Friday, January 27, 2012

कुरियर बॉय! (भाग - २)


"अरे काय विचारू नको. धंदा एकदम जोरात चालू आहे. जवळपास हजार चिठ्ठ्या जमल्या आहेत. मी आता याच बिल्डिंगमधे वरच्या मजल्यावर राहतो. मस्त आहे खोली. येतोस आत्ता?"
"आता नको. मला बर्‍याच डिलीवरी करायच्या आहेत. नंतर कधीतरी." मी तिथून सटकलो.
पण आमची भेट लवकरच होणार होती.
आता पुढे...

त्यादिवशी नंतर बरेच दिवस रघू दिसला नाही. आणि जेव्हा दिसला तेव्हा त्याची एका वेगळ्याच अर्थाने ओळख पटली नाही. मला वाटलं होतं आता पर्यंत त्याने भरपूर पैसा जमवला असेल आणि मस्तपैकी बस्तान बसवलं असेल. पण त्याच्या कडे पाहून एकूण त्याचं काही खरं नाही इतकं मात्र जाणवलं.

रात्री दोन वाजता माझ्या खोलीचं दार खाडखाड वाजत होतं. दिवसभराच्या कामानंतर मी अगदी गाढ झोपेत होतो. सालं कुरियर बॉय म्हणजे दिवसभर नुसती तंगडतोड! त्यामुळे दार वाजल्यावर उठावंसंच वाटत नव्हतो. पण थोड्या वेळाने दार उघडलं नसतं तर कदाचित तो दार तोडूनच घरात शिरला असता. मी आधीच झोपेत होतो आणि त्यातून अशा भलत्या वेळी रघूला माझ्या दारात पाहून मी जाम गोंधळलो.

"काय रे? तू आत्ता ह्या वेळी? पोलिस बिलिस लागलेत की काय पाठिमागे" त्याच्या मागे पोलिस वगैरे असतील तर आत्ता मला तो घरात नको होता. मी लाईट लावू लागलो.

"लाईट नको लाउ आणि आधी दार बंद कर. मग सांगतो"
तो पटकन आत येत म्हणाला. त्याच्या एकून वागण्यावरून तो जाम घाबरला वाटत होता. पण त्याच वेळी त्याची भीती लपवायचा पण प्रयत्न करत होता. नक्कीच कायतरी भानगडीत अडकला असणार. पण च्यायला माझ्या घरी येऊन मला त्यात उगाचच गुंतवलं तर नसतं झंजट माझ्या मागे लागेल. मी दरवाजा लावला. रघू खोलितल्या खोलीत येरझारा घालत होता.

"काय लफडं झालं रे?" मी त्याला पाणी देत विचारलं.

अधाशासारखं पाणी पिउन झाल्यावर तो म्हणाला "यार मन्या, ती बाई माझ्या पाठी लागलीय!"

"आँ! बाई पाठी लागलीय?" च्यायला आमच्या पाठी कोण नाय लागत म्हणून आम्ही रडतो, आणि ह्याच्या पाठी बाई लागलेय म्हणून ह्याची तंतरलीय? मला तशा वातावरणात पण एकदम हसायलाच आलं.

"हसतोय काय साल्या. जिथं जाईन तिथं ती मागावर असते. एकवेळ पोलिस परवडले पण ही बया नको. आजकाल रात्री झोपपण लागत नाही मला. कारण ही बया बाहेर उभी राहून माझी वाट बघत असणार हे मला माहितेय. मी घराच्या बाहेर पडलो की लगेच पाठलाग सुरू. कुठेही गेलो आणि मागं वळून बघितलं की असतेच. अगदी खाली पानवाल्याकडे पण जायची चोरी!"

" .. मग तिला विचारलंस का की बाई तू का माझ्या पाठी पाठी करतेस?" माझं हसणं  आतल्या आत दाबत शक्य तितक्या शांत पणे परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत म्हणालो.

"तिने माझी पेपर मधली जाहिरात वाचली आणि मला भेटायला आली होती. मी तिची चिठ्ठी आणी पैसे घेतले."

"बरं मग"

"मग काय... आता माझ्या मरणाची वाट बघतेय ती!"
मला हसू आवरेनासं झालं. त्याच्या स्किममधला हा धोका त्याच्या लक्षातच आला नव्हता.

"तू एकटाच आहेस ना इथं?" रघूने इथे तिथे बघत विचारलं.

" तुला काय वाटतं? ती बाई इथे पण येईल?"

"काही सांगता येत नाही. आली तर काही आश्चर्य वाटायला नको. सालीला झोप वगैरे काही नाहीच! येडीच वाटते यार. "

"मग! तुला काय वाटलं? शहाणी लोकं तुझी जाहिरात वाचून तुला पैसे पाठवत असतील?" पुन्हा एकदा माझा खवचट प्रश्न. पण रघूचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो त्याच्या तंद्रीतच बोलत होता.

"मी नक्की कधी चिठ्ठी देणार ते हवाय माझ्या कडून तिला. पैसे दिल्यानंतरच्या दुसर्‍या दिवसापासून तिचे फोन चालू. दिवसाच काय रात्री बेरात्री कधी पण. वैताग साला! मग मी फोन घ्यायचं बंद केलं. तेव्हापासून मग अशी पाठलाग करत फिरत असते."

"काय नक्की  प्रॉब्लेम काये तिला?"

"म्हणते की एकदम अर्जंट निरोप आहे तिचा. तिच्या नवर्‍यासाठी. येडी साली. नुकताच मेलाय म्हणे नवरा. अर्जंट म्हणे! मायला तो एक आधीच मेलेला आणि त्यात बायको अजून त्याला अर्जंट चिठ्ठ्या पाठवतेय. बिचार्‍याचं नशिबच वाईट असणार म्हणून असली बायको मिळाली. कदाचीत त्याने स्वतःलाच खलास केलं असेल ह्या असल्या बायकोमुळे.

"ह्म्म. चिठ्ठीत काय लिहिलंय?"

"फार काही नाही, फक्त 'मला माफ कर' इतकंच. मला चिठ्ठी देताना सांगत होती, एकदा म्हणे तिचं तिच्या नवर्‍याशी भांडण झालं आणि नवर्‍याला हार्ट अ‍ॅटेक येऊन मेला. .. मेला कसला, सुटला असल्या येडीच्या तावडीतून ! गळफास लावला असणार त्यानं. तिला आता खूप वाईट वाटतंय म्हणून आता पुन्हा पुन्हा मला सांगत होती. तो मेल्यावर अक्कल आलीय हिला."

"बरं मग आता जर तुला तिचा त्रास होत असेल तर तिचे पैसे परत करून टाक सरळ. नाय जमणार म्हणावं!"

"तेच करायला लागणार बहुतेक."

"मग आत्तापर्यंत का नाही केलंस?"

"सॉल्लिड पैसे दिलेले रे तिने! माझा नेहमीचा रेट हजार रुपये... पण तिने दहा हज्जार दिलेत!"

"तिला काय एक्स्प्रेस डिलेवरी वाटली काय?" मी गमतीत म्हणालो, पण बहुतेक तिला तसंच वाटलं असण्याची शक्यताही होती.

रघू खिडकीच्या पडद्याआड उभं राहून बाहेर बघत होता.
"आयला !!!"

"काय झालं?"

"ती बघ. बाहेर उभी आहे"

"कुठे?" मी कुतूहलाने खिडकीपाशी जाउन डोकावलो. मला बाहेरच्या अंधारात फारसं काहीच दिसलं नाही. रस्ता सुनसान होता. पलिकडे झोपडपट्टी होती तिथे पण काही हालचाल नव्हती. इथे तर रस्त्याला लाईटपण नव्हते. कोण बाई या वेळी इथे असणारे? ह्या रघ्याला भास होत असणार.

"कोण पण नाहीये तिथे."

"तिथे खाली रस्त्याच्या त्या साईडला, त्या खोपटाच्या मागच्या बाजूला बघ. हातातलं घड्याळ चमकताना दिसताय बघ! साली सारखी सारखी घड्याळात बघत असते. बसची वाट बघतात तशी माझ्या मरायची वाट बघतेय! काय पण अवदसा पाठी लागलेय"

मी त्या दिशेने बघितलं. थोडा वेळ गेला तरी मला कोणी दिसेना. मी वळणार इतक्यात त्या खोपटाच्या मागच्या बाजूला काहीतरी चमकलं. नीट बघितलं तर खरोखरच कोणीतरी उभं होतं.
"आयला हो रे! कोणीतरी उभं आहे तिथे."

"कोणीतरी नाय, तीच आहे."

"मग आता काय करणार. सरळ जाऊन तिला भेट ना. जा बाई तुझे पैसे घेऊन. तुला निदान शांतपणे झोप तरी लागेल." मी म्हणालो.

रघू अजूनही खिडकीतून बाहेर बघत उभा होता. रघ्या चांगलाच हडबडला होता.

"उद्याच तिला तिचे सगळे पैसे परत देउन टाकतो." माझ्याकडे न बघताच रघु तोंडातल्या तोंडात बोलला.
"मी आजच्या रात्री इथे झोपलो तर चालेल का? आता बाहेर पडायची हिंमत नाही आपली. शिवाय आत्ता या वेळेला माझ्याकडे एवढे पैसे पण नाहियेत. उद्या खोलीवर जाउन सकाळीच पैसे देऊन टाकतो मग सगळं नीट होईल. चालेल ना?"

"ठिकाय. पण माझ्याकडे फक्त ही फाटकी सतरंजी आहे."

"चालेल चालेल यार. माझीच एवढी फाटलेय.. सतरंजीचं काय मग" रघू उसनं हसत हसत म्हणाला.

"उद्या सकाळी सकाळी मामला खतम करून टाक. "

"हो रे बाबा" फाटक्या सतरंजीला सरळ करून रघू त्यावर आडवा झाला.
इतके दिवस ऐषारामात जगणारा असा एकदम जमिनीवर झोपलेला पाहून त्याच्या बद्धल मलाच वाईट वाटायला लागलं. चांगलं डोकं दिलंय देवाने. चांगल्या जागी वापरलं असतं तर? जाउदे. मी पण पांघरूण डोक्यावर घेऊन झोपून गेलो. रघू पण थोड्याच वेळात घोरायला लागला.

सकाळी सकाळी रघूनेच मला उठवलं. "मन्या तू पण चल माझ्या बरोबर यार."

रघु स्वतःच्या खोलीवर घेऊन गेला. अपेक्षेप्रमाणे ती बया आमच्या पाठलागावर होतीच. मग पैसे घेऊन आम्ही तसेच त्या बाईच्या समोर गेलो. रघू रस्त्यातच तिला पैसे देत होता. पण तिच म्हणाली,  "मला खूप भूक लागलीय, आपण समोरच्या उडप्याकडे जाऊया का?"

बाई बोलायला तर बरी वाटत होती. पण अवतार मात्र बघण्यासारखा होता. हॉटेलात गेल्यावर रघूने पुन्हा बोलायला सुरवात केली.

"बाई, मी गेल्या आठवड्यात डॉक्टरांकडे जाऊन सगळ्या टेस्ट केल्या. डॉक्टरांनी मला अजून सहा महिने तरी काही होत नाही असं सांगितलंय! तुम्हाला तुमची चिठ्ठी पोचवायची घाई आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे व चिठ्ठी परत घ्या"

बाई थोडा वेळ काही बोललीच नाही. मग एकदम म्हणाली, "असं कसं म्हणाले डॉक्टर? नक्की त्यांनी सगळ्या टेस्ट बरोबर केल्या ना? कधी कधी डॉक्टरांचं चुकतं. पुन्हा एक्दा टेस्ट करुया का?"

तब्येत चांगली आहे म्हणून जास्त दिवस जगायला मिळणार, ह्याची कम्प्लेन करणारी बाई मी पहिल्यांदाच बघत होतो! रघू म्हणाला ते बरोबरच होतं. हीच्या डोक्यावर नक्कीच परिणाम झालेला असणार.

रघू शक्य तेवढा सरळ चेहरा ठेवत म्हणाला "हो बाई, मी काही इतक्यात मरत नाही."

हे ऐकल्यावर बाईचा चेहरा थोडा रडवेला झाल्यासारखा वाटला. रघूने टेबलवर ठेवलेले पैसे तिने हातात घेतले आणि पर्स मधे ठेवले. थोडावेळ खिडकीबाहेर बघत राहिली. काहीतरी विचार करत असावी. मनात मग विचार पक्का झाल्यासारखं तिनं रघूकडे पाहिलं. पुन्हा पर्स उघडली, वाटलं की पैसे परत करते की काय? पण काही कळायच्या आतच पर्समधून एक चाकू काढला आणि रघूच्या गळ्यात आरपार घुसवला. माझी तर सॉल्लिड फाटली आणि मी खुर्चीवरून बाजूला होता होता पडलोच! रघूला तर अजिबातच हलता आलं नाही. चाकू नराड्यात घेऊन तो खुर्चीवरच कोसळला ! टेबलावर रक्ताचं थारोळं झालं. बाकीचे गिर्हाईक बाहेर पळू लागले. ती बाई अजूनही रघूच्या समोरच बसून होती. रघू नीट मेलाय ना याची खात्री करत असावी. नंतर तिची चिठठी तिने रघूच्या खिशात कोंबली.  कुरियर बॉयला त्याच्या शेवटच्या डिलेवरीसाठी तिने पाठवून दिलं होतं. काही मिनिटांचं पोलीस, ऍम्ब्युलन्स, डॉक्टर वगैरे आले . आणि त्या बाईला आणि रघूला घेऊन गेले.

रघूच्या स्किमचा शेवट असा होईल असं मला वाटलंच नव्हतं. पण त्याचं मरणं अगदीच फुकट गेलं नाही. पोलिसांनी त्या बाईला ताब्यात घेतलं. तिच्यावर तिच्या नवर्‍याच्या खूनाचापण आरोप होता म्हणे. पण सिद्ध होत नव्हता. रघूच्या खुनाचा आरोप सिद्ध व्हायला काहिच प्रॉब्लेम आला नाही. रघूच्या नंतर त्याचे सगळे पैसे त्याने ठेवलेल्या बाईने घेतले आणि ती कोणातरी दुसर्‍या बरोबर पळाली असं कळलं.

बरीच वर्ष झाली आता या गोष्टीला पण अजूनही या सगळ्या प्रकाराचा मी कधी कधी उगाचच विचार करतो. रघूने त्या सगळ्या चिठ्ठ्या दिल्या असतील का? जर दिल्या असतील तर ह्या त्याच्या स्किम मधे कोणतीच फसवणूक नव्हती. बरोबर ना? काही काही गोष्टी बरोबर का चूक हे कधीच सांगता येत नाही. त्यातलीच ही पण एक गोष्ट.

(समाप्त)

No comments:

Post a Comment