Wednesday, February 2, 2011

तारका-पुष्प



माझं नाव डॉ. सुधा देशपांडे. मी एक वनस्पती शास्त्रज्ञ आहे. मी आज इथे हे लिहून ठेवतेय.. कदाचित कोणालातरी आमची परिस्थिती कळेल.. कदाचित त्यांना आमची दया येईल आणि आमचं दुसर्‍या कुठल्यातरी ग्रहावर पुनर्वसन करतील... अर्थात याची शाश्वती नक्कीच नाही.

सत्तावीस वर्ष झाली त्या गोष्टीला... आकाशातून पाउस पडावा तशी पुष्प-वृष्टी होउ लागली होती. सगळा फुलांचा पाउस त्यांनीच पाठवला होता. चिटुकली चंदेरी, सोनेरी रंगांची फुलं... सगळ्या जगभर त्यांची बरसात झाली होती. एकही देश एकही गाव सुटलं नव्हतं. पुष्पवृष्टी संपल्यावर 'सेटी' ला संदेश मिळाला होता..."तुमचा ग्रह खुप सुंदर आहे."  कोणालाच यातून काय अर्थ काढायचा समजत नव्हतं. नक्कि त्यांना काय म्हणायचंय हे कोणालाच कळत नव्हतं आणि त्या संदेशानंतर पुन्हा कोणताच संदेश मिळाला नव्हता. हा परग्रहावरूनच आलेला संदेश आहे हे मात्र "सेटी" च्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं होतं.

प्रथम सगळी कडे भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. जगभरातले राजकीय आणि धार्मिक नेते संभ्रमीत झालेले होते. त्यांनाही हे प्रकरण दाबून टाकणं अवघड झालेलं होतं... कारण ज्या दिवशी "सेटी" ला संदेश मिळाला त्याच दिवशी जगभरातल्या प्रत्येक घरातल्या टीव्ही वरून सुद्धा हा संदेश दिसू लागला होता... जगातल्या प्रत्येक भाषेमधून तो संदेश टिव्ही च्या पडद्यावरून दिवसभर दिसत होता. आमच्या सुंदर ग्रहाची त्यांना जणू काही आम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायची होती. लोकांना वाटलं की ती फुलं म्हणजे त्यांनी आमच्यासाठी पाठवलेलं गिफ्ट आहे! अर्थात जेव्हा सत्य परिस्थिती समजली तेव्हा आम्ही सगळेच अवाक झालो होतो. दिसतं तसं नसतं हेच खरं!

कित्येक महिने आम्हाला त्या फुलांचं प्रयोजन काही कळलं नाही. सगळे परग्रहावरून आलेल्या त्या संदेशामुळे थोडे गोंधळलेलेही होते... त्यामुळे त्या फुलांवर.. आम्ही त्याला 'तारका-पुष्प' हे नाव दिलं होतं... प्रयोग करायला कोणाला फारसा वेळ मिळाला नव्हता. आम्हा सगळ्यांना तो संदेश दिसत होता.. पण अजूनही खुद्द ते परग्रहवासी पृथ्वीवर उतरले नव्हते. सगळ्यांना वाटलं ते खूप खूप प्रकाशवर्ष दूर असावेत. आमची समजूत किती चुकीची होती !

"डॉ. देशपांडे, तुम्ही तारकापुष्पांवर केलेल्या प्रयोगांचे निष्कर्श पाहिलेत का?" संजयने विचारलं. संजय माझा विद्यार्थी होता. "नाही अजून पाहिले नाहित. तुला काही इंटरेस्टींग निष्कर्श मिळालेत का?" मी विचारलं.

"होय! मला वाटतं, ही तारकापुष्प फक्त फुलं नाहियेत... बघा ना.. इतके दिवस झाले तरी एकही फुल सुरकुतलेलं नाहीये.. आणी...."  त्याने थोडं थांबून म्हंटलं.."मला वाटतं की त्या फुलांमध्ये परागकण पण आहेत... जर परग्रहावरच्या वृक्ष-वनस्पती पृथ्वीवर वाढू लागल्या तर...." संजयने वाक्य पूर्ण केलं नाही.."होय संजय, तसं झालं तर काय होईल याचा फार खोलवर विचार करावा लागेल".. चेहर्‍यावरची काळजी लपवत मी म्हटलं.

संजयची भीती खरी ठरली. पहिल्या वर्षातच जगभरातून तारका-पुष्पांनी जाळं पसरवलं. फुललेल्या तारका-पुष्पांना एक सुखद आणि मादक असा सुगंध येत असे. काही दिवसांनंतर आणखीन एक विचित्र निरिक्षण आम्ही केलं.. कित्येक लोकांना त्या तारका-पुष्पांच्या ताटव्यात तासन् तास बसायला .. त्या मादक सुगंधात डुंबून जायला आवडत असे. त्या फुलांच्या वासामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचं अपायकारक रसायन मिळालं नाही त्यामुळे त्या विरुद्ध तक्रार करायला जागाच नव्हती. सुगंधच नव्हे तर तारका-पुष्प दिसायलाही फार आकर्षक होती. जवळ जवळ प्रत्येक रंगात उपलब्ध होती. कधी कधी तर ऋतूमानाप्रमाणे रंगसुद्धा बदलायची.  तारकापुष्प फुलल्यावर एका झुळूकेसोबत त्याचे परागकण सगळीकडे उधळायचे आणि तारका पुष्पांचे ताटवे पसरत होते. गंमत म्हणजे कुठल्याही प्रकारच्या माती मध्ये तारका-पुष्प खुशाल वाढत होती. पाणी असो वा नसो, तापमान थंड असो वा गरम... त्या मुळेच थंड बर्फाळ प्रदेशांपासून वैराण वाळवंटांपर्यंत कुठेही तारकापुष्प दिसून येत होती.  

आमचा तारका-पुष्पांचा अभ्यास चालू असतानाच एक बातमी कानावर आली. जगभरातील जननप्रमाण   अतिशय घटत चाललं होतं... मी ती बातमी वाचायला लागले. "ज्या भूभागांमध्ये तारका-पुष्पांचं प्रमाण जास्त आहे तेथिल जननप्रमाण सर्वात कमी असल्याचं निदर्शनास आलं आहे. परंतू तारका-पुष्पांचा आणि जननप्रमाण कमी होण्याचा थेट संबंध असल्याचं अजून तरी खात्रीलायक रित्या म्हणता येणार नाही."  ह्या बातमीदाराने नेहमीप्रमाणे कशातूनही कसलाही निष्कर्श काढला आहे असंच मला वाटलं. खरं खोटं समजायला फार वेळ लागणार नाही.

"डॉ. देशपांडे, आज तारका-पुष्पांवर प्रसिद्ध झालेला निबंध वाचलात का?" संजयने काळजीच्या सुरात विचारलं.तारका-पुष्पांचं पृथ्वीवर आगमन होऊन तीन वर्ष झाली होती.

"होय, आणि मी सुद्धा त्याचाच विचार करतेय सकाळ पासून. तारका-पुष्पांपासून निघणार्‍या परागकणांचा मानवी पुनरुत्पादनक्षमतेवर परिणाम होत होता.... ह्याच कारणासाठी तारका-पुष्प पृथ्वीवर पाठवली तर नसतील? आत्तापर्यंत जवळजवळ प्रत्येक जण तारका-पुष्पांच्या संपर्कात आला आहे. आणि नुसतं जननप्रमाण घटतंय एवढच नाही तर भ्रूणमृत्यूंचं प्रमाणही वाढलं आहे. नॉर्वे मध्ये गेल्या चार महिन्यात एकही जन्म नोंदवला गेला नाहि."

शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रयोगांअंती तारका-पुष्पांच्या परागकणांचा मानवी जननक्षमतेवर होणारा परिणाम घातक असल्याचा निर्वाळा दिला. मग जगभरातून ह्या तारकापुष्पांना नष्ट करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर हालचाली घडू लागल्या. पण नाजूक दिसत असूनही तारकापुष्पांना नष्ट करणं फार अवघड आहे हे लवकरच समजून आलं. शिवाय आता कुठल्याही उपाययोजनेला फार उशिर झाला होता. आम्ही सगळेच त्या परागकणांच्या संपर्कात आलो होतो. गेली कित्येक वर्ष आमच्या श्वासातून ते परागकण आमच्या शरिरात शिरले आहेत.

आणि मग एके दिवशी "सेटि" आणि आम्हा सगळ्यांनाच आणखी एक संदेश मिळाला.

"तुमचा ग्रह खुप सुंदर आहे.
पण त्याची काळजी घेण्यात तुम्ही कमी पडला आहात.
पृथ्वीसारखा ग्रह सापडणं ह्या विश्वात खरोखरच खुप दुर्मिळ आहेत.
म्हणूनच ह्या ग्रहाला तुमच्यापेक्षा जास्त जबाबदार जमातीसाठी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तुम्हा मानवांसारखे आम्ही क्रूर नाही.
म्हणूनच तुमची जनन-क्षमता हळूहळू कमी करणे हा मानवजात नामक रोगाचं निर्मूलन करत आहोत. 
हा एखादी जमात संपवण्याचा सर्वात सोपा आणि कमीत कमी यातना देणारा उपाय आहे.
तुमच्या ग्रहावरच्या कालमापन पद्धतीप्रमाणे एकशे पन्नास वर्षांनी आम्ही परत येऊ.
तोवर तुमची जमात संपुष्टात आली असेल.
आणि, तुम्ही तुमच्याच एका यानामधून पाठवलेल्या तुमच्या ग्रहाच्या नकाशाबद्धल धन्यवाद."

कित्येक वर्षांपूर्वी व्हॉयेजर यानातून पृथ्वीबद्धलची माहीती आणि पृथ्वीवरिल सगळ्या भाषांमधून रेकॉर्ड केलेला संदेश सूर्यमालेच्या बाहेर पाठवण्यात आला होता. त्याचाच वापर करून त्यांनी आम्हाला शोधून काढलं होतं. आज २०४६ साल चालू आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच गेल्या दोन दशकांमधे  जगात कुठेच एकही बाळ जन्माला आलेलं नाही. तारका-पुष्पांच्या परागकणांवर मात करणार औषध शोधून काढणं आजवर जमलेलं नाही. जगातील सरासरी आयुर्मान आता ५५ झालेलं आहे.  म्हातारं होऊन मरणाची वाट बघण्याखेरिज आमच्या हातात काही उरलेलं नाही.

(समाप्त)

6 comments:

  1. बाप रे.. भयानक !! खरंच असं झालं तर? असं होऊहि शकतं म्हणा.. आणि आपणच त्याला जवाबदार असू !

    ReplyDelete
  2. जगाचा अंत ह्या विषयावर आजवर अगणित कथा लिहिल्या गेल्या असतील. अणुबॉम्ब, परग्रह वासियांकडून आक्रमण, दहशतवाद, उल्कापात वगैरे अनेकविध संभवनीय प्रकारे जगाचा अंत ओढवू शकतो असच चित्र त्यात रंगवलेलं असत. त्यात ही एक भर. :)

    ReplyDelete
  3. Doomday cha navin chapter...intersting...pudhlya post chi wat ahatey

    ReplyDelete
  4. Very imaginative ... never knew this side about you !!

    ReplyDelete
  5. भयानक....अस काही झाल तर???

    कदाचित होऊ पण शकेल.शक्यता नाकारता येत नाही...

    ReplyDelete
  6. बापरे!
    असं घडू शकेल का याचा विचारही बर्फाळून गेला, हे वाचतांना!

    ReplyDelete