Monday, September 19, 2011

आठवणी


आपल्या आयुष्यात काही काही आठवणी अशा असतात की कितीही प्रयत्न केला तरी त्या विसरल्या जात नाहीत. आयुष्याच्या संध्याकाळी मग कधी कधी ह्या आठवणी मनात पिंगा घालायला लागतात. जसं जसं मागं जावं तशा तशा ह्या आठवणी थोड्या विरळ होत जातात. एकाद्या धूसर चित्रांचा अल्बम बघावा तशा.... एखाद्या सुराचा, एखाद्या गंधाचा किंवा एखाद्या प्रसंगाचा संदर्भ घेउन अडगळीत पडलेल्या असतात. अडगळीप्रमाणेच.. कधी कधी तर आठवणी अगदीच असंबद्ध असतात. त्या स्मृतींची अडचण अजून का डोक्यात साठली आहे असा प्रश्न पडतो. प्रत्येक स्मृती एखाद्या अद्भुत स्वप्नासारखी वाटते आताशा. लहानपणीच्या त्या आठवणी .. जेव्हा पर्‍यांची राज्य खालसा झाली नव्हती. वाढत्या वयासोबत निरागसता हरवत गेलेली असली तरी त्यांच्या स्मृती अजूनही शाबूत आहेत.

माझ्या काही आठवणीतर कुठल्याही संदर्भाशिवाय उगाच डोक्यात ठाण मांडून बसल्या आहेत. आमच्या गावातल्या छोट्या घरात आजोबांच्या मांडीवर बसून आरती करायचो. जशी आजोबा आजींची प्रेमळ नजर अजूनही मला तितकीच स्पष्टपणे आठवतेय तसंच एकदा अंगणात भर दुपारच्या उन्हात मुंग्यांच्या रांगेमागे चालत जाउन त्यांचं वारुळ शोधल्याचंही आठवतंय.  काही काही आठवणींवर तर माझा स्वतःचाच विश्वास बसत नाही.. म्हणजे त्या आठवणी खर्‍या आहेत की माझी स्वप्नं तेच समजत नाही.

आता हीच आठवण बघा ना! मला तो प्रसंग अगदी जशाच्या तसा आठवतोय. अगदी त्यातल्या सगळ्या बारिकसारिक तपशीलांसह. पण तो प्रसंग खरा की ते एक स्वप्न होतं ते मला अजूनही नक्की कळलेलं नाही. 
 
त्यावेळेला आम्ही, म्हणजे मी आणि दादा, गावातल्या घरात आजी आजोबांकडे राहायला गेलो होतो. मी साधारण पाच सहा वर्षांचा असेन, आणि दादाचं वय आठ-नऊ. मला आणि दादाला आजोबांनी एक वेगळी खोली दिली होती. आमची थोडी खेळणी आणि सटर फटर इस्टेट आम्ही ठेवली होती. त्याच खोलीत आजोबांनी आमच्या खाटा ठेवल्या होत्या. 

एकदा रात्री कधीतरी मला तहान लागून जाग आली. सगळीकडे गुडूप्प अंधार होता. पण इतक्यात सण्णकन विज चमकली. गडगडाटाच्या भितीने मी कान झाकून घेतले पण काहीच ऐकू आलं नाही. बाहेर पाउस कोसळत होता... कारण मातीचा पाण्याचा वास मला येत होता. पण काही ऐकू येत नव्हतं. खिडकी उघडी होती. त्यामुळे खोली खूपच थंड झाली होती. आजी नेहमी खिडकी लाऊन घ्यायची. आज कशी काय विसरली? हळूवार वार्‍यामुळे खिडकीचे पडदे हलत होते. पण बाहेरून झाडांच्या पानांचा आवाज येत नव्हता.  शांतता कधी कधी इतकी भीषण असते की आवाजासाठी कान आसुसतात. 

मी खाटेवर पालथा झोपलो होतो. डावा आत खाटेखाली घालून तिथे पाण्याचा पेला आहे का ते मी चाचपडून बघायला लागलो. हात जमीनीला लागला तेव्हा जमिन थोडी उबदार वाटली. इतक्यात मला हातावर थोड्याथोड्या वेळाने हलकेच हवेची झुळूक जाणवत होती...म्हणजे फुंकर नव्हे पण कोणाचे तरी श्वास-निःश्वास असावेत असं काहीसं. इतक्यात हातावर काहीतरी हुळहुळल्यासारखं वाटलं. आणि मी हात वर घेतला. 

खाटेखालून एक बाई हळूहळू सरकत बाहेर आली. तिचे पांढरे केस मोकळे सुटलेले होते. सावली वरून मला तर ती माझी आजीच वाटली. लहान मुलांचं मन किती वेगळ्या प्रकारे विचार करतं नै! मी तिला अजिबात घाबरलो नव्हतो. "आजी माझ्या खाटेखाली काय शोधतेय?"  हा विचार तेव्हा माझ्या डोक्यात आला होता. मी तिला हाक मारायला तोंड उघडलं.. पण तोंडातून शब्द बाहेर येईना. का माझं मलाच ऐकू येत नव्हतं? त्या बाईचा चेहरा मला काही दिसत नव्हता. चेहर्‍याच्या जागी नुसतं धुकं दिसत होतं. ती रांगत रांगत माझ्या दादाच्या खाटेपाशी गेली. तिची प्रत्येक हालचाल अगदी सहज होत होती... जणू तिचे हात पाय जमिनीला लागतच नव्हते. वार्‍यावर हलकेच उडणार्‍या पांढर्‍या चादरीसारखी. नंतर मला झोप लागली असावी कारण नंतर काय झालं ते मला आठवत नाही.

पण दुसर्‍या दिवशी दादा त्याला रात्री पडलेल्या विचित्र स्वप्नाबद्धल सांगत होता. त्याच्या स्वप्नात एक बाई जमिनीखालून बाहेर आली आणि बाहेर पावसात खेळायला निघून गेली.खेळून दमल्यानंतर परत घरात आली आणि जे कोणी झोपले असतील त्यांच्या कानाशी लागून त्यांना तिच्या खेळाबद्धल सांगत होती. दादाला ते स्वप्न पुन्हा पुन्हा पडत होतं. अगदी आम्ही आमची सुटी संपवून परत गेलो तेव्हा पर्यंत.. आजी आजोबा त्याच वर्षी एका पाठोपाठ एक असे ह्रुदयविकाराच्या झटक्याने वारले. आम्ही सुद्धा पुन्हा त्या घरी गेलो नाही. 

मानवी मन सुद्धा काय काय आठवणी जपून ठेवतं! 

(काल्पनीक)

No comments:

Post a Comment