर त्यानं दिलं होतं. अगदी योग्यप्रकारे..... मी दार बंद करून आत बसून राहण्यासाठी.. माझ्याच भीतीच्या आणि शंकांच्या जाळ्यात आणखी गुरफटण्यासाठी खरं म्हणजे आता कोणतंच कारण नव्हतं. बाहेर मला पकडून मरणापेक्षाही भयंकर अशी शिक्षा देण्यासाठी कोणी नाहिये! काही वेळापूर्वी या जगात आता मीच एक ह्या बंद खोलीत सुरक्षित उरलो आहे आणि कोणीतरी अनामिक शक्ती मला मृत्युपेक्षाही भयंकर नरकयातना देण्यासाठी मला ह्या सुरक्षित जागेतून बाहेर काढायला बघते आहे असं मला वाटत होतं. आता डॉक्टर मला दरवाजा उघडायला सांगताहेत... त्यांनी माझ्याबाबतीत घडलेल्या सगळ्या प्रसंगांच बरोब्बर उत्तर दिलं आहे.. त्यांची उत्तरं.. त्यांचं स्पष्टीकरण इतकं सडेतोड.. इतकं पर्फेक्ट ... अगदी ठरवल्यासारखं...
नेमक्या याच कारणासाठी मी आता दरवाजा मुळीच उघडणार नाही.
माझी खात्री कशामुळे पटेल? खरं काय आणि भ्रम कोणते हे मला कशामुळे समजेल? ह्या सगळ्या वायर्स, आणि नेटवर्क सिग्नल... ही आंतरजाल.. कुठून सुरू होतं?? हे काही खरं जग नाही.. आभासी आहे.. आणि असे आभास निर्माण करणं काहिच अवघड नाही... ईमेल , फोन वेब्-कॅम सगळं काही हॅक होउ शकतं... ईमेल, फोनवर ऐकू येणारा आवाज .. विडोयो चॅटवरचं दिसणं हे ही बनावट असू शकतं ! हे तर फक्त विजेचे तरंग आहेत .. त्यावर नियंत्रण मिळवणं फारसं अवघड नाहिये "त्यांना".
दारावर आता "ते" धडका मारताहेत.. "ते" थोड्याच वेळात दरवाजा तोडून आत येतील. आले तर बरंच आहे.. मी माझ्या डोळ्यांनी त्यांना पाहिन तरी... डोळ्यांनी... "स्वतःच्या डोळ्यांनी ....... त्यांच्यावर विश्वास ठेऊ नको... ते.. " .. एक मिनिट.. तो ईमेल मला माझ्या स्वत:च्या डोळ्यांवरही विश्वास ठेउ नको असं तर सांगत नव्हता ?? शेवटी डोळ्यांना दिसणारं चित्र म्हणजेसुद्धा मेंदुत उमटणारे एक प्रकारे विजेचे तरंगच नाही का? ... हो नक्कीच.. नाही .. "ते" मला असे फसवू शकणार नाहीत... मला खात्री केली पाहिजे.. डोळ्यांशिवाय....
तारिख / वार माहित नाही
मी रोज एक पेन आणि पेपर मागत होतो.. आज शेवटी मला मिळालं. अर्थात आता त्याने काही फरक पडणार आहे असं नाही. मी काय करू शकणार आहे?.. कोणाला सावध करणार आहे? डोळ्यांना लावलेली बँडेजेस आता माझ्या शरिराचा भागच झाली आहेत. पूर्वी होणार्‍या यातना आता जाणवेनाशा झाल्या आहेत. मला वाटतं की माझं हे शेवटचंच लिखाण असेल.. कालांतराने हाताला योग्य वळण राहणार नाही. मग मी लिहिलं तरी ते वाचता येईलच याची शाश्वती नाही. हे लिखाण म्हणजे.. आता. स्वतःला रमवण्यासाठीच करतोय. आणि हे माझं लिखाण या जगातलं शेवटचंच लिखाण असेल.. कारण या जगातील सगळी लोकं आधीच मेलेली आहेत. मेलेली...? किंवा त्यापेक्षाही वाईट ... ?
मी ह्या हॉस्पिटलच्या खोलीत एकटाच बसलोय.. खोलीला आतून मऊ असं पॅड लावलाय.. मी डोकं आपटून आत्महत्या करू नये म्हणून. "ते" मला खायला प्यायला आणून देतात. कधी कधी चांगल्या नर्सचं रूप घेऊन.. तर कधी म्हातार्‍या डॉक्टरचं रूप घेऊन.   त्यांना कदाचीत माहितेय की डोळे गेल्या पासून माझे कान भलतेच तल्लख झालेत.. म्हणून मग ते कधी कधी दरवाज्याबाहेर उभं राहून इतर विषयांवर एकमेकांत बोलतात.. काही डॉक्टर आणि नर्स घरच्या खाजगी गप्पा सुद्धा मारत असतात. ..... .कोण्या एका नर्सला दिवस गेलेत... एका डॉक्टरच्या बायकोचं बाहेर कुठेतरी लफडं आहे.... सगळं खोटं खोटं.. मला फसवण्यासाठी..ह्या सगळ्या बोलण्याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही..
पण मला जास्त त्रास होतो तो वेगळ्याच गोष्टीचा. ते अनिताचं रूप घेऊन येतात. हे रूप अगदी खरं वाटावं असंच आहे. आवाज अगदी अनिता सारखा... अगदी तिच्या आवडीचं सेंटही असतं.. स्पर्शसुद्धा तिच्यासारखाच जाणवतो. माझी खात्री पटावी म्हणून खोटे खोटे अश्रु डोळ्यात आणून ते बोलतात. जेव्हा त्यांनी मला इथे पहिल्यांदा आणलं तेव्हा ती म्हणत होती.. "संदिप! माझ्या राजा! अरे असं काय करतोस.. माझ्यावर विश्वास नाही का तुझा? माझं तुझ्यावर प्रेम आहे.... तु असं का वागलास? अजूनही मी तुझ्याशी लग्न करून तुझी काळजी घेईन! " .अजून बरंच काही.. . .ती खरोखरच अनिता आहे हेच त्यांना माझ्या मनावर ठसवायचं होतं. त्यांनी माझी खात्री पटवायचा आटापिटा केला.
इथे आल्यानंतरही मला बर्‍याचदा वाटलं की मी तरी इतकं निष्ठुरपणे कशाला वागतोय? अनिता.. जिच्यावर माझंपण प्रेम आहे तिच्यावर विश्वास मी का ठेऊ नये? पण ते सगळं अगदी बिनचूक, चपखल बसणारं ...टू पर्फेक्ट.. म्हणूनच ते खरं नव्हतं.. ते अनिताचं रूप घेउन दररोज येत होते. मग दोन तीन दिवसांनी एकदा.. मग काही आठवड्यांनी.. आणि मग शेवटी त्यांनी येणं बंद केलं. पण मला नाही वाटत "ते" इतक्या सहजा-सहजी हार मानतील. मला वाटतं त्यांचं हे वाट पहाणं सुद्धा त्यांचीच एक चाल आहे. मी जिवात जीव असे पर्यंत त्यांना शरण जाणार नाही. मला बाकिच्यांचं काय झालंय ते माहित नाही, पण माझी खात्री आहे की मी स्वतःहून त्यांना शरण आल्याशिवाय ते माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. जर असं असेल तर.. कदाचित.. मी त्यांच्या वाटेतला अडसरच असेन.. म्हणूनच ते माझ्या शरणागतीसाठी इतक्या युक्त्या काढत आहेत. कदाचीत अनिता अजूनही जिवंत असेल.. आणि कदाचीत माझ्यावर ताबा मिळवण्यासाठीम्हणून तिला जिवंत ठेवलं असेल... नाही.. मी कधीच हार मानणार नाही.. मरेपर्यंत नाही.
========================
डॉक्टरांनी संदिपने लिहिलेले पेपर हातात घेतले.. त्यावरची वेडीवाकडी अक्षरं  जेमतेम  वाचता येत होती...दिसत नसतानाही संदिपने इतकं लिहिलं होतं. डॉक्टरांच्या डोळयात अभिमानाची झाक दिसत होती. संदिपच्या कणखर वृत्तीचं.. ... एकाकीपणाने झुंज देण्याच्या विश्वासाचं  त्यांना खूप कौतूकच करावंसं वाटत होतं..अर्थात त्यांना माहित होतं की त्याचं वेड आता आटोक्यात येणं शक्य नव्हतं
कोणत्याही शहाण्या माणसात इतका कणखरपणा.. स्वतःवर इतका विश्वास कुठला असायला ?
  
डॉक्टरांना आनंद झाला होता... त्यांना संदिपच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायची होती. त्यांना जोराने ओरडून "त्यांना" सांगायचं होतं.. "तुम्ही हरलात!" ...
इतक्यात त्यांच्या डोक्यात बसवलेल्या चकतीमधून झिणझीण्या आल्या आणि एक तीव्र वेदना त्यांच्या चेहर्‍यावर उमटली.. एखाद्या कळसूत्री बाहूलीप्रमाणे पावले टाकत ते संदिपच्या खोलीत शिरले.. आणि त्याला हे सगळे त्याचा मनाचेच खेळ आहेत हे समजावून सांगू लागले.
(समाप्त)

Tuesday, January 18, 2011

मनाचे खेळ (भाग २)

या पूर्वी:
भाग १
पण..... अनिताबरोबरचं संभाषण मी परत आठवू लागलो. त्यात कसलीतरी गोम होती. कदाचीत तीनं ड्रिंक्स घेतली असल्यामुळे असेल.. पण तरीही तिचा स्वर मला जरा वेगळाच वाटत होता. ... हा... अर्थात... आत्तापर्यंत माझ्या हे लक्षातच आलं नाही.. लिहिण्यामुळे नक्कीच मदत होते. ती कुठल्याश्या पार्टीला गेली होती ना. मग फोनवर कुठलाच आवाज येत कसा नव्हता? जरी ती फोन करण्यासाठी म्हणून बाहेर गेली असेल... नाही तसंही नसणार.. कारण असं जरी समजलं तरी मग फोनवर बॅकग्राउंडला वार्‍याचा किंवा कसला तरी आवाज यायला हवा होताच ना. मला तरी असला कुठला आवाज ऐकू आला नाही. काहीतरी गडबड नक्किच आहे.

सोमवार 

काल रात्री कधी डुलकी लागली कळलंच नाही. आत्ता जरा फ्रेश झाल्यावर पुन्हा एकदा बिल्डींगच्या गेटपर्यंत जाऊन डोकाऊन आलो. आज विचार करताना कालचं माझं वागणं अगदीच अगदी हास्यास्पद वाटतोय मला. थोडा वेळ बाहेर चांगलं उन पडलंय. आता थोडावेळ इमेल चेक करतो, मग आंघोळ दाढी वगैरे करून जरा बाहेर पडतो. थोडं डोकं तरी ठिकाणावर येईल.

****
बाहेर पडणार इतक्यात विजेचा जोरदार कडकडाट ऐकू आला. आत्ता तर ऊन पडलं होतं.. ? लगेच इतकं आकाश भरून आलं? आता बाहेर पडण्यात काही अर्थ नव्हता. पण तरीही मी बाहेर कोणी दिसतंय का ते बघायला गेट पर्यंत गेलो. बाहेर फक्त मुसळधार पाउस आणि तुडुंब भरून वाहणारी गटारं. रस्त्यावर कोणीही नव्हतं. कालचे विचार परत मनात येऊ लागले आहेत.

*****

कोणीतरी ऑनलाईन आल्यामुळे कॉंप्युटरने बीप केलं. बघितलं तर मिलिंद. माझ्या कॉलेजमधलाच एक ओळखीचा मुलगा.. निदान थोडावेळ तरी त्याच्याशी विडियो चॅट करावं .. निदान कोणाचातरी चेहरा बघायला मिळेल म्हणून  मी माझ्या कपाटातून एक जुना वेबकॅम काढला.  मिलिंदला विडोयोवर येण्यासाठी सांगितलं. आधी तर तो तयार नव्हता पण नंतर आला. त्याचा चेहरा कसा दिसत होता कसं सांगू ? त्याच्या चेहर्‍यावर कुठलेही भाव नव्हते. ना आनंद ना राग.. अगदी कोरा चेहरा ठेउन तो बोलत होता... नाही बोलत मीच होतो.. तो फक्त हो किंवा नाही एवढीच उत्तरं देत होता.. पण जाता जाता त्याने माझा इमेल मागून घेतला.. इमेल वर टच मधे राहू असं म्हणून त्याने चॅट बंद केलं... आश्चर्यच आहे.. त्यानी मागच्याच आठवड्यात मला माझ्या प्रॉजेक्टच्या संदर्भात इमेल पाठवलं होतं. मग पुन्हा त्याला माझा इमेल कशाला हवाय ? कदाचित हरवला असेल.. किंवा तो आत्ता कामात असेल.. मी स्वतःला समजवायचा प्रयत्न करत होतो.. पण शंका मनातून जात नव्हतीच.

तेवढ्यात काँप्युटरवर पुन्हा बीप वाजली. ह्यावेळेला अनिताचं इमेल होतं. "पिझ्झा खायला जाउया ला? नेहमीच्याच ठिकाणी.. वाट बघतेय. लवकर ये."

अनिता.. तिची आणि माझी ओळख पहिल्यांदा वसंत नगरमधल्या मॉल मधे झाली.. एका कॅसेटस् च्या दुकानात.. दोघांनीही एकच कॅसेट एकाच वेळेला मागितली... नंतर हळूहळू परिचय  वाढला. तिच्याबरोबर तासन् तास बोलायला खूप आवडायचं.

अनिताला भेटायला घरा बाहेर पडणार इतक्या अजून एक इमेल आला. थांबून वाचला, त्याचे शब्द होते

"स्वतःच्या डोळ्यांनी ....... त्यांच्यावर विश्वास ठेऊ नको... ते.. .."

काय अर्थ आहे या शब्दांचा ? पुन्हा पुन्हा वाचून बघितलं. कोणितरी अगदी जिवावर उदार होउन शेवटचा संदेश बाहेर पोहोचू पाहात आहे.. असं उगाचच मला वाटून गेलं. ईमेल पूर्ण व्हायच्या आधीच.. काय झालं?  माझ्या शंकेखोर मनाला आता आणखीनच खाद्य मिळालं. इतर कुठल्याही दिवशी हे असलं ईमेल वाचून मी ताबडतोब डिलीट केलं असतं. पण आज .. आजची गोष्ट निराळी होती.

मला थोड्यावेळापूर्वीचं विडियो चॅट वरचं संभाषण आठवलं. मी अजून कोणालाही प्रत्यक्ष स्वतःच्या  डोळ्यांनी पाहिलं नव्हतं. .. आता माझ्या मनातल्या शंकेला भीतीचं मूर्तस्वरूप येऊ लागलं. कालच्या आणि आजच्या घटनांचा मी संगतवार विचार करून लागलो. प्रथम नेटवर्क सिग्नल असूनही अनिताचा नंबर लागला नाही.. लगेच मला आलेला राँग नंबर.. त्याला मी माझं नाव सांगितलं... मग अनिताचा फोन.  तसंच आज, विडियो चॅटवर मिलिंदने माझा ईमेल मागणं... आणि मग लगेचच अनिताचं ईमेल...म्हणजे कोणीतरी नक्कीच माझी माहिती काढून घेत आहेत... अनिता? ती पण त्यांना मिळाली असेल का? .नाही नाही.. अनिता अशी कशी वागेल? पण मग ?? "ते" मला घराबाहेर काढायला बघताहेत.. म्हणजे मी आयताच त्यांच्या तावडीत सापडीन..  म्हणूनच काल अनिता मला पार्टीसाठि बोलवत असणार.. आणि आज पिझ्झा साठी... "ते" नक्कीच मला शोधून काढतील.. अरे बापरे! मी काल फोनवर मी वसंतनगरपासून एका तासाभराच्या अंतरावर राहतो हे सांगितलं होतं. म्हणजे आता कोणत्याही क्षणी ते इथे येउ शकतील. कालपासून मी रस्त्यावरही कोणाला पाहिलं नाहीये.. आणि बिल्डींगमध्ये सुद्धा कोणी आल्या गेल्याची चाहूल लागत नाहीये.. अचानक कुठे गेले सगळे ?? नाही नाही.. असं कसं होईल ? माझ्याच मनाचे सगळे खेळ असणार.. मी शांतपणे विचार करतो.. ही वेड्यासारखी भीती संपवायलाच हवी.

****

विचार कर करून डोकं फुटायची पाळी आली आहे. प्रथम मी माझ्या खोलीच्या बाहेर माझा वेबकॅम सेट करून ठेवला. जेणेंकरून मला निदान पॅसेजमधे कोणी आलं तर दिसू शकेल. नंतर वेड्यासारखा खोलीभर फिरून मी कुठे नेटवर्क सिग्नल मिळतोय का ते बघितलं... बाथरूमच्या एका टोकाला अगदी थोडा सिग्नल मिळत होता. लगेच मला आठवत असलेल्या नसलेल्या सगळ्यांना मी मेसेज पाठवला... "गेल्या काही दिवसांत तुम्ही कोणाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय का ?" 

मी आता फक्त फोनवर उत्तराची वाट बघत होतो. कोणाचंही.. कसंही.. भले माझी चेष्टा मस्करी करणारं.. मला वेड्यात काढणारं का असेना... मला उत्तर हवं होतं... मला कोणी फोन केला तर नेटवर्क नसल्यामुळे तो कट होण्याची शक्यता होती.. म्हणून मग मी माझा फोन बाथरूमच्या त्या भिंतीजवळच ठेऊन दिला..  

किती वेळ मी नुसताच बसून होतो कोणास ठाऊक. उत्तर कोणाचंच आलं नव्हतं. मी फोनवर माझ्या इतर मित्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण नेटवर्क सिग्नल नीट मिळत नसल्यामुळे तो होऊ शकला नाही. मग काँप्युटरवरच्या चॅट लिस्ट्मधे पाहिलं.. फार कोणी ऑनलाईन नव्हते आणि जे होते त्या सगळ्यांना मी मेसेज पाठवला. पण तिथेही कोणाचं उत्तर आलं नाही.  माझा धीर आता अगदीच सुटत चालला होता.  माझ्या ईमेल लिस्टमधल्या सगळ्या लोकांना "मला प्लिज एकदा तरी भेटून जा!!! " असा ईमेल पाठवला..  तो वाचणार्‍याला माझ्याबद्धल काय वाटेल हा विचार करण्याच्या पलिकडे मी गेलो होतो. मला कोणीतरी भेटायला हवं होतं.

मंगळवार

फोन वाजतोय.. पळत पळत बाथरूममधे ठेवलेला फोन मी उचलून कानाला लावला. नेटवर्क जाउ नये म्हणून शक्य तितकी मान वाकडी करून सिग्नल जास्त मिळेल अशा प्रकारे उभा राहून बोलत होतो. अनिताचा फोन होता. माझी तिला खूप काळजी वाटत होती.होता.तिच्या म्हणण्याप्रमाणे माझ्याशी संपर्क साधण्याचा तिने खूप प्रयत्न केला. ती मला भेटायला माझ्या घरी येतेय. हो.. आज तिला माझा पत्ता ठाऊक आहे.. मी न सांगता... मला माझीच लाज वाटायला लागली. ती इथे येण्याआधी ही डायरी मी फाडून टाकणार आहे. उगाच कोणी वाचायला नको. तरीही मी हे का लिहितोय ते मला समजत नाहिये. कदाचीत इतके दिवस कोणाशीच न बोलल्यामुळे माझ्या विचारांना व्यक्त करायचं हेच एक साधन उरलं आहे. .म्हणून ? ते काही असो.. अनिता येणार म्हणून थोडं बरं वाटतं आहे. आरशात माझा अवतार अगदी बघवत नाहिये.. नीट झोप न झाल्यामुळे डोळ्यांखाली खूप काळं झालंय.. केस अस्ताव्यस्त..  दाढी वाढलेली. अगदीच आजारी माणसासारखा दिसतोय मी.

माझी खोलीसुद्धा अगदी अस्ताव्यस्त झाली आहे. पण आता खोली आवरायला वेळ नाही. असू दे तशीच ! मी इतके दिवस कसे काढले हे समजेल तरी तिला. असो... 

दुसर्‍या कोणाचं उत्तर येण्याआधी अनिताचं उत्तर आलं म्हणून मला जरा बरंच वाटतंय. ती खरंच माझी काळजी करत असणार.  तिच्या आठवणींबरोबर मन खूप हलकं झालं. दरवाजा वाजतोय.. अनिताच असेल.
****

मी दरवाजा उघडणार इतक्यात कॉप्युटरवर माझं लक्ष गेलं. दरवाज्याबाहेर ठेवलेल्या वेब्-कॅमवरून मला कोणीच दिसत नव्हतं. अनिता येताना सुद्धा दिसली नव्हती. कदाचीत मी तो नीट ठेवला नसेल.. किंवा हलला असेल. म्हणून मी दरवाज्याजवळ जाउन मोठ्या आवाजात म्हटलं ... "अनिता! अगं दरवाज्यात मी एक वेब्-कॅम ठेवेलेला.. दिसतोय? जरा तो नीट ठेवशील ? मला त्यात तू दिसत नाहियेस"  ... थोडा वेळ झाल्यावर कॅमेरामधून तिचा चेहरा मला कॉम्प्युटर वर दिसू लागला...

"हाय! हे काय नविनच?" अनिताचा परिचीत स्वर कानी पडला. तीच्या चेहर्‍यावर आश्चर्य दिसत होतं. 

"माझ्या खोलीच्या दाराला काही पीप-होल नाहिये. म्हणून मग  हा कॅमेरा लावला. गेले काही दिवस मला थोडं बेचैन वाटत होतं.. "

"ह्म्म... नक्कीच... आता काही काळजी करू नकोस.. दार उघड."

तिच्या स्वरांमधे अधीरता होती.. काळजी नव्हती. मी जरा भांबावलो. ती नक्की अनिताच आहे हे मला कसं कळणार?

"अनिता... एक गंमत म्हणून विचारतो...एखादा कूटप्रश्न विचारतात ना तसं.... फक्त तुला आणि मलाच माहित असलेली अशी एखादी  गोष्ट सांग बरं! तू तूच आहेस हे सिद्ध करण्यासाठी"

तिच्या चेहर्‍यावर थोडी रागाची छटा दिसू लागली.

"संदिप ! काय हा फालतूपणा!! " थोड्या वेळाने ती म्हणाली... "अं.. ठिक आहे. आपण वसंतनगर मधल्या एका मॉलमधे भेटलो. एका कॅसेटस् च्या दुकानात.. दोघांनीही एकच कॅसेट एकाच वेळेला मागितली... नंतर हळूहळू परिचय  वाढला."

मी सुस्कारा टाकला.. तीने जे सांगितलं ते अगदी बरोबर होतं. मी तरी किती मूर्ख. अनितावर संशय मी कसा काय घेतला? तीची माझी भेट कशी झाली हे मी कोणालाच सांगितलं नव्हतं. जर मला वाटत असल्याप्रमाणे कोणी मला घराबाहेर काढण्याचं षडयंत्र रचत असेल तर त्यांनाही ह्या घटनेबद्धल कसं काय कळणार होतं?

"बरोबर! मी दार उघडल्यावर सगळं तुला सांगतो! जस्ट एक मिनिट" मी हसून म्हणालो.

पटकन बाथरूम मधे जाउन मी केस विंचरले. कपडे नीट केले. दाढी करायला आता अर्थात वेळ नव्हता. पण तिला माझी अवस्था समजेल. स्वतःशीश हसत विचार करत मी पटपट बाहेर आलो. एक हात दरवाज्याच्या कडीवर ठेउन मी एकवार माझ्या खोलीकडे नजर टाकली. सगळं सामान पसरलं होतं...  इतक्यात माझं लक्ष ह्या डायरीवर गेलं. मी मघाशीच लिहिलेले शब्द मला आठवले. मी अनिताच्या पहिल्या भेटीविषयी मघाशीच लिहिलं होतं.. तेच शब्द अगदी तस्सेच अनिताने म्हणून (की वाचून) दाखवले.. पण कसे?? मग एकदम मला आठवलं.. मी डायरी लिहित असताना माझा वेबकॅम मी टेबलवर डायरीच्या बाजूलाच ठेवला होता.... मी मिलिंदशी बोलण्यासाठी बाहेर काढला होता.. म्हणजे.. मी जे काही केलं.. जे काही लिहिलं... ते सगळं "त्यांना" कळलं असणार..... .
अंगावर सरसरून  काटा आला. सगळ्या भावना बाजूला सारून मनात फक्त भीती व्यापून राहिली. मी दरवाज्याची कडी घट्ट धरून ठेवली... "वाचवा! वाचवा! कोणी आहे का ?" वेड्यासारखा जोरजोरात ओरडायला लागलो..... दरवाज्यावर भिंतींवर जोरजोरात हात पाय आपटून आवाज करत होतो.. कोणीतरी माझ्या मदतीला येइल...  शुद्ध कधी हरपली हे मला समजलं नाही..

(क्रमशः)

पुढचे भाग:
भाग ३

Friday, January 14, 2011

मनाचे खेळ (भाग १)

रविवार
मी आज हे कॉम्प्युटरवर टाईप न करता कागदावर का लिहितोय हे मला नक्की सांगता येणार नाही. गेल्या काही दिवसांपासून मला फार बेचैन वाटतंय. म्हणजे माझा कॉम्प्युटरवर विश्वास नाही असं नाही... पण.... मला वाटतं की इथे कागद पेन घेउन लिहिल्यामुळे माझे विचार मला थोडे नीट ऑर्गनाइझ करता येतील असं वाटतंय. इथे लिहिलेलं आपोपाप  नाक्किच बदलणार नाही .. कागद नाही म्हटलं तरी कॉम्प्युटरपेक्षा थोडे टँजिबल .. नाही का? मनात झालेला हा विचारांचा गुंता सोडवायला थोडी मदत होईल का ते बघायचं आहे.

माझ्या ह्या छोट्याश्या खोलीत धड हातपाय मोकळे करायलापण जागा नाहीये.  कदाचित हाच प्रॉब्लेम असेल. माझ्या सध्याच्या बजेटमधे मला यापेक्षा चांगली जागा ह्या एरियात मिळणारही नाही. ही खोली ग्राऊंडफ्लोअरवरच्या कोपर्‍यातली... एखाद्या बॅचलरची रूम जशी असते तशीच. सामान बरचसं अस्ताव्यस्त पडलेलं. एकच खिडकी. त्यातून धड उजेडही येत नाही.  बिल्डींगच्या कुंपणाची उंच भिंत खिडकीच्या इतकी जवळ आहे की खिडकी असून नसल्यासारखीच आहे. खोलीत सतत अंधार. रात्र आणि दिवस एकमेकांत मिसळून जातात या खोलीत. मी गेले बरेच दिवस घरातून बाहेर पडलेलो नाही. म्हटलं की हे प्रॉजेक्ट पूर्ण करावं. म्हणून दिवस रात्र कॉम्प्युटरपुढेच बसून काम करत बसलोय. तासन् तास कॉम्प्युटरच्या स्क्रीन कडे बघून कोणालाही चमत्कारिक भास होउ शकतात... पण मला वाटतं की तेवढच कारण नाहिये.
हे असं काहितरी चमत्कारिक घडत असल्यासारखं वाटणं नक्की कधी सुरु झालं ते नीटसं आठवत नाहिये. खरं तर मला कोणी विचारलं  की चमत्कारिक म्हणजे नक्की काय? तर मला तेसुद्धा धडपणे सांगता येणार नाही. मी कित्येक दिवसांत कोणाशी बोललोच नाहिये. हाच पहिला विचित्र विचार माझ्या मनात आला. मी नेहमी ज्या लोकांशी चॅटवर बोलतो ते सगळे ऑफलाईन किंवा "अवे" आहेत. माझ्या चॅट मेसेजेसला कोणाचंच उत्तर आलेलं नाही. सगळ्यात शेवटी आलेलं इ-मेल सुद्धा तीन दिवसापूर्वीचं आहे. ते सुद्धा स्पॅम.  फेसबूकवर कोणतीच अपडेट नव्हती. कोणाला फोन करायचा म्हटला तर या खोलीत धड नेटवर्क मिळत नाही. ह्म्म... हेच करतो. बाहेर पडून कोणालातरी फोन करतो. कोणातरी माणसाचा आवाज तरी ऐकायला मिळेल.
नाही... बाहेर जाउन फोन करण्याचा बेत काही तडीस गेला नाही. भीतीचा भर ओसरल्यावर आता मला माझीच लाज वाटतेय. मी क्षुल्लक गोष्टींना उगाचच घाबरतोय असं वाटतंय.

बाहेर पडण्यापूर्वी एकदा आरशात डोकावलो. दोन दिवस दाढी न केल्यामुळे खुंट वाढले आहेत पण तरीही दाढी न करता आणि अंगावरचा शर्टही न बदलता पडलो खोलीच्या बाहेर आलो. म्हटलं फक्त एक कॉलच तर करायचा आहे. कोणाशी तरी बोलायला मिळालं पाहिजे होतं.

मी खोलीचं दार हळूच उघडलं.. आवाज न करता... उगाचच अनामिक धास्ती मनात वाटत होती... जणू सगळे कुठेतरी गायब झालेत आणि मी एकटाच मागे उरलोय... विचित्रच...  दोन तीन दिवसात कोणाशी न बोलल्यामुळे असेल असं माझं मलाच समजावलं. खोलीबाहेरच्या अंधार्‍या पॅसेजमध्ये मी डोकाऊन पाहिलं. त्या पॅसेजच्या एका टोकाला असलेल्या एक्झॉस्ट फॅनचा आवाज त्या पॅसेजमध्ये भरून राहिला होता. दुसर्‍या टोकाला बिल्डिंगचं बंद लोखंडी गेट होतं.

मी आवाज न करता खोलीचं दार बंद करून गेटच्या दिशेने चालू लागलो. चालताना आवाज होणार नाही याची काळजी मी घेत होतो. असं मी का करत होतो ते मला माहित नाही. पण त्या पंख्याच्या आवाजाला धक्का न लावता चालण्यात मला थोडं समाधान मिळत होतं.  मी गेटपर्यंत आलो आणि गेटच्या छोट्या खिडकीतून बाहेर डोकाऊन बघण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर कोणीतरी दिसेल ही माझी कल्पना साफ फोल ठरली. बाहेर बराच अंधार होता. रात्रीचे दोन्-अडिच वाजल्या सारखा... मी मोबाईल वर वेळ बघितली. .. रात्रीचे अकरा वाजले होते... खरं म्हणजे अकरा ही वेळ तशी मधलीच.. म्हटलं तर उशीर म्हटलं तर लवकर..  रस्त्यावर लांब एक सिग्नलचा पिवळा दिवा उघडबंद होत होता. शहरांतल्या लाईट आणि धुरामुळे थोडं उजळलेलं करड्या रंगाचं आकाश.. बस्स. उनाडपणे वाहणार्‍या वार्‍याच्या घुमण्याच्या आवाजाशिवाय  कुठलाच आवाज येत नव्हता.

मी बाहेर न जाण्याचा निर्णय घेतला.

त्याऐवजी मी मोबाईल फोन खिडकीच्या जवळ नेला आणि नेटवर्क मिळतंय का ते पाहायला लागलो. नेटवर्क सिग्नल थोडेफार मिळत होते. कोणाचातरी आवाज ऐकायला मिळणार म्हणून मी थोडं सुखावल्याचं मला आठवतंय. काही कारण नसताना मला वाटण्यार्‍या भीतीचं मलाच हसू आलं. मी पटकन स्पीड डायलवर ठेवलेल्या अनिताचा नंबर लावला. फोनची रिंग एकदा झाली आणि फोन कट झाला. .. की केला??..थोडा वेळ काहिच झालं नाही. मी जवळ जवळ पाच मिनीटं फोन लावायचा प्रयत्न केला. पण नंतर तो नाद सोडून दिला. नेटवर्क पुन्हा चेक केलं तर सिग्नल मिळत होता. मी बघत असतानाच माझाच फोन वाजला. त्या शांततेत फोनचा आवाज ऐकून मी   दचकलोच. मी फोन कानाला लावला.

"हॅलो ?" मी हळूच अंदाज घेत म्हणालो.

"अं... कोण बोलतंय?" पलिकडून कोणीतरी पुरुषाचा आवाज आला. कोणाचा ते काही मला ओळखू येईना.
"संदिप" मी गोंधळून उत्तर दिलं.
"ओह सॉरी... राँग नंबर" असं म्हणून त्याने फोन ठेऊन दिला.

मी फोन बंद केला. ह्यावेळी मला आलेल्या राँगनंबरचं पण मला आश्चर्य वाटलं. मी फोनमध्ये कॉल-लीस्ट चेक केली. अन्-नोन नंबर अशी नोंद होती. मी त्याचा विचार करत असतानाच फोन पुन्हा वाजला. ह्या वेळेला मी प्रथम नंबर बघितला. पुन्हा अन्-नोन नंबर... पण  वेगळा. मी फोन रिसिव्ह करून कानाला लावला पण ह्या वेळेला मी  काहीच बोललो नाही. पलिकडून कुठलाच आवाज येत नव्हता... पण कोणीतरी आहे हे मात्र जाणवत होतं. थोड्या वेळाने माझ्या ओळखीचा आवाज आला.

"संदिप?" एक शब्द...पण आवाज अनिताचा होता हे ओळखायला पुरेसा होता. मी समाधानाचा सुस्कारा टाकला.

"हाय! तू आहेस होय." मी म्हणालो.
"मी नाहीतर कोण असणार?" ती नेहमीच्या अवखळ स्वरात म्हणाली. "ओह बरोबर.. हा नंबर ना... मी इथे पार्टीला आलेय वसंत्-नगर मधे. आणि तू फोन केलास तेव्हाच माझ्या फोनची बॅटरी डाउन झाली. म्हणून दुसर्‍या फोनवरून करतेय."
"ओह ओके"
"तू कुठे आहेस?"
मी माझ्या आजूबाजूच्या भकास अंधार्‍या भिंतींकडे पाहात म्हटलं. "घरीच, मी सहजच फोन केलेला. कंटाळा आलेला म्हणून. मला वाटलं नव्हतं इतका उशीर झाला असेल."
"मग तू इथे ये ना!"
"नाही.. नको.... आत्ता रात्रीचं बाहेर पडून एकटं तिथपर्यंत यायचा कंटाळा आलाय." मी हळूच गेटच्या खिडकीतून बाहेर पडत म्हटलं. नाही म्हटलं तरी बाहेरचा त्या धूसर अंधाराची मला थोडी भीतीच वाटत होती. "मला वाटतं मी परत माझं प्रॉजेक्ट्चं काम सुरू करतो.. किंवा थोडा वेळ डुलकी काढीन."
"काहीतरीच काय! मी तुला घ्यायला येऊ का? तुझं घर वसंत्-नगर पासून जवळच आहे ना?" तिने विचारलं... परत माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
"तू ड्रिंक्स घेतली आहेस का?" मी आवाज शक्य तितका नॉर्मल ठेऊन तिला विचारलं "तू कितीतरी वेळा माझ्या घरी आलेली आहेस ना?"
"अरे हो रे!" मधेच ती म्हणाली... थोडीशी वैतागल्यासारखं ती म्हणाली.  "म्हणजे मला वाटतं मी चालत तर तिथपर्यंत येउ शकत नाही.. बरोबर?" तिच्या आवाजावरून ती कसलातरी अंदाज घेतेय असं मला जाणवलं.
"येऊ शकतेस.. फक्त जवळ जवळ एक तास चालायला लागेल." मी जरा हसतच सांगितलं.
"ह्म्म. ओके, चल मला जायला हवं.. होपफुली तुझं काम लवकर संपेल मग आपण धमाल करू.. बाय" ती म्हणाली.. आणि तिनं फोन ठेवला.

मी फोन बंद केला. पॅसेजमधल्या पंख्याचा आवाज पुन्हा सगळीकडे भरून आला. दोन वेगवेगळे कॉल आणि बाहेरचा भीषण अंधार... माझ्या डोक्यावर परिणाम होतोय का?  कदाचीत खूप गूढकथा वाचल्याचा हा परिणाम होता. मला प्रत्येक गोष्ट शंकास्पद आणि चमत्कारिक वाटत होती. कुठलीतरी गूढ अज्ञात शक्ती माझ्यावर पाळत ठेउन आहे. आणि मला किंवा  माझ्यासारख्या इतर एकट्या लोकांना भ्रमिष्टपणाच्या दरीत ढकलून देणार आहे... अशी कल्पना मला सुचली. मला माहित आहे की माझी ही भीती थोडी हास्यास्पदच होती, अस्वाभाविक होती. पण तरीही त्या काळोखात उभं राहायची मला भीती वाटायला लागली. पट्पट  चालत मी माझ्या रूमपर्यंत आलो. दार लाऊन घेतलं. घरात आल्यानंतर .. त्या बंद खोलीत मला जरा सुरक्षित वाटलं. अर्थात ही डायरी लिहिल्यामुळे सुद्धा थोडी भीती कमी व्हायला, सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत हे स्वत:ला पटवायला मदत होते.  अर्धवट विचार आणि शंका दूर होतात आणि फक्त कोरडे स्पष्ट फॅक्ट्स तेवढे उरतात. सगळं ठिक आहे.. नेहमी सारखंच चाललंय.... पण...

पण..... अनिताबरोबरचं संभाषण मी परत आठवू लागलो. त्यात कसलीतरी गोम होती. कदाचीत तीनं ड्रिंक्स घेतली असल्यामुळे असेल.. पण तरीही तिचा स्वर मला जरा वेगळाच वाटत होता.  ... हा... अर्थात... आत्तापर्यंत माझ्या हे लक्षातच आलं नाही.. लिहिण्यामुळे नक्कीच मदत होते. ती कुठल्याश्या पार्टीला गेली होती ना. मग फोनवर कुठलाच आवाज येत कसा नव्हता? जरी ती फोन करण्यासाठी म्हणून बाहेर गेली असेल... नाही तसंही नसणार.. कारण असं जरी समजलं तरी मग फोनवर बॅकग्राउंडला वार्‍याचा किंवा कसला तरी आवाज यायला हवा होताच ना. मला तरी असला कुठला आवाज ऐकू आला नाही.   काहीतरी गडबड नक्किच आहे.

(क्रमशः)


पुढचे भाग:
भाग २
भाग ३


Wednesday, January 5, 2011

असहाय्य

मला त्यांनी दत्तक घेतलं होतं... नाही "पाळलं होतं" हा शब्दप्रयोग जास्त बरोबर आहे. मला जन्म देणारी आई मला आठवत नाही. पण माझी काही तक्रार नाही. हे नविन घर मला आवडलं होतं. बहुतेक सगळे माझ्याशी चांगले वागत होते. मला चांगलं खायला मिळत होतं, राहायला चांगलं ऐसपैस घर होतं. विशेष म्हणजे मी रात्री उशीरापर्यंत जागत राहिलो तरी मला कोणी बोलायचं नाही.

तुम्हाला घरच्यांबद्धल सांगतो, प्रथम माझी आई.... सुशीला नाडकर्णी. आई माझे खूप लाड करायची. सुरवातीला मी तिला आई म्हणायला  जरा घाबरत होतो, पण काही दिवस गेल्यावर मग सर्रास आई म्हणायला लागलो. पण मला वाटतं तिला त्यात काही वेगळेपण जाणवलंही नाही. बरेचदा ती स्वतःच्या तंद्रीतच असायची. पण कशीही का असेना, ती खूप चांगली होती. मला वाटतं, मला घरात घेण्याचं तिनंच सुचवलं असावं. कधीकधी मी तिच्या मांडीवर डोकं ठेऊन दिवाणखान्यात टि.व्ही. बघत बसायचो, तेव्हा ती तिच्या नाजूक बोटांनी माझ्या मानेला गुदगुल्या करायची, किंवा पाठीवरून हात फिरवत राहायची. अगदी सिनेमात दाखवतात ना तश्शीच होती माझी आई.

आणि मग माझे बाबा. त्यांचं नाव  वामन नाडकर्णी. त्यांना मी कधीच आवडलो नाही. मी त्यांनासुद्धा "बाबा" म्हणायला लागलो होतो. बर्‍याच वेळा त्यांच्या समोर समोर करायचो जेणेकरून त्यांनी माझ्याकडे बघावं. माझ्या पाठीवर थाप मारावी. पण नाही. मी कितीही प्रयत्न केला, तरी त्यांनी माझ्याकडे रागाशिवाय इतर कुठल्याही नजरेने पाहिलं नाही. ते माझ्यावर कधीच प्रेम करणार नाहीत हे मी समजून चुकलो होतो, मग मीही त्यांना टाळू लागलो. बाबांची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे,  त्यांची शिस्त. स्वतःच्या मुलीला सुद्धा चूक झाल्यावर फटके द्यायला ते मागेपुढे बघत नसत. तिथे माझी काय कथा? सुरवातीला मला शी शू करताना बाथरूम मधे जायची आठवणच राहात नसे. मग ते  मला अस्सा जोरदार रट्टा देत, की मी एकदम कळवळून जात असे. असो, पण एक मात्र मान्य केलं पाहिजे, की त्यांच्या या धाकामुळे मी एक चूक पुन्हा कधीच करत नसे.

सगळ्यात शेवटी माझी बहिण, अनू. मी या घरात आलो तेव्हा अनू सुद्धा लहानच होती. माझ्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठी असेल. म्हणजे तसे आम्ही साधारण एकाच वयाचे होतो. ती साधारण सात आठ वर्षाची असावी. माझी आणि तिची चांगलीच गट्टी जमली होती. अगदी जीवलग मित्र्-मैत्रीणींसारखी. बर्‍याचदा संध्याकाळी एकमेकांशी गप्पा मारताना किंवा मागच्या बागेत चेंडूशी खेळताना किती वेळ गेला ते सुद्धा कळायचं नाही. अर्थात गप्पांमधे तिचीच बडबड असायची. मी मुकाट ऐकत बसायचो कारण तिची बडबड ऐकायलाही मला खूप आवडायची. एकूण आमचं एकमेकांशी मस्त जमलं होतं. त्या घरात मला राहायला अशी वेगळी खोली नव्हती त्यामुळे मी दिवसभर मी बाहेरच्या दिवाणखान्यातच असायचो. रात्र अनुच्या खोलीतच माझी गादी घातली होती. मला वेगळी खोली नसल्याचं मला काहीच सोयरसुतक नव्हतं. कारण रात्री उशीरापर्यंत अनुशी बोलायला मिळायचं मला. शिवाय एक भाउ म्हणून तिचं रक्षण केलं पाहिजे असंच मला वाटायचं.

पण एका रात्रीत सगळं चित्रच बदललं. ती रात्र मी कधीच विसरणार नाही. त्या संध्याकाळी मी टीव्ही बघता बघता कोचाजवळ बसून डुलक्या देत होतो.  अनू दरवाजा धाडकन् उघडून घरात शिरली... नेहमी प्रमाणेच. दरवाज्याचा आवाज ऐकून मी ही जागा झालो. आणि मी दरवाज्यापर्यंत गेलो. तो दिवस बुधवार होता. मला वेळ आणि तारखा फारशा लक्षात राहात नाहीत. अगदी स्पष्टच सांगायचं तर मला घड्याळसुद्धा कळत नाही. पण तरीही तो बुधवार होता हे मी सांगू शकतो कारण अनू त्या दिवशी उशीरा आली होती. दर बुधवारी तिचा कुठलासा क्लास असतो त्यामुळे  घरी यायला उशीर होईल असं मला प्रत्येक बुधवारी सांगायची. तिच्या मागून थोड्या वेळाने आई बाबापण त्यांच्या ऑफिसमधून परत आले.

"झोप झाली का बेट्या?" आईनं  डोक्यावर हात फिरवत विचारलं, मी नुसतच डोकं हलवलं तोवर आई तिच्या रूममधे गेली. आईचं विचारणं हे असंच... माझ्याकडून कसल्याही उत्तराची तिला अपेक्षाच नसायची.   मी तिच्या मागेमागे तिच्या रुमकडे जायला लागलो तेवढ्यात "काही मागे मागे जायचं नाहिये" बाबांचा करडा आवाज कानावर आला. "मी सहज जात होतो" मी तोंडातल्या तोंडात पुटपुटलो. बहुदा त्यांनी ऐकलं नसावं कारण पाठीवर फटका पडला नाही. मी आणि अनू तिच्या रूममधे आलो. अनूने तिची बडबड चालू केली. दिवसभराचा आढावा. तिला इतकं बोलताना धाप कशी लागत नाही याचंच मला आश्चर्य वाटायचं. पण तिला वाईट वाटू नये म्हणून मी शांतपणे बसून तिचं बोलणं ऐकत होतो. तासाभरानंतर आम्ही पुन्हा दिवाणखान्यात टि.व्ही. बघायला म्हणून आलो. मी टुण्णकन् उडी मारून तिच्या शेजारी कोचावर बसलो. माझ्या बालिशपणाकडे एक तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकून तिने रिमोटवरून बटनं दाबायला सुरवात केली. जवळ जवळ  दोनेक तास टिव्ही बघण्यात गेला. अनू तशी चांगली मुलगी होती. त्यामुळे कार्टून आणि धामधूम गाण्यांचे कार्यक्रम किंवा आईप्रमाणे रटाळ सिरियल वगैरे न बघता ती डिस्कवरी, अ‍ॅनिमल प्लॅनेट वगैरे बघायची. मलाही तेच आवडायचं त्यामुळे आमचं पटायचं. अ‍ॅनिमल प्लॅनेट तर मला विशेष आवडायचा.

रात्री जेवेणं वगैरे झाल्यानंतर आम्ही पुन्हा टिव्ही पाहणार होतो. पण आईने अनूकडे पाहून डोळे मोठे केले आणि आम्ही दोघं चूपचाप झोपायला अनूच्या खोलीत आलो.  खोलीत आल्यानंतर मला काहितरी उगाच चुकल्यासारखं वाटत होतं. नक्की काय ते समजत नव्हतं.  अनूने दिवा मालवला. त्याक्षणी मला खिडकीबाहेर काहितरी हलल्यासारखं वाटलं. मी खिडकीत उभं राहून पाहण्याचा प्रयत्न केला पण काही दिसलं नाही. पण मी तरिही सतर्क राहण्याचं ठरवलं. अनूची मला काळजी वाटत होती.

मला बराच वेळ झोप लागली नाही. खिडकीतून येणार्‍या रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशामुळे मला अंधारातही थोडंफार दिसायला लागलं होतं. पुन्हा पुन्हा मला खिडकीबाहेर कोणाचीतरी चाहूल लागल्यासारखं वाटत होतं. बाहेर वाहणारा वारा आणि पानांची सळसळसुद्धा मला आता स्पष्ट्पणे ऐकू येत होती आणि मी कान टवकारत होतो. रात्री उशीरापर्यंत मी जागाच राहिलो. माझ्या पापण्या मात्र आता मिटू लागल्या होत्या.

पण थोडा वेळ डोळा लागतो न लागतो तोच बाहेरच्या रूममधून दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. झट्कन उठून अनूला जोरात हलवत मी म्हणालो "कोणितरी घरात शिरलंय". ती डोळे चोळत उठली. मी वेगात बाहेरच्या रुममधे पळालो. बघतो तर आईबाबांच्या बेडरूमचा दरवाजा उघडा होता. बाबा नेहमी दरवाजा लाउन घेतात. नक्की आई-बाबांना धोका आहे. मी पळत पळत त्यांच्या रूममध्ये घुसलो. पाहतो तर बाबा जमिनीवर पालथे पडले होते. त्यांच्या मानेतून व अंगाखालून रक्ताचा ओघळ वाहात होता. 
एक अनोळखी माणूस खोलीत उभा होता. आई बहुतेक बाथरूम मध्ये असावी कारण बाथरूमच्या दाराला आतून कडी लावल्याचा आवाज झाला. तो माणूस, माणूस कसला राक्षसच होता तो, खूपच भयंकर दिसत होता. खूप उंच, धिप्पाड, काळा कुळकुळीत, मोठ्ठे लाल डोळे आणि अंगाला कसलासा घाणेरडा वास येत होता त्याच्या. कपड्यांवर रक्ताचे डाग पडले होते. त्याच्या हातात पिस्तूल होतं. तो बाथरूमच्या दिशेने निघाला. मी ओरडलो "आई".. .   तिच्या जीवाला आता धोका होता. मी त्या माणसाच्या अंगावर धाऊन गेलो पण त्याने एक जोरदार लाथ माझ्या पेकाटावर मारली. कळवळून मी कोपर्‍यात जाउन पडलो. आता त्याने बाथरूमचं दार तोडलं होतं. आणखी एकदा मोठ्ठा आवाज झाला आणि आईची किंकाळी मला ऐकू आली. पण मला तिच्या मदतीसाठी उठताही आलं नाही.   तो बाहेर आला आणि माझ्याकडे पाहिलं. भीतीने माझ्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हता. माझ्याकडे पाहून तो फक्त हसला. त्याचे काळे पिवळे दात बघून मला आणखीच भीती वाटायला लागली.

आणि तेवढ्यात ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तेच झालं. भेदरलेली अनू दरवाज्यात उभी होती. त्या माणसाला पाहून तिने कर्कश्य किंकाळी फोडली. तो राक्षस बाबांच्या पालथ्या अंगावर पाय देउन अनूच्या दिशेने जाउ लागला. अनू दरवाज्यातून पळत पळत दिवाणखान्यात गेली. तोही तिच्या मागून गेला. मी भेलकांडत उभं राहिलो आणि हळू हळू दारपर्यत आलो. अनू अजूनही घरातच पळत होती. "अनू बाहेर जा" मी ओरडत होतो. पण अनू काही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हती. त्या राक्षसाने आता तिचा दंड धरला आणि तिच्या कानशिलात  ठेउन दिली. त्याबरोबर अनू बेशुद्ध पडली. त्याने एका हातानेच तिला उचलली... . नाही नाही ! अनूला काही होता कामा नये... ती माझी बहिण आहे.. माझी मैत्रिण आहे...  मी ओरडायचा प्रयत्न केला. पण त्या राक्षसाच्या एका नजरेने माझी वाचाच बंद झाली.

तिला पाठीवर टाकून तो जायला लागला. वाटेत माझ्या जवळ येऊन थांबला. वाकून त्याने माझ्या डोक्यावर थोपटलं.... त्याचे गलिच्छ दात दाखवून तो हसला...  "गुड बॉय" ... मी चक्राउनच गेलो होतो. मी काहीच हालचाल केली नाही. तो बाहेरच्या दरवाज्याकडे गेला तसा मी खुरडत त्याच्या मागे गेलो. त्याने बाहेर जाउन दरवाजा लाऊन टाकला.    

मी दरवाजा उघडायचा खूप प्रयत्न केला. पण कितीही प्रयत्न केला तरी माझ्या पंजांनी मी लॅच उघडू शकत नव्हतो. असहाय्य पणे शेपटी हलवत मी आई बाबांच्या देहाजवळ बसून राहिलो. 
  

Monday, January 3, 2011

जनू जगदाळेची कहाणी!

"भुताखेतांच्या गोष्टी ? नाय रे बाबांनो ! आमच्या गावात अशा भुताखेतांच्या गोष्टी नाहीत. नाही म्हणायला जनू जगदाळेचा अजब किस्सा मात्र आहे." आजोबा सांगत होते. कॉलेजात शिकणारी आणि मोठ्या शहरात राहणारी त्यांची नातवंड त्याच्या आजूबाजूला बसलेली होती. आजोबांच्या तोंडून गोष्ट ऐकण्यासाठी वयाची अट लागू होत नसते.

"खरंच ऐकायची आहे त्याची गोष्ट? खरं म्हणजे मी तुम्हाला (तुम्हालाच काय, कोणालाही) सांगता कामा नये! पण तुमची इच्छाच असेल तर ठिक आहे. पण शांतपणे ऐकायची हां! उगाच मधे मधे प्रश्न विचारायचे नाहीत ! कबूल? "
आजोबा तो प्रसंग आठवू लागले. इतक्या वर्षापूर्वीचा तो प्रसंग अगदी डोळ्यासमोर घडू लागला होता.
जनू जगदाळेबद्धल काय सांगायचं? खर्‍या अर्थाने कोणाच्या अध्यात न मध्यात. म्हणजे एकूणच निरुपद्रवी आणि निर्गुण. कधी कोणी काम सांगितलं तर करेल पण तेवढ्यापुरतंच. फार मोठं जवाबदारीचं काम लोकांनीही त्याला कधी दिलं नाही आणि मला काम द्या म्हणायला जनूसुद्धा कोणाकडे गेला नाही. सगळ्याप्रकारची कामं तो करायचा पण तरीही कुठल्याच कामामधे तो पारंगत नव्हता. त्यामुळे सगळ्या गावाचा तो हरकाम्या झाला होता. 'एक ना धड भाराभर चिंध्या' म्हणतात ना, तस्साच... चिंधीसारखा! पण ह्या त्याच्या परिस्थितीला तो स्वतःच जवाबदार होता. गावातल्या जवळ जवळ सगळ्या दुकानदारांकडे त्याने काम केलं होतं, अगदी वाण्यापासून ते कोपर्‍यावरच्या म्याकानिक पर्यंत! पण कुठेही एक दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस टिकला नाही. काही लोकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.. पण त्याचं ठरलेलं उत्तर होतं! "कामात मन लागत नाही भाउ!" मग लोकांनीही त्याला समजावण्याचं सोडून दिलं!

तो लहान होता तोपर्यंत त्याचं हे असं जीणं ठिक होतं. पण तो मोठा झाल्यावर मात्र त्याला कोणी जवळ करेनासं झालं. आणि मग एके दिवस तो कोणालाही न सांगता गाव सोडून निघून गेला. कधी गेला कुठे गेला कुणास ठाउक! कदाचीत त्याच्यावर प्रेम करणार्‍या त्याच्या म्हातार्‍या मावशीला माहित असेल... अर्थात तिच्याजवळ त्याची चौकशी करण्याचं गावकर्‍यांना काहीच कारण नव्हतं. लोकांना वाटलं की काही दिवस गेले की आपसूकच परत येइल. कोण त्याला दारात उभं करणार आहे?

तर असो, त्याला जाउन चांगली सहा... सहा की सात? वर्ष झाली. नक्की किती ते आठवत नाही. कोणी सांगू शकेल असं वाटतही नाही आता...खूपच वर्षं झाली त्या गोष्टीला. मीच तेव्हा वीस बावीसचा होतो. हं तर काय सांगत होतो? हां! तर जनू परत आला. आणि जनू चांगलाच बदललेला होता. म्हणजे तो बदलेला असेल हे सगळ्यांनाच माहित होतं पण तो बदल असा असेल हे कोणाच्या स्वप्नातही आलं नव्हतं. तो खूपच प्रसन्न, आकर्षक आणि उत्साही झाला होता. त्याच्या चेहर्‍यावर एक वेगळंच तेज आलं होतं. चालण्यात, बोलण्यात, वागण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास आला होता. लोकांना आता तो हवाहवासा वाटत होता. त्याला समजावणारे लोक आता त्याच्यातल्या बदलाबद्धल त्याला विचारू लागले होते.

"जन्या ! लेका काय मोठी लाटरी लागली का काय तुला आं? अरे सांग तरी मर्दा!"

उत्तरा दाखल जनूने त्यांना एक कुंचला दाखवला. "आयला ! जन्या चित्रकार कधीपास्नं झाला ?" सगळ्यांना आश्चर्य वाटलं! आणि ह्या कुंचल्याचा आणि त्याच्यामधल्या फरकाचा काय संबंध ? लोकांच्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह पाहून जनूने न बोलता एक कागद हातात घेतला. आणि त्यावरून त्याचा कुंचला फिरवला! ना कुठला रंग ना काही. पण एखाद्या पेन्सिलीप्रमाणे त्या कुचंल्यामधून एक काळी रेघ कागदावर उमटायला लागली. त्याने कागदावर एक गोल काढला. खरंतर तो फार चांगला गोल आकार पण नव्हता. मग तो नीट दिसावा म्हणून त्याने तो कागद उचलून घेतला. आणि त्याबरोबर तो गोल एकदम धप्पकन् कागदाच्या खालच्या कडेला जाउन आपटला ! एखाद्या दगडा सारखा !! त्याने तो कागद एका बाजूने वर केला त्याबरोबर तो दगड गडगडत कागदाच्या एका कोपर्‍यात जाउ लागला. तो दगड कागद सोडून खाली पडला नाही! त्या दगडाचं विश्व त्या कागदापुरतंच होतं ! एखाद्या सिनेमाथेटरामधे चित्र जसं पडद्यावर दिसतं तसाच तो प्रकार होता. जनूने तो कागद इतर मंडळींच्या हातात दिला, त्यांनीसुद्धा कागद हलवून तो दगड कसा गडगडतो ते पाहिलं. एकाने त्या दगडाला, म्हणजे त्या आकृतीला, हात लावायचा प्रयत्न केला, तर तो कागदावरच्या कुठल्याही चित्रासारखाच होता. सगळे लोक डोळे फाडफाडून त्या कागदाकडे आणि त्यावरच्या दगडाच्या चित्राकडे बघत उभे राहिले !
पोरांनो! मला माहितेय की तुमचा ह्या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. तुम्हाला वाटत असेल की म्हातार्‍याचं डोकं फिरलंय ! जर तुम्हाला हे खूळ वाटत असेल तर तुमच्यावर ऐकण्याचीही सक्ती नाही. मी तुम्हाला मी स्वतःच्या डोळ्याने काय पाहिलाय तेच सांगतोय. ह्या प्रकारावर पांघरूण घालण्याचे प्रयत्न खूप झाले. पण झाल्याप्रकाराचा मीच एकटा साक्षिदार उरलो आहे. मी स्वतः तो कागद हातात घेउन पाहिला होता. आमच्या सर्वांची तर बोबडीच वळली होती. त्या कागदावर मग जनूने दोन माणसांचे आकार काढले, अगदी लहान मुलं माणसांची चित्र काढतात ना तसे! आणि आमच्या सर्वांदेखत त्या आकारातून उमटणार्‍या माणसांनी तो दगड हलवायला सुरवात केली. आमचा आमच्या डोळ्यांवर विश्वास बसेना! एकाने जनूला त्या जादूच्या कुंचल्याबद्धल विचारलं तर तो म्हणाला की कुठल्याश्या साधूने त्याच्यावर खूश होउन त्याला तो कुंचला बक्षिस दिला होता. "महाराज म्हणाले, ह्याचा उपयोग करून तू गावात एक चांगलं आयुष्य जगू शकशील !" हे सांगताना त्याने आमच्याकडे पाहण्याचं टाळलं. पण आम्ही त्याला जास्त खोलात जाउन विचारलं नाही. आमच्या दृष्टीने तो कुंचला त्याला कसा मिळाला यापेक्षा तो कुंचला काय करू शकतो हे जास्त महत्वाचं होतं.

"मग आता काय करायचं ठरवलं आहेस?" एकाने व्यावहारिक मुद्दा काढला. "ह्या कुंचल्याचा उपयोग करून मी जादूचे प्रयोग करणार आहे" जनू म्हणाला. "'थोडे फार पैसे तरी मिळतील!" "पण ह्यात काही धोका तर नाहि ना? हा कसला तरी भुताटकीचा प्रकार तर नाही ना किंवा चेटुक वगैरे? " कुणीतरी शंका काढली "नाही नाही, कसलाच धोका नाही, मी काढलेल्या आकृती ह्या फक्त त्या कागदापुरत्याच हालचाल करू शकतात. तेच त्यांचं जग, त्याच्या बाहेर त्या आकृत्या येउ शकत नाहीत. ही जादूच आहे पण हातचलाखी नाही. काळी जादू, चेटुक तर नक्किच नाही." त्याने आम्हाला आश्वासन दिलं. आम्हाला त्या प्रकारात आता जास्त रस वाटू लागला. त्यावेळेला आम्ही सगळेच तरूण होतो. काहीतरी नवीन करायचं ते वयच होतं. आज वाटतं, जर पुढे नशिबात वाढुन ठेवलेलं त्या वेळेला कळलं असतं तर वेळीच जनूला ह्या अघोरी प्रकारापासनं वाचवता आलं असतं ! असो, त्यावेळी आम्हाला ती कल्पना अतिशय आवडली होती. आम्ही सर्वांनी त्याला मदत करण्याचं ठरवलं. त्यानेही त्याच्या प्रयोगासाठी तयारी करायला सुरुवात केली.

लवकरच त्याने त्याच्या जादूच्या प्रयोगाची जाहिरात करण्यासाठी हँडबिलं छापून घेतली. तुमच्या शहरांमध्ये जाहिराती टि.व्ही. आणि रेडियोवर करतात. पण ह्या छोट्या गावात अजूनही हँडबिलं छापून जाहिराती होतात. आणि इतर काही वाचायला नसल्यामुळे लोकं हँडबिलं सुद्धा वाचतात. अर्थात त्या हँडबिलांवरसुद्धा जनूने एक छोट्या विदुषकाचं चित्र काढलं होतं, तो विदुषक पाहून बर्‍याच लोकांना हा जादूचा प्रयोग बघायची इच्छा झाली. जनूने एक छोट्या तंबूमधे त्याचा प्रयोग सुरू केला. कागदाऐवजी एका भिंतीवर चुना मारून त्याचा उपयोग तो त्याच्या चित्रांसाठी करणार होता. पहिल्या प्रयोगासाठी चांगली पन्नास्-साठ तिकिटं विकली गेली होती. आमच्या गावाच्या मानाने पहिल्या दिवशी पन्नास्-साठ ..कदाचीत जास्तच पण कमी नाहीत... म्हणजे चांगलीच गर्दी जमली होती. पहिल्याच प्रयोगात त्याने भिंतीवर सात आठ माणसांच्या आकृत्या काढल्या. त्या आकृत्या मग भिंतीवरच हलू लागल्या, एखाद्या सिनेमा सारखे त्या भिंतीवर वेगवेगळे प्रसंग उमटू लागले. अगदी मारामारीपासून ते दहिहंडी पर्यंत! जनू भान हरपून चित्र काढत होता आणि लोक त्या भिंतीवरल्या हलत्या चित्रांकडे तहान भूक विसरून पाहात होते. पुढे पुढे लोक सांगतील ते प्रसंग तो भिंतीवर काढू लागला. त्याच्या कुंचल्यातून उमटणारी माणसं, नद्या, पक्षी, प्राणी ते प्रसंग जिवंत करत होती.

जनूचे प्रयोग भलतेच यशस्वी होउ लागले. प्रेक्षकांमधलं कोणीतरी ओरडून त्याला एखादा सिनेमातला किंवा नाटकातला प्रसंग सांगत, कधी कधी अगदी रामायण महाभारतातला सुद्धा! जनूचा कुंचला झटक्यात भिंतीवरून फिरून त्या प्रसंगाची पात्रं आणि इमारती, वस्तू, प्राणी काढू लागे. आता जनूची चित्रकलाही बर्‍यापैकी सुधारली होती. त्यामुळे माणसांचे, प्राण्याचे आकार बरेच जमू लागले होते. त्याच्या कुंचल्यातून उमटणार्‍या आकृती कुठलाही प्रसंग झटक्यात साकार करून दाखवत, कधी कधी तर त्या प्रसंगामधे स्वत:चे बदल पण करून आणत. जणूकाही त्या आ़कृत्यांना स्वत:चं व्यक्तीमत्व होतं. त्यामुळे लोकांची उत्कंठा आणखीनच वाढत होती. मला आठवतं, जनू अगदी पटापट चित्र काढायचा त्यामुळे चित्रांना त्यांची करामत करण्यासाठी जास्त वेळ मिळेत असे. जनू एखादा प्रसंग काढताना फक्त त्यातील माणसंच नव्हे तर आजूबाजूची झाडं, राजवाडे, घरं सुद्धा काढायचा. त्यामुळे एखादा राजपुत्र उंच मनोर्‍यात राहणार्‍या राजकन्येला सोडवतानाचा प्रसंग पाहताना प्रेक्षकांना तो मनोरा आतूनही दिसत असे. राजपुत्र मनोर्‍यातल्या राक्षसाबरोबर लढाई करून राजकन्येला घेउन उडणार्‍या घोड्यावर बसून दूर आपल्या राज्यात निघून जातो. प्रेक्षक अगदी तल्लीन होउन जात असत. कुठलाही आवाज किंवा पार्श्वसंगित नसून, जनूची चित्रं सुद्धा अगदी खरीखुरी वाटत नसली तरी त्याचे प्रयोग लोकांना जास्त आवडत होते. अर्थात जनूच्या प्रयोगांचं नाविन्य म्हणजे भिंतींवर आपोआप उमटणारी आणि हलणारी चित्र होती. एखादा प्रसंग संपल्यावर त्यातील माणसांची आणि प्राण्यांची चित्र भिंतीच्या टोकाकडे जात व दिसेनाशी होत. किंवा मग जनू त्यावर पांढर्‍या रंगाचं पाणी ओतून टाकत असे. अशा प्रकारे ती भिंत पुन्हा दुसर्‍या प्रयोगासाठी सज्ज होत असे.

जनू आता बर्‍यापैकी पैसा मिळवू लागला होता. आताशा त्याच्या वाईट सवयी पण वाढायला लागल्या होत्या. जेव्हा तो गावात आला होता तेव्हा अगदी छान उमदा, तेजःपुंज असा वाटायचा. पण पैसा हाताशी आल्यासरशी आता तो बायांवर आणि बाटल्यांवर उधळायला लागला होता. अजूनही त्याच्यात खूप उत्साह होताच, आणि दिवसेंदिवस त्याला मिळणार्‍या यशामुळे त्याचा उत्साह वाढतच होता. हे यश त्याच्या डोक्यात जाउ लागलं होतं. हळूहळू तो जास्त मग्रूर, बेदरकार होत होता. त्याचाच परिणाम म्हणून की काय, आजकाल त्याच्या प्रयोगांमध्ये मारामारीचे किंवा युद्धाचे प्रसंग वाढायला लागले होते. त्याच्या तब्येतीवर सुद्धा थोडा फार परिणाम झाल्यासारखा वाटत होता. त्याचे डोळे बरेचदा लालसर असत. ते रात्रभर झालेल्या जागरणामुळे होते की दारू जास्त झाल्यामुळे होते हे सांगणं अवघड होतं. आता त्याच्या बरोबर नेहमी वावरणारा आम्हा मित्रांचा घोळका त्याच्यापासून जरा दूरच राहू लागला. त्याची थोडीशी भीतीच आमच्या मनात बसली होती.

जवळ जवळ दोन महिने असेच गेले. जनूचा प्रेक्षकवर्ग आता खूपच वाढला होता. आमच्या गावातच नव्हे तर आजूबाजूच्या गावातूनसुद्धा लोक त्याचे प्रयोग पाहण्यासाठी गर्दी करू लागले होते. त्याने सुद्धा आता मोठ्या तंबूत प्रयोग करायला सुरूवात केली होती. आता त्याच्या प्रयोगामधे तो बरेच नविन प्रकार करत होता. एखादा प्रसंग पूर्ण व्हायच्या आधीच दुसर्‍या प्रसंगाची चित्र काढत होता, त्यामुळे एका प्रसंगातील पात्र दुसर्‍या प्रसंगातील पात्रांबरोबर वावरायची. जणू राम आणि लक्ष्मण मिळून कौरवांशी लढताहेत आणि अर्जून औरंगजेबावर चालून जातो आहे ! लोकांना त्याचीही गंमत वाटत होती. त्याची पात्र आता जास्त क्रूर आक्रमक होत होती. त्याच्या कल्पनांना नविन पंख फुटत होते. कधी कधी तर तो आम्ही न बघितलेले प्रसंग जसे यंत्रमानवांची युद्ध वगैरे सुद्धा काढत असे. त्याचे यंत्रमानव, किंवा राक्षस म्हणूया हवं तर, खूपच हिंस्त्र वागत ! त्याच्याबद्धल जर कधी त्याला विचारलंच तर "अरे हेच लोकांना आवडतं!" असं म्हणून आम्हाला वाटेला लावत होता.

मघाशी म्हटल्याप्रमाणे जनूचा जास्त वेळ बायकांच्या आणि दारूच्या सहवासात जात होता. त्यातल्या काही बायकांच्या म्हणण्याप्रमाणे कधी कधी रात्री अपरात्री उठून जनू त्याच्या वहीत चित्र काढत बसालेला दिसायचा. ती चित्र कोणाची होती, कसली होती हे मात्र त्या बायकांपैकी कोणीच सांगू शकलं नाही. दारूच्या नादात जनूनं ती चित्र काढली असावीत असं त्यांना वाटलं. ह्या दारूपायीच पुढचं अरिष्ट घडलं.

त्या रात्री त्याचा प्रयोग होता. नेहमी प्रमाणेच हाउसफुल्ल! तुडूंब गर्दी. पडदा वर केला आणि जनू प्रेक्षकांपुढे उभा राहिला. त्याच्या झोकांड्या पाहून त्याच्या परिस्थितीची कल्पना लोकांना आलीच. मी दरवाज्यापाशी उभा होतो आणि तिथेही, जवळ जवळ दहा पंधरा फुटांवरूनही, मला त्याच्या तोंडाला मारणारा दारूचा घाण वास येत होता. त्याने नेहमीप्रमाणे त्याचा प्रयोग सुरू केला. नेहमीचे काही लोकप्रिय प्रसंग त्याने भिंतीवर चितारले. प्रेक्षक आनंदाने टाळ्या वाजवत त्या प्रसंगातील पात्रांकडे पाहात होते. मग नेहमीप्रमाणे त्याने प्रेक्षकांना त्यांची फर्माईश विचारली. कोणीतरी एक ओरडून म्हणाला "तुम्ही तुमचंच चित्र काढा ना? आत्ता जो प्रयोग चाललाय तोच प्रसंग काढा!". लगोलग जनूने त्याचा कुंचला खिशातून काढला आणि भिंतीवर रेषा उमटायला लागल्या.

त्या मोठ्या भिंतीवर त्याने त्याचं आणि पुढच्या प्रेक्षकांचं चित्र काढायला सुरवात केली. सर्वजण आतुरतेने पुढे काय होणार याची वाट पाहात होते. सर्वजण म्हणजे प्रेक्षकच नव्हे तर भिंतीवर आगोदर चितारलेली पात्र देखिल. राजपुत्र, राजकन्या, राक्षस, यंत्रमानव, वाघ, सिंह हे सुद्धा सगळेच थांबून त्याचं चित्र पूर्ण होण्याची वाट बघायला लागले होते. शेवटची रेष काढून होते न होते तोच जनूचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला. फार मोठी चूक केल्याचे भाव त्याच्या चेहर्‍यावर प्रगटले. घाई-घाईत तो पांढर्‍या रंगाचं पाणी भरलेली बादली शोधायला लागला. पण आज दारूच्या नशेत त्याने ती बादली ठेवलीच नव्हती. सगळ्याची नजर जनूच्या घामाने थबथबलेल्या चेहर्‍याकडे होती.

भिंतीवरच्या जनूच्या चित्राने त्याच्या खिशात हात घालून एक कुंचला बाहेर काढला. आम्ही सगळे बघत असतानाच त्याने एक दरवाजा चितारला. त्या दरवाज्याला लाथ मारून त्याने दरवाजा पूर्ण उघडला आणि दारातून चालत आमच्या देखत प्रेक्षकांच्या समोर स्टेजवर येउन उभा राहिला. त्याचं विश्व आता भिंतीपुरतं मर्यादीत नव्हतं.

नंतर तंबूत एकच गोंधळ उडाला. घाबरून ओरडत लोक सैरावैरा धावायला लागले. जनूच्या भिंतीवरची पात्र एक एक करून त्या दरवाज्यातून बाहेर पडत होती. आग ओकणारे राक्षस आणि यंत्रमानव, बंदूकी, तलवार चालवणारे सैनिक, हिंस्त्र जनावरं सगळे बाहेर पडत होते. भिंतीवर असणारेच नव्हे तर आजपर्यंत जनूने काढलेल्या जवळ जवळ सगळ्या आकृत्या भिंतीवरच्या दरवाज्यातून बाहेर पडत होत्या. मी बाहेरच्या बाहेरच पळ काढला. तो दिवस आठवला की आजही अंगावर सरसरून काटा उभा राहतो.

जनूच्या आकृत्या बाहेर येउन त्यांनी जनूलाच धरला होता. सगळ्या आकृत्यांनी त्याला घेरुन त्याच्यावर लाथा-बुक्क्यांचा पाउस पाडायला सुरवात केली. जनू पूर्ण रक्तबंबाळ झाला होता. त्या आकृत्या जनूला अक्षरशः पायाला धरून खेचत भिंतीवरच्या दरवाज्याकडे खेचून घेउन जात होत्या. जनू जीवाच्या आकांताने किंचाळत होता.

त्या तंबूला अर्थातच आग लागली. त्यात किती लोकं मेले? जनूच्या चित्रांपैकी किती चित्र परत गेली आणि किती मागे राहिली? त्या जनूच्या स्वतःच्या चित्राचं काय झालं? नुसते प्रश्न. उत्तरं कोणाकडेच नव्हती. रात्रीच्या सुमारास कधितरी तालुक्याच्या गावातून पोलिस आणि इतर अधिकारी आले. त्यांनी पंचनामा वगैरे केला. दुसर्‍याच दिवशी मोठ्या शहरातून काही आणखी स्पेशल पोलीस आले. लोकांनी काय झालं ते त्यांना सांगितलं. पोलिसांनी सगळ्यांना झाल्या प्रकाराची कुठेही वाच्यता न करण्याबद्धल धमकावलं. ज्यांनी विरोध केला त्या सर्वांना सरळ गाडीत घालून घेउन गेले. जनूच्या प्रयोगाची हँडबिलं आणि त्याचे इतर काही कागद त्यांनी ताब्यात घेतले. कोणीतरी विडी न विझवताच कचर्‍याच्या कुंडीत टाकली हे आगीचं कारण म्हणून पुढं करण्यात आलं.

दिवसा मागून दिवस गेले तसे लोकही गपचूप सगळं विसरून आपापल्या कामाला लागले. काही वर्षांनी जनू नावाचा कोणी त्या गावात होता हेही सगळे विसरले.

मी मात्र काही विसरलो नाही. उलट मला ह्या सगळ्या प्रकाराचा छडा लावायचा मी प्रयत्न केला. जनू त्याच्या कुंचल्याने साधी चित्र काढत नव्हता. चित्र कधी हलतात का? मग इतरांवर हल्ला करणं किंवा स्वतः प्रसंगामधे बदल करणं तर दूरच राहिलं. म्हणजे माझ्या मते, जनू खर्‍याखुर्‍या माणसांना एका समांतर विश्वातून ह्या जगात आणत होता. त्याला मिळालेली शक्ती ही खरोखरच अमानवी होती आणि कोणत्याही माणसाला ती सांभाळता आली नसती. दारूच्या नशेत त्याने एकच चूक केली आणि तीच त्याला फार महागात पडली.

पोलिसांनी जरी गावकर्‍यांना गप्प केलं असलं तरी त्यांनी दोन गोष्टींमधे दुर्लक्ष केलं. एक म्हणजे त्यांनी बरेच पुरावे नष्ट केले नाहीत. त्या तंबूचे अवशेष तसेच ठेवले होते. मी पुन्हा जाउन ते अवशेष पाहिले. तोपर्यंत त्या घटनेला बरेच महिने उलटले होते. जनू ज्यावर चित्र काढायचा ती भिंत सुद्धा पडली होती. त्या उद्ध्वस्त झालेल्या जागी, राखेत आणि धुळीत मला काहीतरी पडलेलं दिसलं. जवळ जाउन पाहिलं तर जनूचा हात त्या भिंतीतल्या दरवाज्यात अडकला होता. अगदी त्या दिवशी जसा होता तस्साच. अगदी राखेत माखलेला असला तरी मी नक्की सांगू शकतो की तो हात त्याचाच होता. त्याच्या हातात त्याच्या कुंचल्याचं मोडलेलं टोक शिल्लक होतं.

पोलिसांनी दुर्लक्ष केलेली दुसरी गोष्ट म्हणजे, मी म्हणालो त्याप्रमाणे जनूच्या सगळ्या आकृत्या काही परत गेल्या नाहीत. त्यापैकी किती पोलिसांना सापडल्या ते अर्थातच माहीत नाही. पण काही आकृत्या आजही ह्या आसपासच आहेत. माझी खात्री आहे. तिन्हीसांजा झाल्यावर कोणी कधीच गावाबाहेरच्या माळावर जात नाही. माळावरच्या पडक्या भिंतीवर ती विचित्र चित्र कसली आहेत तुम्ही विचारत होतात ना!

नाही, आमच्या गावात भुताखेतांच्या गोष्टी नाहीत.
(समाप्त)