Monday, May 2, 2011

वास्तव

सातव्यांदा राहुल आरशात डोकावला. गळ्यातली सोन्याची चेन आत टाकत, कोपर्‍यातल्या तंबोर्‍याकडे नजर टाकली. कधी नव्हे ते राहुलला आजच्या कार्यक्रमाआधी थोडी जास्त धाकधुक वाटत होती. अर्थात त्याला कारणही तसंच होतं. मुंबईतला त्याचा हा पहिलाच कार्यक्रम होता. काही तासांपुर्वीच थेटर हाऊसफुल्ल असल्याचं त्याला कळलं होतं. आणि जशी जशी कार्यक्रमाची वेळ जवळ येत होती तशी तशी त्याच्या मनातील हुरहूर वाढतच होती. राहुल गाण्याचे मेळावे करायला लागल्या पासून त्याची ख्याती सर्वदूर पसरली होती. लोकांना त्याचं गाणं, त्याचा आवाज खूपच आवडत होता.. इतका की लोक त्याची तुलना संगीतक्षेत्रातल्या दिग्गजांशी करायला लागले होते. राहुल आरशात बघत असतानाच दरवाजा वाजला.

“राहुल दिवेकर, दोन मिनीटं उरली आहेत.” पलिकडून आवाज आला.

“मी तयार आहे.” राहुलने उत्तर दिलं.

केसांवरून शेवटचा कंगवा फिरवून आणि कुर्ता पुन्हा एकदा नीट करून तो ड्रेसिंगरूमच्या बाहेर आला. बॅकस्टेजच्या पॅसेजमधून वाट काढत विंगेत येऊन उभा राहिला. पडदा अजून पडलेला होता. सुत्रधार राहुलची ओळख करून देत होते. बाहेर प्रेक्षागृहात सगळे प्रेक्षक एका अप्रतिम संगीत सोहळ्याच्या प्रतिक्षेत बसले होते. पडदा हळू हळू वर जात होता. आणि टाळ्यांच्या कडकडाटात राहुल रंगमंचावर येत होता. हा त्याच्या करियरसाठी अतिशय महत्वाचा कार्यक्रम होता. राहुलने अतिशय आत्मविश्वासाने गणेशवंदनेला सुरवात केली.

*****

रात्री सगळ्यांच्या नाईट देऊन झाल्यानंतर जोगळेकरांनी राहुलच्या हातात त्याच्या मानधनाचं पाकिट ठेवलं. राहुल आपल्या ड्रेसिंगरूममधे आला. अंग सैलावत आरामखुर्चीत बसतो न बसतो तोच दारावर थाप पडली. “कोण आहे?” थोड्या त्रासिक आवाजातच राहुलने विचारलं. “मी... गजानन देशपांडे”. नाव ऐकताच ताडकन उठून राहुलने दरवाजा उघडला. त्याच्या समोर साठीचे एक गृहस्थ उभे होते. अंगात मलमली कुडता आणि पांढरं शुभ्र धोतर, पायात कोल्हापुरी वहाणा आणि एका हातात काठी. गजाननबुआ देशपांडे म्हणजे त्याचं दैवत. त्यांना पाहताक्षणीच राहुल झटकन त्यांच्या पाया पडला. “यशवंत हो” साक्षात गजाननबुआंचा आशिर्वाद.

“बुआ तुम्ही इथे? मुंबईत?” राहुलला अजूजही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

“मी आत येऊ का?” आपल्या नेहमीच्या नम्र स्वरात बुआंनी विचारलं. त्यासरशी गडबडत जाउन राहूलने त्यांची माफी मागितली आणि दरवाज्यातून बाजूला झाला. त्यांच्या मागे दार बंद करून राहुलने त्यांना बसायला खुर्ची दिली. बुआंचं येण्याचं प्रयोजन काय असावं याचा राहुल विचार करत होता.

“बुआ, तुम्ही स्वतः माझ्या कार्यक्रमाला आलात हाच माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे. तुम्ही स्वतः इथे माझ्या ड्रेसिंगरूममधे आहात यावर माझा विश्वासच बसत नाहिये”.

काही न बोलता बुआंनी खोलीभर नजर फिरवली. खोलीत राहुलचं ड्रेसिंग टेबल, एक दोन खुर्च्या, एक आराम खुर्ची, तंबोरा आणि इतर थोडं सामान या व्यतिरिक्त फारसं काही नव्हतं. एका रिकाम्या खुर्चीकडे बोट करून त्यांनी राहुलला बसायला सांगितलं.

“तुमचं गाणं फार चांगलं झालं आज दिवेकर.” साक्षात गजाननबुआंच्या तोंडून स्वतःच्या गाण्याची स्तुती ऐकताना राहुलचं उर भरून आलं होतं. हे स्वप्न आहे का सत्य असं क्षणभर त्याला वाटून गेलं.

“बुआ, तुम्ही असं बोलून माझ्या सारख्या सामान्य गवयाला फार फार मोठं करताय”

“अर्थात अर्थात”

“छे छे! या सगळ्या शिष्टाचाराला आपण थोडावेळ बाजूला ठेउया. मी तुला राहुल म्हटलं तर चालेल ना ?” बुआंनी मोकळं हसत विचारलं.

“राहुल, तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं”

राहुलच्या मनात उगाच थोडी चलबिचल झाली. ‘म्हणजे फक्त माझं कौतुक करायला बुआ आलेले नाहीत तर’. मनातली खळबळ चेह‌र्‍यावर दाखवू न देण्याचा प्रयत्न करत राहुलने प्रश्नार्थक चेहरयाने बुआंकडे पाहिलं. क्षणभर त्याच्या डोळ्यात बघत पुढच्याच क्षणी बुआंनी नजर फिरवली. बुआ पुन्हा बोलू लागले.

“खरंतर, मी तुझ्या कार्यक्रमाबद्धलच बोलणार आहे.... पण नेहमी सारखं नाही. मला तुला जे सांगायचं आहे ते फार महत्वाचं आहे. पण त्या आगोदर मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. खरं खरं उत्तर देशील? तू हे गाण्याचे कार्यक्रम का करतोस?”

एक दोन क्षण राहुलला याचं उत्तर काय द्यावं हेच समजत नव्हतं. काही वेळापूर्वी आपल्या गाण्याची तारिफ करणारे बुआ त्याला असा प्रश्न विचारत होते. त्याच्यासारख्या गायकाने गाण्याचे कार्यक्रम का करावेत याचं उत्तर स्पष्टच होतं. “गाणं हेच माझं काम आहे बुआ.”

बुआंच्या कपाळावर सूक्ष्म आठी उमटली. “नाही, गाण्याशिवाय इतर अनेक गोष्टी तू करू शकतोस की. तुझे हे कार्यक्रम हेच काही एकमेव तुझ्या उपजिवीकेचं साधन नाही. गायक एक कलाकार असतो.”

“मला तुमचं म्हणणं नीटसं समजलं नाही” मनातला राग मनात ठेवत आणि आवाज संयमीत ठेवत राहुल म्हणाला.

“माझं म्हणणं एवढंच आहे की सगळीच माणसं दैवी गळा घेऊन जन्माला येत नाहीत. काही लोकांकडे तुझ्यासारखी दैवी देणगी नसते.”

त्यांच बोलणं मधेच तोडत राहुल म्हणाला... “म्हणजे मी मला मिळालेल्या देणगीची कदर करत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का?”

“मला म्हणायचं आहे की दैवी देणगी ही जन्माला येतानाच मिळते. आणि प्रत्येकाला ती मिळतेच असं नाही.”

राहुलने जरा त्रासूनच निःश्वास टाकला. बुआंना नक्की काय म्हणायचंय हे त्याला अजूनही कळलं नव्हतं. हे असं कोड्यात बोलून बुआंना काय साध्य करायचं आहे हेच त्याला समजत नव्हतं. उगाच आपण त्यांना काही भलतं सलतं बोलून जाऊ असं त्याला वाटू लागलं होतं.

“बुआ, कृपा करून तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला स्पष्टपणे सांगा.”

“तु गायक नाहीस राहुल. मला तुला हे सांगताना फार काही आनंद होत नाहीये.” बुआ ड्रेसिंगरूमकडे हात दाखवत म्हणाले “आणि आपण ह्या ज्या खोलीत बसलोय ती तुझी ड्रेसिंगरूमही नाहीये”.

राहुल बुआंच्या चेहर्‍यावर वेडाची झाक दिसते का ते पाहू लागला. ही माझी ड्रेसिंगरूम नाही तर मग काय आहे? हा माझा आरसा, माझी आवडती आराम खुर्ची आणि हा पांढरी चादर घातलेला छोटा पलंग … क्षणभर थबकून राहूलने पुन्हा पलंगाकडे नजर फिरवली. “हा पलंग इथे कुठून आला? माझ्या ड्रेसिंगरूममधे असा पलंग नव्हता... ही .. ही माझी ड्रेसिंगरूम नाही. काय चालंलय काय इथं?” ओरडतच राहूल उठून उभा राहिला. पण बुआ अजुनही शांतपणे त्याच्याकडे बघत होते. त्यांनी त्याच्या पाठीमागे बोट दाखवत बुआ पुढे सांगू लागले.

“ते मला म्हणाले की तु माझा फार मोठा चाहता होतास. म्हणूनच मला त्यांनी इथं बोलावलं तुझ्याशी बोलायला. तुझी मदत करायला.”

राहुलने चकित होत पाठीमागे वळून पाहिलं. त्याची ड्रेसिंगरूमची भिंत पूर्वीसारखीच दिसत होती. गजाननबुआंच्या असंख्य फोटोंनी आणि वर्तमानपत्रांच्या कात्रणांनी भिंत भरून गेली होती. गजाननबुआंबद्धल छापून आलेली प्रत्येक बातमी इथे भिंतीवर चिकटवलेली होती. राहुलला हे सगळं इथे कधी चिकटवलं हे मात्र त्याला आठवलं नाही.

“माझी मदत करायला?” राहुलने डोकं गच्च धरून ठेवलं. डोक्यावर कोणीतरी घणाघाती आघात करताहेत असं त्याला वाटू लागलं होतं.

“वास्तवाचा सामना करायला हवंस तू राहूल. आज १९९० हे साल चालू नाही. आणि हे मुंबईतलं नाट्यमंदिर नाही. हे ठाण्याचं हॉस्पिटल आहे. मी मघाशी म्हटलं तसं, तू गाण्याचे कार्यक्रम करणारा मोठा गायक नाहिस, तर ह्या थेटरमधे काम करणारा एक कारकून आहेस. तुझ्या घरी तुझी बायको आणि छोटी मुलगी आहे. तुझ्यावर प्रेम करणारं कुटूंब हीच तुझी देणगी आहे.” बुआंनी एका दमात सगळं सांगितलं पण शब्दा शब्दाला राहुलचं डोकं सुन्न होत होतं.

“नाही..तुम्ही खोटं बोलताय. हे सगळं खोटं आहे.. बस्स करा. मी कोण आहे ते मला पक्कं माहित आहे.” राहुलला हे दुःस्वप्न संपायला हवं होतं.

निराशेने मान हलवत बुआ म्हणाले, “डॉ. जोगळेकर, मी जे काही करू शकत होतो ते मी केलं... माझ्याने या माणसाचे हाल नाही बघवत.” बुआ दरवाज्याकडे चालत गेले. दरवाजा उघडताच पांढरा कोट घालून जोगळेकर आत आले.

“गजाननबुआ, तुम्ही जी काही मदत केलीत त्याबद्धल आभार. खरंतर राहुल दिवेकरांच्या वागण्यात थोडी सुधारणा होतेय आता. पण अशा केसेस मधे पेशंट बरा व्हायला किती वेळे लागेल हे कोणीच सांगू शकत नाही. कधी ना कधी ते पुन्हा वास्तवात जगतील ही आशा ठेवायची.. इतकंच आपल्या हातात आहे.”

“राहुल दिवेकर तुमचे फारच मोठे चाहते होते. तुमच्या व्यावसायिक आयुष्यातली प्रत्येक गोष्ट त्यांना माहीत आहे. मला वाटतं आयुष्यात आपणही तुमच्यासारखं मोठं गायक व्हावं ही त्यांची सुप्त ईच्छा असावी. त्यांनी गायकी शिकण्याचा प्रयत्नही खूप केला. इतकंच काय पण स्वतःचा एक कार्यक्रमही त्यांनी केला होता. त्यात त्यांनी तुमच्या गायकीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. समिक्षकांनी त्यावर भरपूर ताशेरे ओढले. नैराश्याच्या गर्तेत असताना कधितरी त्यांनी स्वतःचीच एक खोटी प्रतिमा निर्माण केली आणि स्वतः त्या खोट्या विश्वात रमायला लागले.”
बुआ तंद्रीतच म्हणाले “मुंबई”.. “इथेच मला प्रथम मोठं यश मिळालं. माझ्या आयुष्यच्या एका महत्वाच्या वळणावरचा कार्यक्रम होता तो”

बुआंनी वळून राहुलकडे शेवटचं पाहिलं. “अच्छा राहुल, ..” पण राहुलचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं.

बुआंचा आणि जोगळेकरांचा आवाज टाळ्यांच्या कडकडाटात त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हता. राहुल त्याच्या पुढच्या कार्यक्रमासाठी स्टेजवर चालत होता. लंडन, न्युयोर्क जगात सगळीकडे त्याचे कार्यक्रम होत होते. हेच त्याच्यासाठी वास्तव होतं.