Friday, January 27, 2012

कुरियर बॉय - भाग २

भाग-१
"अरे काय विचारू नको. धंदा एकदम जोरात चालू आहे. जवळपास हजार चिठ्ठ्या जमल्या आहेत. मी आता याच बिल्डिंगमधे वरच्या मजल्यावर राहतो. मस्त आहे खोली. येतोस आत्ता?"
"आता नको. मला बर्‍याच डिलीवरी करायच्या आहेत. नंतर कधीतरी." मी तिथून सटकलो.
पण आमची भेट लवकरच होणार होती.
आता पुढे...

त्यादिवशी नंतर बरेच दिवस रघु दिसला नाही. आणि जेव्हा दिसला तेव्हा त्याची एका वेगळ्याच अर्थाने ओळख पटली नाही. मला वाटलं होतं आता पर्यंत त्याने भरपूर पैसा जमवला असेल आणि मस्तपैकी बस्तान बसवलं असेल. पण त्याच्या कडे पाहून एकूण त्याचं काही खरं नाही इतकं मात्र जाणवलं.

रात्री दोन वाजता माझ्या खोलीचं दार खाडखाड वाजत होतं. दिवसभराच्या कामानंतर मी अगदी गाढ झोपेत होतो. त्यामुळे दार वाजल्यावर उठावंसंच वाटत नव्हतो. पण थोड्या वेळाने दार उघडलं नसतं तर कदाचित तो दार तोडूनच घरात शिरला असता. मी आधीच झोपेत होतो आणि त्यातून अशा भलत्या वेळी रघुला माझ्या दारात पाहून मी जाम गोंधळलो.

"काय रे? तू आत्ता ह्या वेळी? पोलिस बिलिस लागलेत की काय पाठिमागे"
अर्धवट झोपेत त्याच्या मागे पोलिस वगैरे असतील तर आत्ता मला तो घरात नको होता. मी लाईट लावू लागलो.

"लाईट नको लाउ आणि आधी दार बंद कर. मग सांगतो"
तो पटकन आत येत म्हणाला. त्याच्या एकून वागण्यावरून तो जाम घाबरला वाटत होता. पण त्याच वेळी त्याची भीती लपवायचा पण प्रयत्न करत होता. नक्कीच कायतरी भानगडीत अडकला असणार. पण च्यायला माझ्या घरी येऊन मला त्यात उगाचच गुंतवलं तर नसतं झंझट माझ्या मागे लागेल. मी दरवाजा लावला. रघु खोलितल्या खोलीत येरझारा घालत होता.

"काय लफडं झालं रे?" मी त्याला पाणी देत विचारलं.

अधाशासारखं पाणी पिउन झाल्यावर तो म्हणाला "यार मन्या, ती बाई माझ्या पाठी लागलीय!"

"आँ! बाई पाठी लागलीय?" च्यायला आमच्या पाठी कोण नाय लागत म्हणून आम्ही रडतो, आणि ह्याच्या पाठी बाई लागलेय म्हणून ह्याची तंतरलीय? मला तशा वातावरणात पण एकदम हसायलाच आलं.

"हसतोय काय साल्या. जिथं जाईन तिथं ती मागावर असते. एकवेळ पोलिस परवडले पण ही बया नको. आजकाल रात्री झोपपण लागत नाही मला. कारण ही बया बाहेर उभी राहून माझी वाट बघत असणार हे मला माहितेय. मी घराच्या बाहेर पडलो की लगेच पाठलाग सुरू. कुठेही गेलो आणि मागं वळून बघितलं की असतेच. अगदी खाली पानवाल्याकडे पण जायची चोरी!"

"ह्म्म.. मग तिला विचारलंस का की बाई तू का माझ्या पाठी पाठी करतेस?" मी शक्य तितक्या शांत पणे परिस्थिती समजून घेण्याचा विचार करत होतो.

"तिने माझी पेपर मधली जाहिरात वाचली आणि मला भेटायला आली होती. मी तिची चिठ्ठी आणी पैसे घेतले."

"बरं मग"

"मग काय... आता माझ्या मरणाची वाट बघतेय ती!"
मला हसू आवरेनासं झालं. त्याच्या स्किममधला हा धोका त्याच्या लक्षातच आला नव्हता.

"तू एकटाच आहेस ना इथं?" रघुने इथे तिथे बघत विचारलं.

"हो! तुला काय वाटतं ती बाई इथे पण येईल?"

"काही सांगता येत नाही. आली तर काही आश्चर्य वाटायला नको. सालीला झोप वगैरे काही नाहीच! येडीच वाटते यार. "

"मग! तुला काय वाटलं? शहाणी लोकं तुझी जाहिरात वाचून तुला पैसे पाठवत असतील?"

पण रघुचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो त्याच्या तंद्रीतच बोलत होता.
"मी नक्की कधी चिठ्ठी देणार हे हवाय माझ्या कडून. पैसे दिल्यानंतरच्या दुसर्‍या दिवसापासून तिचे फोन चालू. दिवसाच काय रात्री बेरात्री कधी पण. वैताग साला. मग मी फोन घ्यायचं बंद केलं. तेव्हापासून मग अशी पाठलाग करत फिरत असते."

"काय प्रॉब्लेम काय आहे तिला?"

"म्हणते की एकदम अर्जंट निरोप आहे तिचा. तिच्या नवर्‍यासाठी. येडी साली. नुकताच मेलाय म्हणे नवरा. अर्जंट म्हणे! मायला तो एक आधीच मेलेला आणि त्यात बायको अजून त्याला अर्जंट चिठ्ठ्या पाठवतेय. बिचार्‍याचं नशिबच वाईट असणार म्हणून असली बायको मिळाली. कदाचीत त्याने स्वतःलाच खलास केलं असेल ह्या असल्या बायकोमुळे.

"ह्म्म. चिठ्ठीत काय लिहिलंय?"

"फार काही नाही, फक्त 'मला माफ कर' इतकंच. मला चिठ्ठी देताना सांगत होती, एकदा म्हणे तिचं तिच्या नवर्‍याशी भांडण झालं आणि नवर्‍याला हार्ट अ‍ॅटेक येऊन मेला. .. मेला कसला, सुटला असल्या येडीच्या तावडीतून ! गळफास लावला असणार त्यानं. तिला आता खूप वाईट वाटतंय म्हणून आता पुन्हा पुन्हा मला सांगत होती. तो मेल्यावर अक्कल आलीय हिला."

"बरं मग आता जर तुला तिचा त्रास होत असेल तर तिचे पैसे परत करून टाक सरळ. नाय जमणार म्हणावं!"

"तेच करायला लागणार बहुतेक."

"मग आत्तापर्यंत का नाही केलंस?"

"सॉल्लिड पैसे दिलेले रे तिने! माझा नेहमीचा रेट हजार रुपये... पण तिने दहा हज्जार दिलेत"

"तिला काय एक्स्प्रेस डिलेवरी वाटली काय?" मी गमतीत म्हणालो, पण बहुतेक तिला तसंच वाटलं असण्याची शक्यताही होती.

रघु खिडकीच्या पडद्याआड उभं राहून बाहेर बघत होता.
"आयला"

"काय झालं?"

"ती बघ. बाहेर उभी आहे"

"कुठे?" मी कुतूहलाने खिडकीपाशी जाउन डोकावलो. मला बाहेरच्या अंधारात फारसं काहीच दिसलं नाही. रस्ता सुनसान होता. पलिकडे झोपडपट्टी होती तिथे पण काही हालचाल नव्हती. इथे तर रस्त्याला लाईटपण नव्हते. कोण बाई या वेळी इथे असणारे? ह्या रघ्याला भास होत असणार.

"कोण पण नाहीये तिथे."

"तिथे खाली रस्त्याच्या त्या साईडला, त्या खोपटाच्या मागच्या बाजूला बघ. हातातलं घड्याळ चमकताना दिसताय बघ! साली सारखी सारखी घड्याळात बघत असते. बसची वाट बघतात तशी माझ्या मरायची वाट बघतेय! काय पण अवदसा पाठी लागलेय"

मी त्या दिशेने बघितलं. थोडा वेळ गेला तरी मला कोणी दिसेना. मी वळणार इतक्यात त्या खोपटाच्या मागच्या बाजूला काहीतरी चमकलं. नीट बघितलं तर खरोखरच कोणीतरी उभं होतं.
"आयला हो रे. कोणीतरी उभं आहे तिथे."

"कोणीतरी नाय तीच आहे."

"मग आता काय करणार. सरळ जाऊन तिला भेट ना. जा बाई तुझे पैसे घेऊन. तुला निदान शांतपणे झोप तरी लागेल." मी म्हणालो.

रघु अजूनही खिडकीतून बाहेर बघत उभा होता. त्याच्या अंगावर चांगलाच काटा आला होता.
"उद्याच तिला तिचे सगळे पैसे परत देउन टाकतो." माझ्याकडे न बघताच रघु तोंडातल्या तोंडात बोलला.
"मी आजच्या रात्री इथे झोपलो तर चालेल का? आता बाहेर पडायची हिंमत नाही आपली. शिवाय आत्ता या वेळेला माझ्याकडे एवढे पैसे पण नाहियेत. उद्या खोलीवर जाउन सकाळीच पैसे देऊन टाकतो मग सगळं नीट होईल. चालेल ना?"

"ठिकाय. पण माझ्याकडे फक्त ही फाटकी सतरंजी आहे."

"चालेल चालेल यार. माझीच एवढी फाटलेय.. सतरंजीचं काय मग" रघु उसनं हसत हसत म्हणाला.

"उद्या सकाळी सकाळी मामला खतम करून टाक"

"हो रे बाबा" फाटक्या सतरंजीला सरळ करून रघु त्यावर आडवा झाला.
इतके दिवस ऐषारामात जगणारा असा एकदम जमिनीवर झोपलेला पाहून त्याच्या बद्धल मलाच वाईट वाटायला लागलं. चांगलं डोकं दिलंय देवाने. चांगल्या जागी वापरलं असतं तर? जाउदे. मी पण पांघरूण डोक्यावर घेऊन झोपून गेलो. रघु पण थोड्याच वेळात घोरायला लागला.

सकाळी सकाळी रघुनेच मला उठवलं. "मन्या तू पण चल माझ्या बरोबर यार."
रघु स्वतःच्या खोलीवर घेऊन गेला. अपेक्षेप्रमाणे ती बया आमच्या पाठी होतीच. मग पैसे घेऊन आम्ही तसेच त्या बाईच्या समोर गेलो. रघु रस्त्यातच तिला पैसे देत होता. पण तिच म्हणाली,  "मला खूप भूक लागलीय, आपण समोरच्या उडप्याकडे जाऊया का?"

बाई बोलायला तर बरी वाटत होती. पण अवतार मात्र बघण्यासारखा होता. हॉटेलात गेल्यावर रघुने पुन्हा बोलायला सुरवात केली
"बाई, मी गेल्या आठवड्यात डॉक्टरांकडे जाऊन सगळ्या टेस्ट केल्या. डॉक्टरांनी मला अजून सहा महिने तरी काही होत नाही असं सांगितलंय! तुम्हाला तुमची चिठ्ठी पोचवायची घाई आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे व चिठ्ठी परत घ्या"

बाई थोडा वेळ काही बोललीच नाही. मग एकदम म्हणाली, "असं कसं म्हणाले डॉक्टर? नक्की त्यांनी सगळ्या टेस्ट बरोबर केल्या ना? कधी कधी डॉक्टरांचं चुकतं. पुन्हा एक्दा टेस्ट करुया का?"

जास्त दिवस जगायला मिळणार म्हणून कम्प्लेन करणारी बाई मी पहिल्यांदाच बघत होतो. रघु म्हणाला ते बरोबरच होतं. हीचं डोक्यावर नक्कीच परिणाम झालेला असणार.

रघु शक्य तेवढा सरळ चेहरा ठेवत म्हणाला "हो बाई, मी काही इतक्यात मरत नाही."

हे ऐकल्यावर बाईचा चेहरा थोडा रडवेला झाल्यासारखा वाटला. रघुने टेबलवर ठेवलेले पैसे तिने हातात घेतले आणि पर्स मधे ठेवले. त्याच वेळी पर्समधून एक चाकू काढून रघुच्या गळ्यात आरपार घुसवला. रघुला आणि मला सावरायला वेळच मिळाला नाही. अँम्बुलंस येईपर्यंत रघु मेलेला होता. कुरियर बॉयला त्याच्या शेवटच्या डिलेवरीसाठी तिने पाठवून दिलं होतं.

रघुच्या स्किमचा शेवट असा होईल असं मला वाटलंच नव्हतं. पण त्याचं मरणं अगदीच फुकट गेलं नाही. पोलिसांनी त्या बाईला ताब्यात घेतलं. तिच्यावर तिच्या नवर्‍याच्या खूनाचापण आरोप होता म्हणे. पण सिद्ध होत नव्हता. रघुच्या खुनाचा आरोप सिद्ध व्हायला काहिच प्रॉब्लेम आला नाही. रघुच्या नंतर त्याचे सगळे पैसे त्याने ठेवलेल्या बाईने घेतले आणि ती कोणातरी दुसर्‍या बरोबर पळाली.

या सगळ्या प्रकाराचा मी कधी कधी उगाचच विचार करतो. रघुने त्या सगळ्या चिठ्ठ्या दिल्या असतील का? जर दिल्या असतील तर ह्या त्याच्या स्किम मधे कोणतीच फसवणूक नव्हती. बरोबर ना? काही काही गोष्टी बरोबर का चूक हे कधीच सांगता येत नाही. त्यातलीच ही पण एक गोष्ट.

(समाप्त)

(ऋणनिर्देशः ह्या कधेमागची कल्पना काही वर्षांपूर्वी ऐकली/वाचली होती पण सोर्स आठवत नाहिये. कोणाला माहित असेल तर कृपया कळवा.)

Thursday, January 26, 2012

कुरियर बॉय!

रघु आता या जगात नाही. मरताना त्याच्याकडे एकूण दोन हजार आठशे पंधरा संदेश होते. अर्थात त्याच्या डायरीतल्या नोंदींप्रमाणे. त्याची ही स्किम नक्की कधी सुरु झाली? म्हणजे जेव्हा त्याने तो उद्योग सुरू केला तेव्हा ती एक 'स्किम'च होती. नंतर मात्र काहीतरी भलतंच होऊन बसलं.

दोन वर्षापूर्वी ऑक्टोबर महिन्यात एका दुपारी त्याच्याशी बोलताना प्रथम त्याने मला त्याच्या ह्या नविन स्किमबद्धल सांगितलं. तो त्याच्या एका खोलीच्या जागेत एकुलत्या एका खुर्चीवर आरामात दारु ढोसत बसला होता. दुपारच्या उन्हाने तापलेले पत्रे.. अंगाची नुसती काहिली होत होती आणि हा जणु फुल्ल एसी चालु असल्यासारखा आरामात होता. अंगात बनियान आणी लुंगी. बनियानला इतकी भोकं होती की त्याने ती न घालता उघडाच राहिला असता तरी काही बिघडलं नसतं.  सगळीकडे त्याच्या देशी दारुचा वास भरून राहिला होता. मला तर श्वास घेणंही नकोसं होत होतं. पण तरीही त्याला भेटायला मी आलो होतो. त्याला समजावणं मी माझं कर्तव्य समजत होतो.

"तुला काहीतरी कामधंदा तर करायलाच हवा ना!" मी त्याला म्हंटलं.

चकण्याच्या बशीतले थोडे दाणे तोंडात टाकत बेदरकार नजरेने तो माझ्याकडे बघत होता. संपलेली बाटली त्याने कोपर्‍यात फेकली. खोलीत एका कोपर्‍यात बाटल्यांचा ढीग झालेला होता. तीन चार दिवसांचे वाढलेले खुंट खाजवत बसलेल्या रघुचा मला अतिशय राग येत होता.

"अरे, तुझ्याकडे या दारुसाठीतरी कुठून पैसे आले?"

उत्तरादाखल रघु माझ्याकडे बघून थोडं हसला. गूढ की काय म्हणतात ना तसं काहीसं. गेले चार पाच महिने रघु बेकार होता. आधी माझ्याबरोबरच कुरियर बॉय म्हणून काम करायचा. पण डिलीवरीमधे सारखे सारखे घोळ व्हायला लागले तसा सायबांनी बांबू दिला. पण आपला पुर्वीपासूनचा मित्र, म्हणून अडीनडीला धा-वीस रुपये मी त्याला देत होतो. पण गेला महिनाभर त्याने माझ्याकडूनपण पैसे घेतले नव्हते. शिवाय बघावं तेव्हा या खोलीत पीत बसलेला!

"हसतोस काय!" मी घुश्श्यातच बोललो, "काही काम करणं सोडा, पण या खुर्चीवरनं बुड तरी उचलंल आहेस का इतक्या दिवसात?"

त्याने बोटानेच मला गप्प राहण्याची खूण केली. खुर्चीवर बसल्याबसल्यासुधा तो भेलकांडत होता.
"कामधंदा करण्याचे सगळे प्रयत्न करून झालेले आहेत माझे", रघुने तोंड उघडलं एकदाचं.

"अरे, काम मिळत नसेल तर मला सांग, मी तुझ्यासाठी काहीतरी शोधून ठेवतो" मी समजूतीच्या स्वरात म्हणालो.

"मन्या, तुला शाण्या माणसातली आणि येड्या माणसांतला फरक माहितेय?" त्याने विचारलं, मी त्यावर काही बोलणार इतक्यात प्रवचनकर्त्याच्या थाटात तो पुढे बोलायला लागला, "येडी लोकं पडेल ते काम करतात. का म्हाईतीये? तर आपण नुस्तं बसून र्‍हायलो आपल्याला कोण काय म्हणेल या भितीने. पण शाणी  माणसं मंजे एकदम सुम! जो पर्यंत आपल्याला काही करायची गरज पडत नाही तोवर ते लोक काय म्हणतील याची पर्वा न करता ते आरामात असतात!"
त्याचं हे जगावेगळं तत्वज्ञान ऐकून मला हसावं का रडावं ते समजेना.

त्याने मला थांबायला सांगितलं, आणि लडखडत भिंतीवरच्या कपाटातून आणखी एक बाटली आणि कोणतातरी पेपर घेउन आला. बाटली अर्थात माझ्यासाठी आणली नव्हती. पेपर पुढे करून म्हणाला "हे वाच!"

पेपरमधे "छोट्या जाहिरातीचं" पान काढलं होतं. त्यातल्याच एका जाहिरातीभोवती पेनाने गोल केला होता. मी वाचायला लागलो

__ तुमच्या प्रिय मृत व्यक्तींकडे संदेश पोचवा !__


"हा काय प्रकार आहे?" मला काही समजलं नव्हतं.

"कोन म्हनलं मी कायपण करत नाही?" तो म्हणाला "ही माझी नवी स्कीम आहे. लोकं आपल्या मेलेल्या नातेवाईकांना निरोप पाठवण्यासाठी कितीही पैसे द्यायला तयार असतात!"

"क्काय?" मला काय बोलावं तेच सुचेना.

"बिहारमधे कोणीतरी असं केलेलं म्हणे.. चिक्कार पैसे कमवले!" रघु महाराज माहिती देत होते.
"कधी ना कधी नाहीतरी मी मरणारच आहे.म्हटलं त्यापुर्वी आपला फायदा करून घ्यावा. लोकं
ह्यापेक्षा कितीतरी गंडवागंडवीचे प्रकार करतात!"

अजूनही रघुची स्किम माझ्या टाळक्यात शिरेना. हा काय आता आत्महत्या वगैरे करणार की काय?   "अरे पण त्यापेक्षा सरळ काही तरी काम का नाही करत? मरायची कसली घाई तुला? आणि मेल्यावर तुला ह्या पैशाचा काय उपयोग?"

"तू पण साला येडाच आहे मन्या! मेल्यावर नाही आत्ताच पैसे मिळणार मला. हे काय 'क्याश ऑन डिलेवरी' वाटलं काय तुला?"

मी तोंडात मारल्यासारखा गप्प झालो आणि त्याची जाहिरात पुन्हा वाचायला लागलो.
"हे इथे काय लिहिलंय? तुला क्यांसर आहे आणि लवकरच तू मरणार आहेस? हे काय आता?"

निर्विकारपणे खांदे उडवत रघु सांगू लागला "हे लिहिल्याशिवाय कोण मला पैसे देईल? शिवाय कित्येक वर्षं मी डॉक्टरांकडे गेलेलो नाही. मला क्यांसर नाहीच हे कसं कळणार?"
रघुकडे माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं.

"तू आणि मी त्या भिक्कार कुरीयर कंपनीत किती वर्षं आहोत.. काय फरक पडला आपल्या आयुष्यात इतक्या वर्षात.. ही भिकारडी खोली आणि ही बाटली! साला वैताग आलाय आपल्याला सगळ्याचा आता"

"म्हणून मग आता हे धंदे? लोकांना फसवण्याचे?"

"काय फसवणं फसवणं लावलंय रे? जर मी पैसे घेऊन त्यांचे निरोप पोचवले नाहीत तर मी त्यांना फसवेन! पण तो पर्यंत मी त्यांना फसवतोय हे सिद्ध तरी करता येईल का?" रघुने एकूण फारच खोलात जाउन याचा विचार केलेला दिसतोय!

"आणि ह्या निरोप पोचवायच्या बदल्यात तुला काय मिळणार?"

"तीनशे रुपये फक्त"

"काय बोलतो!" आश्चर्यापेक्षा माझ्या आवाजात अविश्वास जास्त होता. "एका निरोपाचे तीनशे रुपये! आणि त्याबदल्यात तू काय करणार?"

"गिर्‍हाईक मला फक्त एक चिठ्ठी देणार. आणि मी मेल्यावर ती चिठ्ठी त्यांच्या मेलेल्या नातेवाईकांना देणार! जन्मभर कुरीयरगिरी केलीच आहे! त्यातुनच तर ही आयडिया आली आपल्याला" रघु मोठ्या अभिमानाने सांगत होता.

"आणि लोकं खरंच पैसे देतात? काय भंकस करतो काय? लोकं हे वाचतात तरी का?"

"चिक्कार! दररोज मला कोण ना कोणतरी भेटून पैसे देतंय हे वाचल्या पासून. मी येत्या आठवड्यात पुन्हा जाहिरात टाकणारे!"

"लोकं खरंच पैसे देतात?" माझा विश्वासच बसत नव्हता!

"अर्थात! एकदम शिंपल मामला आहे! ते पैसे देतात आणि मी खर्च करतो!"

"आणी ह्यात काही चुकतं आहे असं तुला अजिबात वाटत नाही ना?"

"अजिबात नाही" रघुला उपहास वगैरे फारसं कळत नाहीच "फक्त माझ्या प्लॅन मधे फक्त एकच प्रॉब्लेम आहे!"

"फक्त एकच !"

"ज्या लोकांचा देवधर्मावर विश्वास नाहीये त्यांना कसं पटवायचं हे समजत नाहिये!"
रघु काहीही बोलण्याच्या पलिकडे गेला होता. मी त्याचा नाद सोडला आणि निघून आलो.

रघुने त्याच्या नविन स्किम बद्धल मला सांगितल्यानंतर लवकरच त्याच्या चाळीतल्या सगळ्यांना सुद्धा सांगून टाकलं. काही लोकांना तो लवकरच मरणार म्हणून त्याची दया येत होती तर काहींना त्याने मृत्यूनंतरही अंगावर घेतलेल्या कामगिरीसाठी त्याच्या बद्धल आदर वाटू लागला होता.  त्याने मला म्हटल्याप्रमाणे त्याच्या जाहिराती पेपरमधून वरचेवर दिसू लागल्या होत्या. त्याला भेटून चिठ्ठी देणार्‍यांच्या संख्येत चांगलीच वाढ होत होती. अगदी लांबून लांबून त्याला लोकं पैसे आणि चिठ्ठ्या पाठवू लागले.

हां हां म्हणता पठ्ठ्याने चांगलंच बस्तान बसवलं. एक सेकंडहँड गाडीसुद्धा घेतली. अंगावर नवीन कपडे, पायात चकचकीत बूट. एखाद्या बी ग्रेड पिच्चरच्या होरोसारखा दिसू लागला होता. अर्थात त्याचा "रेट" तीनशे रुपयांवरून हजार रुपयांवर गेला होता. त्याच्या आधीच्या कोंदट खोलीतून त्याच्याच बाजूला नुकत्याच झालेल्या बिल्डींगमधे दोन रून भाड्याने घेऊन राहण्यापर्यंत त्याची प्रगती झाली होती. शिवाय, कुठलीतरी बाई आणून त्या खोलीत ठेवल्याची कुजबूजही आजकाल ऐकू येत होती.

नंतर एकदा आम्ही भेटलो तेव्हा मला तो ओळखूसुद्धा आला नाही. मी त्याच्या बिल्डींगमधे काही पार्सल पोचवायला गेलो होतो. जिन्यात रघु समोरून भारीतल्या कपड्यांमधे तोंडात सिगारेट ठेउन उतरत होता.

"मन्या!" त्याने हाक मारली आणि पाठीवर जोरदार दणका देऊन मला म्हणाला " काय यार! विसरला काय आपल्याला?"

"अरे रघु! काय साला ओळखलंच नाही तुला! काय चालंलंय आजकाल!" त्याचं काय चाललंय याची पूर्ण माहिती असूनही मी वेड पांघरायचं ठरवलं.

"अरे काय विचारू नको. धंदा एकदम जोरात चालू आहे. जवळपास हजार चिठ्ठ्या जमल्या आहेत. मी आता याच बिल्डिंगमधे वरच्या मजल्यावर राहतो. मस्त आहे खोली. येतोस आत्ता?"

"आता नको. मला बर्‍याच डिलीवरी करायच्या आहेत. नंतर कधीतरी." मी तिथून सटकलो.

पण आमची भेट लवकरच होणार होती.

(क्रमशः)

Monday, September 19, 2011

आठवणी


आपल्या आयुष्यात काही काही आठवणी अशा असतात की कितीही प्रयत्न केला तरी त्या विसरल्या जात नाहीत. आयुष्याच्या संध्याकाळी मग कधी कधी ह्या आठवणी मनात पिंगा घालायला लागतात. जसं जसं मागं जावं तशा तशा ह्या आठवणी थोड्या विरळ होत जातात. एकाद्या धूसर चित्रांचा अल्बम बघावा तशा.... एखाद्या सुराचा, एखाद्या गंधाचा किंवा एखाद्या प्रसंगाचा संदर्भ घेउन अडगळीत पडलेल्या असतात. अडगळीप्रमाणेच.. कधी कधी तर आठवणी अगदीच असंबद्ध असतात. त्या स्मृतींची अडचण अजून का डोक्यात साठली आहे असा प्रश्न पडतो. प्रत्येक स्मृती एखाद्या अद्भुत स्वप्नासारखी वाटते आताशा. लहानपणीच्या त्या आठवणी .. जेव्हा पर्‍यांची राज्य खालसा झाली नव्हती. वाढत्या वयासोबत निरागसता हरवत गेलेली असली तरी त्यांच्या स्मृती अजूनही शाबूत आहेत.

माझ्या काही आठवणीतर कुठल्याही संदर्भाशिवाय उगाच डोक्यात ठाण मांडून बसल्या आहेत. आमच्या गावातल्या छोट्या घरात आजोबांच्या मांडीवर बसून आरती करायचो. जशी आजोबा आजींची प्रेमळ नजर अजूनही मला तितकीच स्पष्टपणे आठवतेय तसंच एकदा अंगणात भर दुपारच्या उन्हात मुंग्यांच्या रांगेमागे चालत जाउन त्यांचं वारुळ शोधल्याचंही आठवतंय.  काही काही आठवणींवर तर माझा स्वतःचाच विश्वास बसत नाही.. म्हणजे त्या आठवणी खर्‍या आहेत की माझी स्वप्नं तेच समजत नाही.

आता हीच आठवण बघा ना! मला तो प्रसंग अगदी जशाच्या तसा आठवतोय. अगदी त्यातल्या सगळ्या बारिकसारिक तपशीलांसह. पण तो प्रसंग खरा की ते एक स्वप्न होतं ते मला अजूनही नक्की कळलेलं नाही. 
 
त्यावेळेला आम्ही, म्हणजे मी आणि दादा, गावातल्या घरात आजी आजोबांकडे राहायला गेलो होतो. मी साधारण पाच सहा वर्षांचा असेन, आणि दादाचं वय आठ-नऊ. मला आणि दादाला आजोबांनी एक वेगळी खोली दिली होती. आमची थोडी खेळणी आणि सटर फटर इस्टेट आम्ही ठेवली होती. त्याच खोलीत आजोबांनी आमच्या खाटा ठेवल्या होत्या. 

एकदा रात्री कधीतरी मला तहान लागून जाग आली. सगळीकडे गुडूप्प अंधार होता. पण इतक्यात सण्णकन विज चमकली. गडगडाटाच्या भितीने मी कान झाकून घेतले पण काहीच ऐकू आलं नाही. बाहेर पाउस कोसळत होता... कारण मातीचा पाण्याचा वास मला येत होता. पण काही ऐकू येत नव्हतं. खिडकी उघडी होती. त्यामुळे खोली खूपच थंड झाली होती. आजी नेहमी खिडकी लाऊन घ्यायची. आज कशी काय विसरली? हळूवार वार्‍यामुळे खिडकीचे पडदे हलत होते. पण बाहेरून झाडांच्या पानांचा आवाज येत नव्हता.  शांतता कधी कधी इतकी भीषण असते की आवाजासाठी कान आसुसतात. 

मी खाटेवर पालथा झोपलो होतो. डावा आत खाटेखाली घालून तिथे पाण्याचा पेला आहे का ते मी चाचपडून बघायला लागलो. हात जमीनीला लागला तेव्हा जमिन थोडी उबदार वाटली. इतक्यात मला हातावर थोड्याथोड्या वेळाने हलकेच हवेची झुळूक जाणवत होती...म्हणजे फुंकर नव्हे पण कोणाचे तरी श्वास-निःश्वास असावेत असं काहीसं. इतक्यात हातावर काहीतरी हुळहुळल्यासारखं वाटलं. आणि मी हात वर घेतला. 

खाटेखालून एक बाई हळूहळू सरकत बाहेर आली. तिचे पांढरे केस मोकळे सुटलेले होते. सावली वरून मला तर ती माझी आजीच वाटली. लहान मुलांचं मन किती वेगळ्या प्रकारे विचार करतं नै! मी तिला अजिबात घाबरलो नव्हतो. "आजी माझ्या खाटेखाली काय शोधतेय?"  हा विचार तेव्हा माझ्या डोक्यात आला होता. मी तिला हाक मारायला तोंड उघडलं.. पण तोंडातून शब्द बाहेर येईना. का माझं मलाच ऐकू येत नव्हतं? त्या बाईचा चेहरा मला काही दिसत नव्हता. चेहर्‍याच्या जागी नुसतं धुकं दिसत होतं. ती रांगत रांगत माझ्या दादाच्या खाटेपाशी गेली. तिची प्रत्येक हालचाल अगदी सहज होत होती... जणू तिचे हात पाय जमिनीला लागतच नव्हते. वार्‍यावर हलकेच उडणार्‍या पांढर्‍या चादरीसारखी. नंतर मला झोप लागली असावी कारण नंतर काय झालं ते मला आठवत नाही.

पण दुसर्‍या दिवशी दादा त्याला रात्री पडलेल्या विचित्र स्वप्नाबद्धल सांगत होता. त्याच्या स्वप्नात एक बाई जमिनीखालून बाहेर आली आणि बाहेर पावसात खेळायला निघून गेली.खेळून दमल्यानंतर परत घरात आली आणि जे कोणी झोपले असतील त्यांच्या कानाशी लागून त्यांना तिच्या खेळाबद्धल सांगत होती. दादाला ते स्वप्न पुन्हा पुन्हा पडत होतं. अगदी आम्ही आमची सुटी संपवून परत गेलो तेव्हा पर्यंत.. आजी आजोबा त्याच वर्षी एका पाठोपाठ एक असे ह्रुदयविकाराच्या झटक्याने वारले. आम्ही सुद्धा पुन्हा त्या घरी गेलो नाही. 

मानवी मन सुद्धा काय काय आठवणी जपून ठेवतं! 

(काल्पनीक)

Monday, May 2, 2011

वास्तव

सातव्यांदा राहुल आरशात डोकावला. गळ्यातली सोन्याची चेन आत टाकत, कोपर्‍यातल्या तंबोर्‍याकडे नजर टाकली. कधी नव्हे ते राहुलला आजच्या कार्यक्रमाआधी थोडी जास्त धाकधुक वाटत होती. अर्थात त्याला कारणही तसंच होतं.  मुंबईतला त्याचा हा पहिलाच कार्यक्रम  होता. काही तासांपुर्वीच थेटर हाऊसफुल्ल असल्याचं त्याला कळलं होतं. आणि जशी जशी कार्यक्रमाची वेळ जवळ येत होती तशी तशी त्याच्या मनातील हुरहूर वाढतच होती. राहुल गाण्याचे मेळावे करायला लागल्या पासून त्याची ख्याती सर्वदूर पसरली होती. लोकांना त्याचं गाणं, त्याचा आवाज खूपच आवडत होता.. इतका की लोक त्याची तुलना संगीतक्षेत्रातल्या दिग्गजांशी करायला लागले होते. राहुल आरशात बघत असतानाच दरवाजा वाजला.
“राहुल दिवेकर, दोन मिनीटं उरली आहेत.” पलिकडून आवाज आला.
“मी तयार आहे.” राहुलने उत्तर दिलं.
केसांवरून शेवटचा कंगवा फिरवून आणि कुर्ता पुन्हा एकदा नीट करून तो ड्रेसिंगरूमच्या बाहेर आला. बॅकस्टेजच्या पॅसेजमधून वाट काढत विंगेत येऊन उभा राहिला. पडदा अजून पडलेला होता. सुत्रधार राहुलची ओळख करून देत होते. बाहेर प्रेक्षागृहात सगळे प्रेक्षक एका अप्रतिम संगीत सोहळ्याच्या प्रतिक्षेत बसले होते. पडदा हळू हळू वर जात होता. आणि टाळ्यांच्या कडकडाटात  राहुल रंगमंचावर येत होता. हा त्याच्या करियरसाठी अतिशय महत्वाचा कार्यक्रम होता. राहुलने अतिशय आत्मविश्वासाने गणेशवंदनेला सुरवात केली.
*****
रात्री सगळ्यांच्या नाईट देऊन झाल्यानंतर जोगळेकरांनी राहुलच्या हातात त्याच्या मानधनाचं पाकिट ठेवलं. राहुल आपल्या ड्रेसिंगरूममधे आला. अंग सैलावत आरामखुर्चीत बसतो न बसतो तोच दारावर थाप पडली. “कोण आहे?” थोड्या त्रासिक आवाजातच राहुलने विचारलं. “मी... गजानन देशपांडे”. नाव ऐकताच ताडकन उठून राहुलने दरवाजा उघडला. त्याच्या समोर साठीचे एक गृहस्थ उभे होते. अंगात मलमली कुडता आणि पांढरं शुभ्र धोतर, पायात कोल्हापुरी वहाणा आणि एका हातात काठी. गजाननबुआ देशपांडे म्हणजे त्याचं दैवत. त्यांना पाहताक्षणीच राहुल झटकन त्यांच्या पाया पडला. “यशवंत हो” साक्षात गजाननबुआंचा आशिर्वाद. 
“बुआ तुम्ही इथे? मुंबईत?” राहुलला अजूजही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
“मी आत येऊ का?” आपल्या नेहमीच्या नम्र स्वरात बुआंनी विचारलं. त्यासरशी गडबडत जाउन राहूलने त्यांची माफी मागितली आणि दरवाज्यातून बाजूला झाला. त्यांच्या मागे दार बंद करून राहुलने त्यांना बसायला खुर्ची दिली.  बुआंचं येण्याचं प्रयोजन काय असावं याचा राहुल विचार करत होता.
“बुआ, तुम्ही स्वतः माझ्या कार्यक्रमाला आलात हाच माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे. तुम्ही स्वतः इथे माझ्या ड्रेसिंगरूममधे आहात यावर माझा विश्वासच बसत नाहिये”.
काही न बोलता बुआंनी खोलीभर नजर फिरवली. खोलीत राहुलचं ड्रेसिंग टेबल, एक दोन खुर्च्या, एक आराम खुर्ची, तंबोरा आणि इतर थोडं सामान या व्यतिरिक्त फारसं काही नव्हतं. एका रिकाम्या खुर्चीकडे बोट करून त्यांनी राहुलला बसायला सांगितलं.
“तुमचं गाणं फार चांगलं झालं आज दिवेकर.”  साक्षात गजाननबुआंच्या तोंडून स्वतःच्या गाण्याची स्तुती ऐकताना राहुलचं उर भरून आलं होतं. हे स्वप्न आहे का सत्य असं क्षणभर त्याला वाटून गेलं. 
“बुआ, तुम्ही असं बोलून माझ्या सारख्या सामान्य गवयाला फार फार मोठं करताय”


“छे छे! या सगळ्या शिष्टाचाराला आपण थोडावेळ बाजूला ठेउया. मी तुला राहुल म्हटलं तर चालेल ना ?” बुआंनी मोकळं हसत विचारलं.

“अर्थात अर्थात”  



“राहुल, तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं”
राहुलच्या मनात उगाच थोडी चलबिचल झाली. ‘म्हणजे फक्त माझं कौतुक करायला बुआ आलेले नाहीत तर’. मनातली खळबळ चेह‌र्‍यावर दाखवू न देण्याचा प्रयत्न करत राहुलने प्रश्नार्थक चेहरयाने बुआंकडे पाहिलं. क्षणभर त्याच्या डोळ्यात बघत पुढच्याच क्षणी बुआंनी नजर फिरवली. बुआ पुन्हा बोलू लागले.
“खरंतर, मी तुझ्या  कार्यक्रमाबद्धलच बोलणार आहे.... पण नेहमी सारखं नाही. मला तुला जे सांगायचं आहे ते फार महत्वाचं आहे. पण त्या आगोदर मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. खरं खरं उत्तर देशील? तू हे गाण्याचे कार्यक्रम का करतोस?”
एक दोन क्षण राहुलला याचं उत्तर काय द्यावं हेच समजत नव्हतं. काही वेळापूर्वी आपल्या गाण्याची तारिफ करणारे बुआ त्याला असा प्रश्न विचारत होते.  त्याच्यासारख्या गायकाने गाण्याचे कार्यक्रम का करावेत याचं उत्तर स्पष्टच होतं.  “गाणं हेच माझं काम आहे बुआ.”
बुआंच्या कपाळावर सूक्ष्म आठी उमटली. “नाही, गाण्याशिवाय इतर अनेक गोष्टी तू करू शकतोस की. तुझे हे कार्यक्रम हेच काही एकमेव तुझ्या उपजिवीकेचं साधन नाही. गायक एक कलाकार असतो.”
“मला तुमचं म्हणणं नीटसं समजलं नाही” मनातला राग मनात ठेवत आणि आवाज संयमीत ठेवत राहुल म्हणाला.
“माझं म्हणणं  एवढंच आहे की सगळीच माणसं दैवी गळा घेऊन जन्माला येत नाहीत. काही लोकांकडे तुझ्यासारखी दैवी देणगी नसते.”
त्यांच बोलणं मधेच तोडत राहुल म्हणाला... “म्हणजे मी मला मिळालेल्या देणगीची कदर करत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का?”
“मला म्हणायचं आहे की दैवी देणगी ही जन्माला येतानाच मिळते. आणि प्रत्येकाला ती मिळतेच असं नाही.”
राहुलने जरा त्रासूनच निःश्वास टाकला. बुआंना नक्की काय म्हणायचंय हे त्याला अजूनही कळलं नव्हतं. हे असं कोड्यात बोलून बुआंना काय साध्य करायचं आहे हेच त्याला समजत नव्हतं. उगाच आपण त्यांना काही भलतं सलतं बोलून जाऊ असं त्याला वाटू लागलं होतं.
“बुआ, कृपा करून तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला स्पष्टपणे सांगा.”
“तु गायक नाहीस राहुल. मला तुला हे सांगताना फार काही आनंद होत नाहीये.” बुआ ड्रेसिंगरूमकडे हात दाखवत म्हणाले “आणि आपण ह्या ज्या खोलीत बसलोय ती तुझी ड्रेसिंगरूमही नाहीये”.
राहुल बुआंच्या चेहर्‍यावर वेडाची झाक दिसते का ते पाहू लागला. ही माझी ड्रेसिंगरूम नाही तर मग काय आहे? हा माझा आरसा, माझी आवडती आराम खुर्ची आणि हा पांढरी चादर घातलेला छोटा पलंग … क्षणभर थबकून राहूलने पुन्हा पलंगाकडे नजर  फिरवली. “हा पलंग इथे कुठून आला? माझ्या ड्रेसिंगरूममधे असा पलंग नव्हता... ही .. ही माझी ड्रेसिंगरूम नाही. काय चालंलय काय इथं?” ओरडतच राहूल उठून उभा राहिला. पण बुआ अजुनही शांतपणे त्याच्याकडे बघत होते. त्यांनी त्याच्या पाठीमागे बोट दाखवत बुआ पुढे सांगू लागले.
“ते मला म्हणाले की तु माझा फार मोठा चाहता होतास. म्हणूनच मला त्यांनी इथं बोलावलं तुझ्याशी बोलायला. तुझी मदत करायला.”
राहुलने चकित होत पाठीमागे वळून पाहिलं. त्याची ड्रेसिंगरूमची भिंत पूर्वीसारखीच दिसत होती. गजाननबुआंच्या असंख्य फोटोंनी आणि वर्तमानपत्रांच्या कात्रणांनी भिंत भरून गेली होती. गजाननबुआंबद्धल छापून आलेली प्रत्येक बातमी इथे भिंतीवर चिकटवलेली होती. राहुलला हे सगळं इथे कधी चिकटवलं हे मात्र त्याला आठवलं नाही.
“माझी मदत करायला?” राहुलने डोकं गच्च धरून ठेवलं. डोक्यावर कोणीतरी घणाघाती आघात करताहेत असं त्याला वाटू लागलं होतं. 
“वास्तवाचा सामना करायला हवंस तू राहूल. आज १९९० हे साल चालू नाही. आणि हे मुंबईतलं नाट्यमंदिर नाही. हे ठाण्याचं हॉस्पिटल आहे. मी मघाशी म्हटलं तसं, तू गाण्याचे कार्यक्रम करणारा मोठा गायक नाहिस, तर ह्या थेटरमधे काम करणारा एक कारकून आहेस. तुझ्या घरी तुझी बायको आणि छोटी मुलगी आहे. तुझ्यावर प्रेम करणारं कुटूंब हीच तुझी देणगी आहे.” बुआंनी एका दमात सगळं सांगितलं पण शब्दा शब्दाला राहुलचं डोकं सुन्न होत होतं. 
“नाही..तुम्ही खोटं बोलताय. हे सगळं खोटं आहे.. बस्स करा. मी कोण आहे ते मला पक्कं माहित आहे.” राहुलला हे दुःस्वप्न संपायला हवं होतं.
निराशेने मान हलवत बुआ म्हणाले, “डॉ. जोगळेकर, मी जे काही करू शकत होतो ते मी केलं... माझ्याने या माणसाचे हाल नाही बघवत.”  बुआ दरवाज्याकडे चालत गेले. दरवाजा उघडताच पांढरा कोट घालून जोगळेकर आत आले.
“गजाननबुआ, तुम्ही जी काही मदत केलीत त्याबद्धल आभार. खरंतर राहुल दिवेकरांच्या वागण्यात थोडी सुधारणा होतेय आता. पण अशा केसेस मधे पेशंट बरा व्हायला किती वेळे लागेल हे कोणीच सांगू शकत नाही. कधी ना कधी ते पुन्हा वास्तवात जगतील ही आशा ठेवायची.. इतकंच आपल्या हातात आहे.”
“राहुल दिवेकर तुमचे फारच मोठे चाहते होते. तुमच्या व्यावसायिक आयुष्यातली प्रत्येक गोष्ट त्यांना माहीत आहे. मला वाटतं आयुष्यात आपणही तुमच्यासारखं मोठं गायक व्हावं ही त्यांची सुप्त ईच्छा असावी. त्यांनी गायकी शिकण्याचा प्रयत्नही खूप केला. इतकंच काय पण स्वतःचा एक कार्यक्रमही त्यांनी केला होता. त्यात त्यांनी तुमच्या गायकीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. समिक्षकांनी त्यावर भरपूर ताशेरे ओढले. नैराश्याच्या गर्तेत असताना कधितरी त्यांनी स्वतःचीच एक खोटी प्रतिमा निर्माण केली आणि स्वतः त्या खोट्या विश्वात रमायला लागले.” 
बुआ तंद्रीतच म्हणाले “मुंबई”.. “इथेच मला प्रथम मोठं यश मिळालं. माझ्या आयुष्यच्या एका महत्वाच्या वळणावरचा कार्यक्रम होता तो”
बुआंनी वळून राहुलकडे शेवटचं पाहिलं. “अच्छा राहुल, ..” पण राहुलचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं.
बुआंचा आणि जोगळेकरांचा आवाज टाळ्यांच्या कडकडाटात त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हता. राहुल त्याच्या पुढच्या कार्यक्रमासाठी स्टेजवर चालत होता. लंडन, न्युयोर्क जगात सगळीकडे त्याचे कार्यक्रम होत होते. हेच त्याच्यासाठी वास्तव होतं.

Friday, March 11, 2011

अबोला


मिटींग संपता संपत नव्हती. ऑफिसमधून घरी पोहोचायला सुधाला कमीत कमी एक तास उशीर होणार होता.  जास्त उशीर झाला तर सुहास पुन्हा अबोला धरणार. सुधाने पुन्हा एकदा हातातल्या घडाळ्यावर नजर टाकली. "ह्या मिटींग्ज वेळेत घ्यायला काय होतं ह्या अय्यरला ! ऑफिस सुटायच्या वेळेला बरोब्बर मिटींग घ्यायला सुचतं याला. शिवाय मिटींगचा उपयोग काही नाही."

"सुधा, सुधा! "

सुधाने चमकून अय्यरकडे पाहिलं.

"मी तुम्हाला डिस्टर्ब नाहि ना केलं?" अय्यर तिच्याकडे पाहून कुत्सितपणे हसून म्हणाला.

"अं! नाही सर. माझं लक्ष आहे सर." सुधा मनातला सगळा राग चेहर्‍यावर दिसू न देता चेहर्‍यावर खोटं स्मित आणून म्हणाली.

अय्यरने घसा खाकरून त्याचं बोरिंग भाषण पुढे चालू ठेवलं. सध्याची इकॉनॉमी, कंपनीचा सेल्स चार्ट, नविन क्षेत्रात घुसण्यासाठी कंपनी कसे प्रयत्न करत आहे वगैरे वगैरे.

सुधा पुन्हा सुहासचा विचार करू लागली. लग्नाला दोन अडिच वर्ष होत आली होती त्यांच्या. वरवर पाहता सगळं सुरळीतच होतं. पण गेले सहा सात महीने सुधाच्या नोकरीमधल्या जबाबदार्‍या खूप वाढल्या होत्या. अर्थात सुधाला प्रमोशन मिळवण्यासाठी जास्त काम करणं आवश्यकच होतं. मात्र सुधाला घरी यायला उशीर झाला की सुहास तिच्यावर रागवायचा. राग व्यक्त करायची त्याची नेहमीची पद्धत म्हणजे तिच्याशी अबोला धरणं. पण सुधाला त्याचा राग घालवायची ट्रिक आत्तापर्यंत माहीत झालेली होती. त्यामुळे त्याचा राग फारसा टिकत नसे. त्याच्या त्या खोट्या खोट्या रागाची आठवण झाली अन सुधाच्या चेहर्‍यावर नकळतच स्मिताची रेषा उमटली.

खुर्च्या सरकल्याचा आवाज आला आणि मिटींग संपल्याचं सुधाच्या लक्षात आलं.  पटकन उठून ती तिच्या केबिन मधे आली. पर्स खांद्याला लावली.  तिच्या इतर सहकार्‍यांना "बाय" वगैरे म्हणण्याच्या मनस्थितीत आज ती नव्हतीच. आधीच  अय्यरने डोकं खाल्लेलं होतं त्यात आणखीन कोणी थांबवू नये म्हणून कोणाशीही न बोलता तिने लिफ्ट्च्या दिशेने चटचट पावलं उचलायला सुरूवात केली. उतावीळपणे लिफ्टचं बटण दोन दोन वेळा दाबलं पण लिफ्ट काही येत नव्हती. लिफ्ट अजून आठव्या मजल्यावरच होती. त्रासून तिनं जिन्यांकडे जाणारा दरवाजा उघडला. ऑफिस तिसर्‍या मजल्यावरच होतं त्यामुळे लिफ्ट पोहोचायच्या आगोदरच आपण खाली पोहोचू असा तिचा अंदाज होता. जणू प्रत्येक सेकंद वाचवून तीचा गेलेला वेळ भरून येणार होता. जिन्यात अर्थात कोणी नव्हतं. सुधा भराभर जिने उतरायला लागली. तिने घडाळ्याकडे पटकन नजर टाकली तर घडाळ्यात आठ वाजत आले होते."म्हणजे आज दोन तास उशीर होणार आपल्याला पोहोचायला".  तिच्या मनात विचार आला. तोच पट्कन पायरी निसटून तिचा तोल गेला. नशिबाने तिने कठडा धरला आणि पडता पडता वाचली. "हील गेली वाटतं" तिनं पायातल्या सँडलकडे बघितलं. हील अजूनही शाबूत होती.

मग न थांबता ती बिल्डिंगच्या बाहेर आली. रस्त्यावर सगळीकडे माणसंच माणसं. एकमेकांकडे बघूनही न बघितल्यासारखं करणारी... गर्दीतही एकटी राहणारी माणसं. त्या गर्दीत मिसळून जाउन तिनं स्टेशन गाठलं. गाडीमधली गर्दी, भांडणांचे आवाज, विचित्र वास सगळ्याची सवय झाल्यामुळे त्याही परिस्थितीत गाडी तरी वेळेवर मिळाली याचंच तिला थोडं बरं वाटत होतं. एका हाताने वरची कडी पकडून तिनं थोडावेळ डोळे मिटले.  पुन्हा सुहासच्या विचारांत मन गुंतलं. "सुहाससारखा समजूतदार नवरा मिळणं हे माझं भाग्यच आहे खरं तर. एकदा माझं प्रमोशन पक्क झालं की कुठेतरी मस्त फिरायला जायला पाहिजे आठवडाभर."

स्टेशन आलं तसं  पुरात लोटून दिल्यासारखं तिनं स्वत:ला गर्दीत लोटून दिलं आणि प्लॅटफोर्मवर आली. भरभर जिने चढून स्टेशनच्या बाहेर पडली. आज एकही रिक्षावाला तिच्या हाकेला थांबत नव्हता. "माज आलाय सगळ्यांना" तिनं नेहमीचं वाक्य उच्चारलं आणि झरझर पावलं टाकत घर गाठलं.

रस्त्यातून नेहमी प्रमाणे घराच्या खिडकीकडे लक्ष गेलं. लाईट लागलेला होता. सुहास वाट पाहात असेल. तिनं दरवाजा हळूच उघडला. "सुहास! " तिनं हाक मारली.  अर्थात सुहास तिला ओ देईल असं तिला वाटत नव्हतंच.. त्याचं काहीच प्रत्युत्तर आलं नाहीच. स्वैपाकघरात ओट्यावर गार गार झालेला चहा तिला दिसला. सुहासने आज हॉटेलमधून खास तिच्या आवडीचं जेवण पण आणलं होतं. आता एका अपराधीपणाची भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. सुहास टिव्ही लाउन सोफ्यावर बसला होता.

सुधा त्याच्या शेजारी जाउन बसली. "सुहास ! सॉरी रे, आज त्या  अय्यरने शेवटच्या क्षणी मिटींगमध्ये बोलाऊन घेतलं... मी आज वेळेवरच येणार होते."   पण सुहासचा मूड आज खरोखरच वाईट असावा. त्याने तिच्याकडे अजिबात बघितलं नाही. उगाच घडाळ्याकडे एक कटाक्ष टाकून तो उगाच रिमोट ची बटणं दाबत राहिला.  "अरे असं काय करतोस. मला प्रमोशन मिळालं ना की आपल्या संसारालाच त्याचा उपयोग होणार आहे ना रे." तिच्या डोळ्यात चटकन पाणी उभं राहीलं. पण सुहासचं टी-व्हीवरचं लक्ष काही कमी झालं नाही.

इतक्यात फोन वाजला. सुहासने पटकन उठून फोन उचलला.

"नाही" सुहास कोणालातरी सांगत होता. "आजही उशीर ... हं.... आजकाल रोजचंच व्हायला लागलं आहे तिचं."

सुहास सुधाच्या देखत कोणा तिसर्‍याकडे तिची तक्रार करत होता... सुधाला विश्वासच वाटत नव्हता. सुहास असं करणार्‍यातला नाही. उलट दुसर्‍यांपुढे तोच आपल्याला किती सांभाळून घेतो. क्षणात त्याच्याशी बोलण्याची तिची ईच्छाच गेली. "मी थोडावेळ ग्यालरीत बसतेय" असं म्हणून ती ग्यालरीतल्या टांगलेल्या झोपाळ्यावर जाऊन बसली.

सुहास अजूनही फोनवरच बोलत होता. सुधाचं घरातलं अस्तित्वच त्याने वजा करून टाकलं होतं. थोडावेळ ग्यालरीत बसल्यानंतर मोकळ्या हवेत सुधाला थोडं बरं वाटलं. थंड हवेत किंचीत काळ तिचा डोळा लागला. जाग आली तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते. बाहेर आता थोडी थंडी पडायला लागली होती. सुधा पुन्हा घरात  आली. सुहासने ओट्यावरचं सगळं साफ करून ठेवलं होतं. टिव्ही पण बंद होता. 'बहुतेक झोपायला गेला असेल' असा विचार करून सुधा बेडरूम मधे आली. सुहास बेडवर पडला होता. पण कुठलसं पुस्तक वाचत होता. सुधा हळूच त्याच्या बाजूला येउन बसली. "सुहास, असं रे काय करतोस. बोल ना माझ्याशी" पण सुहास अजूनही अबोला धरून होता. आता मात्र सुधाला त्याचा राग येऊ लागला होता. "आज असं काय विशेष आहे ? तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे ? जरा उशीर झाला म्हणून इतकं रागवायचं ? मी काही स्वतः मजा करण्यासाठी बाहेर गेले नव्हते ना ! आणि शिवाय मी माफीपण मागितली तुझी.. यु आर टेकिंग इट टू फार" सटसट गोळ्यांसारखी तिची वाक्य निघून गेली. पण सुहासवर त्याचा काडीचाही परिणाम झाला नाही. पुन्हा एकदा घडाळ्यावर नजर टाकून त्याने दिवा मालवला आणि कूस बदलून घेतली. सुधा बेडच्या एका टोकाला डोळ्यांवर हात टाकून पडून राहीली.

रात्री कधीतरी बेलच्या आवाजाने दोघांनाही जाग आली. "मी उठते" असं सुधा म्हणेपर्यंत सुहास उठलासुद्धा होता. सुधा बाहेर आली तेव्हा सुहास दार उघडत होता.

"मी इन्स्पेटर साळवी, आपण मि. साठे का?" सुहास आणि सुधा दोघही गोंधळून गेले होते. सुहासने मान डोलावली.

"मी दोन मिनीटं आत येऊ का?" साळवी म्हणाले. सुहासने मागं होऊन दार उघडलं. सुधा जरा बावरूनच गेली होती. सुहासच्या बाजूला उभी राहून ती साळवींना म्हणाली "काय झालं इन्स्पेक्टर साहेब?"

"सौ. सुधा साठे तुमच्या पत्नी का?" साळवींनी विचारलं तसं सुधा तडक म्हणाली "अर्थात. दिसत नाही का तुम्हाला?" सुहासने होकारार्थी मान हलवली.

साळवींनी सुहासच्या खांद्यावर थोपटत म्हटलं "आज संध्याकाळी त्यांच्या ऑफिसच्या इमारतीच्या जिन्यातून पाय निसटून त्या पडल्या, डोक्याला जबरद्स्त मार बसला आणि जागच्या जागीच त्यांचा मृत्यु झाला. त्याच्या ऑफिसमधून तुमचा पत्ता मिळाला. बॉडीची ओळख पटवायला तुम्हाला यावं लागेल."

"अहो काय वाट्टेल ते काय बोलताय तुम्ही!.. अरे सुहास मी इथेच आहे रे.. ती कोणीतरी दुसरीच बाई असणार.." सुधा ओरडत होती... आणि सुहासच्या तोंडून अजूनही शब्द फुटत नव्हता.

Wednesday, February 2, 2011

तारका-पुष्प



माझं नाव डॉ. सुधा देशपांडे. मी एक वनस्पती शास्त्रज्ञ आहे. मी आज इथे हे लिहून ठेवतेय.. कदाचित कोणालातरी आमची परिस्थिती कळेल.. कदाचित त्यांना आमची दया येईल आणि आमचं दुसर्‍या कुठल्यातरी ग्रहावर पुनर्वसन करतील... अर्थात याची शाश्वती नक्कीच नाही.

सत्तावीस वर्ष झाली त्या गोष्टीला... आकाशातून पाउस पडावा तशी पुष्प-वृष्टी होउ लागली होती. सगळा फुलांचा पाउस त्यांनीच पाठवला होता. चिटुकली चंदेरी, सोनेरी रंगांची फुलं... सगळ्या जगभर त्यांची बरसात झाली होती. एकही देश एकही गाव सुटलं नव्हतं. पुष्पवृष्टी संपल्यावर 'सेटी' ला संदेश मिळाला होता..."तुमचा ग्रह खुप सुंदर आहे."  कोणालाच यातून काय अर्थ काढायचा समजत नव्हतं. नक्कि त्यांना काय म्हणायचंय हे कोणालाच कळत नव्हतं आणि त्या संदेशानंतर पुन्हा कोणताच संदेश मिळाला नव्हता. हा परग्रहावरूनच आलेला संदेश आहे हे मात्र "सेटी" च्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं होतं.

प्रथम सगळी कडे भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. जगभरातले राजकीय आणि धार्मिक नेते संभ्रमीत झालेले होते. त्यांनाही हे प्रकरण दाबून टाकणं अवघड झालेलं होतं... कारण ज्या दिवशी "सेटी" ला संदेश मिळाला त्याच दिवशी जगभरातल्या प्रत्येक घरातल्या टीव्ही वरून सुद्धा हा संदेश दिसू लागला होता... जगातल्या प्रत्येक भाषेमधून तो संदेश टिव्ही च्या पडद्यावरून दिवसभर दिसत होता. आमच्या सुंदर ग्रहाची त्यांना जणू काही आम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायची होती. लोकांना वाटलं की ती फुलं म्हणजे त्यांनी आमच्यासाठी पाठवलेलं गिफ्ट आहे! अर्थात जेव्हा सत्य परिस्थिती समजली तेव्हा आम्ही सगळेच अवाक झालो होतो. दिसतं तसं नसतं हेच खरं!

कित्येक महिने आम्हाला त्या फुलांचं प्रयोजन काही कळलं नाही. सगळे परग्रहावरून आलेल्या त्या संदेशामुळे थोडे गोंधळलेलेही होते... त्यामुळे त्या फुलांवर.. आम्ही त्याला 'तारका-पुष्प' हे नाव दिलं होतं... प्रयोग करायला कोणाला फारसा वेळ मिळाला नव्हता. आम्हा सगळ्यांना तो संदेश दिसत होता.. पण अजूनही खुद्द ते परग्रहवासी पृथ्वीवर उतरले नव्हते. सगळ्यांना वाटलं ते खूप खूप प्रकाशवर्ष दूर असावेत. आमची समजूत किती चुकीची होती !

"डॉ. देशपांडे, तुम्ही तारकापुष्पांवर केलेल्या प्रयोगांचे निष्कर्श पाहिलेत का?" संजयने विचारलं. संजय माझा विद्यार्थी होता. "नाही अजून पाहिले नाहित. तुला काही इंटरेस्टींग निष्कर्श मिळालेत का?" मी विचारलं.

"होय! मला वाटतं, ही तारकापुष्प फक्त फुलं नाहियेत... बघा ना.. इतके दिवस झाले तरी एकही फुल सुरकुतलेलं नाहीये.. आणी...."  त्याने थोडं थांबून म्हंटलं.."मला वाटतं की त्या फुलांमध्ये परागकण पण आहेत... जर परग्रहावरच्या वृक्ष-वनस्पती पृथ्वीवर वाढू लागल्या तर...." संजयने वाक्य पूर्ण केलं नाही.."होय संजय, तसं झालं तर काय होईल याचा फार खोलवर विचार करावा लागेल".. चेहर्‍यावरची काळजी लपवत मी म्हटलं.

संजयची भीती खरी ठरली. पहिल्या वर्षातच जगभरातून तारका-पुष्पांनी जाळं पसरवलं. फुललेल्या तारका-पुष्पांना एक सुखद आणि मादक असा सुगंध येत असे. काही दिवसांनंतर आणखीन एक विचित्र निरिक्षण आम्ही केलं.. कित्येक लोकांना त्या तारका-पुष्पांच्या ताटव्यात तासन् तास बसायला .. त्या मादक सुगंधात डुंबून जायला आवडत असे. त्या फुलांच्या वासामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचं अपायकारक रसायन मिळालं नाही त्यामुळे त्या विरुद्ध तक्रार करायला जागाच नव्हती. सुगंधच नव्हे तर तारका-पुष्प दिसायलाही फार आकर्षक होती. जवळ जवळ प्रत्येक रंगात उपलब्ध होती. कधी कधी तर ऋतूमानाप्रमाणे रंगसुद्धा बदलायची.  तारकापुष्प फुलल्यावर एका झुळूकेसोबत त्याचे परागकण सगळीकडे उधळायचे आणि तारका पुष्पांचे ताटवे पसरत होते. गंमत म्हणजे कुठल्याही प्रकारच्या माती मध्ये तारका-पुष्प खुशाल वाढत होती. पाणी असो वा नसो, तापमान थंड असो वा गरम... त्या मुळेच थंड बर्फाळ प्रदेशांपासून वैराण वाळवंटांपर्यंत कुठेही तारकापुष्प दिसून येत होती.  

आमचा तारका-पुष्पांचा अभ्यास चालू असतानाच एक बातमी कानावर आली. जगभरातील जननप्रमाण   अतिशय घटत चाललं होतं... मी ती बातमी वाचायला लागले. "ज्या भूभागांमध्ये तारका-पुष्पांचं प्रमाण जास्त आहे तेथिल जननप्रमाण सर्वात कमी असल्याचं निदर्शनास आलं आहे. परंतू तारका-पुष्पांचा आणि जननप्रमाण कमी होण्याचा थेट संबंध असल्याचं अजून तरी खात्रीलायक रित्या म्हणता येणार नाही."  ह्या बातमीदाराने नेहमीप्रमाणे कशातूनही कसलाही निष्कर्श काढला आहे असंच मला वाटलं. खरं खोटं समजायला फार वेळ लागणार नाही.

"डॉ. देशपांडे, आज तारका-पुष्पांवर प्रसिद्ध झालेला निबंध वाचलात का?" संजयने काळजीच्या सुरात विचारलं.तारका-पुष्पांचं पृथ्वीवर आगमन होऊन तीन वर्ष झाली होती.

"होय, आणि मी सुद्धा त्याचाच विचार करतेय सकाळ पासून. तारका-पुष्पांपासून निघणार्‍या परागकणांचा मानवी पुनरुत्पादनक्षमतेवर परिणाम होत होता.... ह्याच कारणासाठी तारका-पुष्प पृथ्वीवर पाठवली तर नसतील? आत्तापर्यंत जवळजवळ प्रत्येक जण तारका-पुष्पांच्या संपर्कात आला आहे. आणि नुसतं जननप्रमाण घटतंय एवढच नाही तर भ्रूणमृत्यूंचं प्रमाणही वाढलं आहे. नॉर्वे मध्ये गेल्या चार महिन्यात एकही जन्म नोंदवला गेला नाहि."

शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रयोगांअंती तारका-पुष्पांच्या परागकणांचा मानवी जननक्षमतेवर होणारा परिणाम घातक असल्याचा निर्वाळा दिला. मग जगभरातून ह्या तारकापुष्पांना नष्ट करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर हालचाली घडू लागल्या. पण नाजूक दिसत असूनही तारकापुष्पांना नष्ट करणं फार अवघड आहे हे लवकरच समजून आलं. शिवाय आता कुठल्याही उपाययोजनेला फार उशिर झाला होता. आम्ही सगळेच त्या परागकणांच्या संपर्कात आलो होतो. गेली कित्येक वर्ष आमच्या श्वासातून ते परागकण आमच्या शरिरात शिरले आहेत.

आणि मग एके दिवशी "सेटि" आणि आम्हा सगळ्यांनाच आणखी एक संदेश मिळाला.

"तुमचा ग्रह खुप सुंदर आहे.
पण त्याची काळजी घेण्यात तुम्ही कमी पडला आहात.
पृथ्वीसारखा ग्रह सापडणं ह्या विश्वात खरोखरच खुप दुर्मिळ आहेत.
म्हणूनच ह्या ग्रहाला तुमच्यापेक्षा जास्त जबाबदार जमातीसाठी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तुम्हा मानवांसारखे आम्ही क्रूर नाही.
म्हणूनच तुमची जनन-क्षमता हळूहळू कमी करणे हा मानवजात नामक रोगाचं निर्मूलन करत आहोत. 
हा एखादी जमात संपवण्याचा सर्वात सोपा आणि कमीत कमी यातना देणारा उपाय आहे.
तुमच्या ग्रहावरच्या कालमापन पद्धतीप्रमाणे एकशे पन्नास वर्षांनी आम्ही परत येऊ.
तोवर तुमची जमात संपुष्टात आली असेल.
आणि, तुम्ही तुमच्याच एका यानामधून पाठवलेल्या तुमच्या ग्रहाच्या नकाशाबद्धल धन्यवाद."

कित्येक वर्षांपूर्वी व्हॉयेजर यानातून पृथ्वीबद्धलची माहीती आणि पृथ्वीवरिल सगळ्या भाषांमधून रेकॉर्ड केलेला संदेश सूर्यमालेच्या बाहेर पाठवण्यात आला होता. त्याचाच वापर करून त्यांनी आम्हाला शोधून काढलं होतं. आज २०४६ साल चालू आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच गेल्या दोन दशकांमधे  जगात कुठेच एकही बाळ जन्माला आलेलं नाही. तारका-पुष्पांच्या परागकणांवर मात करणार औषध शोधून काढणं आजवर जमलेलं नाही. जगातील सरासरी आयुर्मान आता ५५ झालेलं आहे.  म्हातारं होऊन मरणाची वाट बघण्याखेरिज आमच्या हातात काही उरलेलं नाही.

(समाप्त)

Wednesday, January 19, 2011

मनाचे खेळ (भाग ३)

या पूर्वी:


भाग १

भाग २
अंगावर सरसरून  काटा आला. सगळ्या भावना बाजूला सारून मनात फक्त भीती व्यापून राहिली. मी दरवाज्याची कडी घट्ट धरून ठेवली... "वाचवा! वाचवा! कोणी आहे का ?" वेड्यासारखा जोरजोरात ओरडायला लागलो..... दरवाज्यावर भिंतींवर जोरजोरात हात पाय आपटून आवाज करत होतो.. कोणीतरी माझ्या मदतीला येइल...  शुद्ध कधी हरपली हे मला समजलं नाही..


शुक्रवार  
म्हणजे मला वाटतंय की आज शुक्रवार आहे. परवा शुद्धीवर आल्यानंतर मी घराताली विजेवर चालणारी प्रत्येक वस्तू तोडून फोडून टाकली आहे. फक्त हा टेबलावरचा दिवा तेवढा शिल्लक आहे. कॉम्पुटर फोन वेब-कॅम सगळंच. जी कुठली वस्तू कोणीतरी बाहेरून माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी वापर करता येऊ शकेल अश्या सगळ्या वस्तूंचा मी पार भुगा करून टाकला. मी स्वतः कॉलेज मधे कॉम्प्युटर इंजिनीयरिंग करतोय, त्यामुळे मला माहित आहे.. मी माझ्याबद्धलची माहीती दिल्याशिवाय .. म्हणजे माझं नाव, फोन नंबर, पत्ता... कोणतीच माहिती बाहेरून मला आली नव्हती. मी आत्तापर्यंत लिहिलेल्या डायरीची पानं सारखी चाळून बघतोय .. विचार कर करून डोकं खूप दुखायला लागलं आहे. क्षणात ती अज्ञात अनामिक भीती तर क्षणात स्वतःच्या ह्या वेडेपणाबद्धल चीड अशा दोन परस्पर विरोधी विचारांमधे गुंतत चाललो आहे.  कधीकधी तर माझी अगदी खात्रीच होते की कोणीतरी मला घराबाहेर काढण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो आहे. अगदी अनिताचा पहिला फोन आला तेव्हापासून... ती मला बाहेर येण्यासाठीच सुचवतेय. परवा इथे आली तेव्हापण दार उघडून बाहेर घेउन जाण्यासाठीच आली होती.
मी मनात पुन्हा पुन्हा झाल्या प्रसंगाची क्रमवारी लावण्याचा प्रयत्न करतो आहे. एखाद वेळी वाटतं, की मला पार वेड लागलं आहे. कारण कधी कधी असं होतं ना की रस्त्यांवर कोणी माणसं दिसत नाहीत... तुम्हाला हवं तेव्हा चॅटवर कोणी गप्पा मारायला नसतं... .. अगदी अचानकच कोणतारी वायरस तुम्हाला जंक ईमेल पाठवतो..   नक्कीच होऊ शकतं. पण लगेच दुसर्‍या क्षणाला असं वाटतं की हे असं होण्याची शक्यता किती असेल? लाखात एकदा.. आणि कदाचीत यामुळेच "त्यांना" मी अजून सापडलो नसेन. मी ह्या बिल्डिंगच्या गेटबाहेर अजून पडलेलो नाही. मी माझ्या खोलीची खिडकीसुद्धा पूर्ण उघडू शकत नाही. आणि परवा तो कॅमेरा बाहेर ठेवल्या ह्या खोलीच्याही बाहेर मी पडलेलो नाही. जर मी प्रथम अनिताला फोन केला नसता तर...."ते" जे कोणी असतील त्यांना मी इथे आहे हे कळलं ही नसतं ! तो फोन जो लागला नाही.. उलट "त्यांनीच" मला फोन करून माझं नाव विचारून घेतलं.
प्रत्येक वेळी जेव्हा मी ह्या घटनाक्रमाचा विचार करतो तेव्हा तेव्हा त्या अनामिकाच्या भीतीने अंग गारठून जातं. ते छोटं.. असंबद्धपणे लिहिलेलं ईमेल.. कोणाकडून होतं ते? कोणीतरी इतरांना सावध करण्यासाठी पाठवलं होतं का? "ते" येण्याआगोदर मला सावध करण्यासाठी मित्रत्वाचा सल्ला म्हणून ?? "स्वतःच्या डोळ्यांनी ....... त्यांच्यावर विश्वास ठेऊ नको... ते.. .." .. अगदी मला ज्या गोष्टीची भीती वाटतेय तेच शब्द ! "ते" कुठल्यातरी पद्धतीने काँप्युटर, मोबाईल फोन हॅक करून माझी माहिती गोळा करत आहेत.. आणि त्याचा उपयोग करून आणि माझ्या मित्र्-मैत्रीणींचे आवाज काढून मला बाहेर बोलावताहेत.
पण... "ते" घरात का घुसत नाहीत ? म्हणजे जर त्यांनी काल अनिताच्या रूपात येऊन दरवाजा वाजवला याचा अर्थ ती भुतांसारखे बंद दरवाज्यामधून आरपार जाऊ शकत नाहीत. ह्या बिल्डींगमधल्या खोल्यांचे दरवाजेपण मजबूत आहेत. मी स्वतः प्रयत्न केला तरी एकट्याने दरवाजा तोडू शकत नाही. बिल्डिंग जुनी असल्याचा फायदा. पण ह्या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की त्यांना माझ्याकडून काय हवंय? जर मला ठार मारायचं असेल तर कितीतरी इतर मार्ग आहेत.. अगदी सोप्पा उपाय म्हणजे भुकेने तडफडून मारणं. गेले काही दिवस मी फ्रिजमधलं उरलं सुरलं अन्न खाउन जगतोय.. पण कधितरी ते संपेलच. म्हणजे मला बाहेर काढून ते मारणार नसावेत.. मग का ? मृत्युपेक्षाही भयंकर असं काय आहे  त्यांच्या मनात? देवा! मी या नरकातून बाहेर कसा पडू??
दरवाज्यात कोणीतरी आहे वाटतं ! होय.. दरवाजा कोणीतरी वाजवतोय!
****
"मला विचार करायला एक दोन मिनिटं द्या ! मग मी बाहेर येतो" मी बाहेरच्या लोकांना सांगितलं. मी आता हे इथे लिहून फक्त यासाठी ठेवतोय की जेणेंकरून माझे विचार भरकटणार नाहीत. बाहेरून कोणाच्यातरी बोलण्याचा आवाज येतोय ! पण माझं वेड  मला स्वस्थ बसू देत नाहिये.  हो, मला समजतंय की माझे विचार एखाद्या मनोरुग्णासारखेच आहेत. पण त्यांना माझ्यापर्यंत पोहोचायला तीन दिवस लागले? तीन दिवस "ते" काय करत होते?? बाहेर अनिताचा आवाज पण येतोय. आणखी काही माणसं आहेत. दोन पोलीस आणि एक डॉक्टर... कदाचीत ह्या तीन दिवसांमधे माझ्या "शंकांची" उत्तरं "ते" तयार करत असावेत.. .डॉक्टर तरी त्यातल्या त्यात जास्त समजूतदारपणे बोलतोय. म्हणजे जर मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर त्याच्या बोलण्यातून माझ्या सर्व शंकांचं नीट निराकरण होऊ शकतंय.... जर मी विश्वास ठेवला तर...
डॉक्टर साठीच्या आसपासचा असावा... त्याच्या स्वरात जरब आणि समजूतदारपणाचं मिश्रण आहे. त्याचा आवाज मला आवडला... अगदी माझ्या बाबांसारखाच आहे त्याचा आवाज. मी माझ्या डोळ्यांनी कोणालातरी बघायला अगदी उत्सुक झालोय. त्याच्या मते मला सायबर-सायकोसिस.. म्हणजे आंतरजालिय्-मनोविकार (?)  झाला आहे.  त्याची साथच पसरलेय म्हणे जगभरात. लाख्खो लोक त्यामुळे आत्महत्या करत आहेत. हे सगळं एका ईमेल मुळे झालं जे "कसंतरी निसटलं"... आई-शप्पथ त्याने हेच शब्द उच्चारले... "कसंतरी निसटलं"... मला वाटतं की त्याला म्हणायचं होतं की ते एक स्पॅम मेल होतं.. पण माझ्या मनात शंकेचं भूत पुन्हा किंचाळू लागलं. नक्कीच "त्यां"च्या तोंडून खरं काय ते बाहेर पडलं होतं. तो डॉक्टर सांगत होता की... माझं हे वागणं हे ह्या रोगाची लागण झालेल्या इतर लोकांसारखंच आहे. एकटेपणामुळे  वाटणारी पराकोटीची भीती...  आणि त्यातून मग मनाचे खेळ सुरू होणे...सगळं फक्त इतर लोकांशी डायरेक्ट संपर्क न ठेवल्यामुळे. सगळी लक्षणं मला लागू पडत होती.  ह्या रोगाची लागण सुद्धा अशीच होते.. एखादा रुग्ण वेडाच्या भरात इतर लोकांना ईमेल किंवा फोनवरून इतर लोकांना संदेश पाठवतो. संदेश मिळणार्‍याने त्याचा विचार करायला सुरूवात केली की त्यालाही याची लागण होते.
त्याच्या बोलण्यातून त्या विचित्र ईमेलचं कारण मला समजलं. तसंच मी माझ्या फोनवरून सगळ्यांना पाठवलेला तो संदेशही आठवला. "गेल्या काही दिवसांत तुम्ही कोणाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय का ?"... म्हणजे या रोगाचा प्रसार मी सुद्धा नकळत केला होता. कदाचीत माझा संदेश वाचून आत्ता या झणी कोणितरी या भीतीला बळी पडत असेल. कारण त्या संदेशाचा अर्थ कोणीही कसाही लाउ शकेल.
डॉक्टर मला समजावत होते.. म्हणाले "तुझ्यासारखी एकलकोंडी मुलं या रोगाच्या जाळ्यात सहजच अडकतात.  शिवाय आजकालच्या जमान्यात माणसं एकमेकांना प्रत्यक्ष भेटतही नाहीत. त्यामुळे या रोगाचा प्रसार फार झपाट्याने वाढला आहे. 'मला आणखी एकाला गमवायचं नाहिये' !   "
एक मात्र मानलं पाहिजे.. त्याचं स्पष्टीकरण खरोखरच चांगलं होतं. माझ्या जवळ जवळ प्रत्येक शंकेचं उत्तर त्यानं दिलं होतं. अगदी योग्यप्रकारे..... मी दार बंद करून आत बसून राहण्यासाठी.. माझ्याच भीतीच्या आणि शंकांच्या जाळ्यात आणखी गुरफटण्यासाठी खरं म्हणजे आता कोणतंच कारण नव्हतं. बाहेर मला पकडून मरणापेक्षाही भयंकर अशी शिक्षा देण्यासाठी कोणी नाहिये! काही वेळापूर्वी या जगात आता मीच एक ह्या बंद खोलीत सुरक्षित उरलो आहे आणि कोणीतरी अनामिक शक्ती मला मृत्युपेक्षाही भयंकर नरकयातना देण्यासाठी मला ह्या सुरक्षित जागेतून बाहेर काढायला बघते आहे असं मला वाटत होतं. आता डॉक्टर मला दरवाजा उघडायला सांगताहेत... त्यांनी माझ्याबाबतीत घडलेल्या सगळ्या प्रसंगांच बरोब्बर उत्तर दिलं आहे.. त्यांची उत्तरं.. त्यांचं स्पष्टीकरण इतकं सडेतोड.. इतकं पर्फेक्ट ... अगदी ठरवल्यासारखं...
नेमक्या याच कारणासाठी मी आता दरवाजा मुळीच उघडणार नाही.
माझी खात्री कशामुळे पटेल? खरं काय आणि भ्रम कोणते हे मला कशामुळे समजेल? ह्या सगळ्या वायर्स, आणि नेटवर्क सिग्नल... ही आंतरजाल.. कुठून सुरू होतं?? हे काही खरं जग नाही.. आभासी आहे.. आणि असे आभास निर्माण करणं काहिच अवघड नाही... ईमेल , फोन वेब्-कॅम सगळं काही हॅक होउ शकतं... ईमेल, फोनवर ऐकू येणारा आवाज .. विडोयो चॅटवरचं दिसणं हे ही बनावट असू शकतं ! हे तर फक्त विजेचे तरंग आहेत .. त्यावर नियंत्रण मिळवणं फारसं अवघड नाहिये "त्यांना".
दारावर आता "ते" धडका मारताहेत.. "ते" थोड्याच वेळात दरवाजा तोडून आत येतील. आले तर बरंच आहे.. मी माझ्या डोळ्यांनी त्यांना पाहिन तरी... डोळ्यांनी... "स्वतःच्या डोळ्यांनी ....... त्यांच्यावर विश्वास ठेऊ नको... ते.. " .. एक मिनिट.. तो ईमेल मला माझ्या स्वत:च्या डोळ्यांवरही विश्वास ठेउ नको असं तर सांगत नव्हता ?? शेवटी डोळ्यांना दिसणारं चित्र म्हणजेसुद्धा मेंदुत उमटणारे एक प्रकारे विजेचे तरंगच नाही का? ... हो नक्कीच.. नाही .. "ते" मला असे फसवू शकणार नाहीत... मला खात्री केली पाहिजे.. डोळ्यांशिवाय....
तारिख / वार माहित नाही
मी रोज एक पेन आणि पेपर मागत होतो.. आज शेवटी मला मिळालं. अर्थात आता त्याने काही फरक पडणार आहे असं नाही. मी काय करू शकणार आहे?.. कोणाला सावध करणार आहे? डोळ्यांना लावलेली बँडेजेस आता माझ्या शरिराचा भागच झाली आहेत. पूर्वी होणार्‍या यातना आता जाणवेनाशा झाल्या आहेत. मला वाटतं की माझं हे शेवटचंच लिखाण असेल.. कालांतराने हाताला योग्य वळण राहणार नाही. मग मी लिहिलं तरी ते वाचता येईलच याची शाश्वती नाही. हे लिखाण म्हणजे.. आता. स्वतःला रमवण्यासाठीच करतोय. आणि हे माझं लिखाण या जगातलं शेवटचंच लिखाण असेल.. कारण या जगातील सगळी लोकं आधीच मेलेली आहेत. मेलेली...? किंवा त्यापेक्षाही वाईट ... ?
मी ह्या हॉस्पिटलच्या खोलीत एकटाच बसलोय.. खोलीला आतून मऊ असं पॅड लावलाय.. मी डोकं आपटून आत्महत्या करू नये म्हणून. "ते" मला खायला प्यायला आणून देतात. कधी कधी चांगल्या नर्सचं रूप घेऊन.. तर कधी म्हातार्‍या डॉक्टरचं रूप घेऊन.   त्यांना कदाचीत माहितेय की डोळे गेल्या पासून माझे कान भलतेच तल्लख झालेत.. म्हणून मग ते कधी कधी दरवाज्याबाहेर उभं राहून इतर विषयांवर एकमेकांत बोलतात.. काही डॉक्टर आणि नर्स घरच्या खाजगी गप्पा सुद्धा मारत असतात. ..... .कोण्या एका नर्सला दिवस गेलेत... एका डॉक्टरच्या बायकोचं बाहेर कुठेतरी लफडं आहे.... सगळं खोटं खोटं.. मला फसवण्यासाठी..ह्या सगळ्या बोलण्याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही..
पण मला जास्त त्रास होतो तो वेगळ्याच गोष्टीचा. ते अनिताचं रूप घेऊन येतात. हे रूप अगदी खरं वाटावं असंच आहे. आवाज अगदी अनिता सारखा... अगदी तिच्या आवडीचं सेंटही असतं.. स्पर्शसुद्धा तिच्यासारखाच जाणवतो. माझी खात्री पटावी म्हणून खोटे खोटे अश्रु डोळ्यात आणून ते बोलतात. जेव्हा त्यांनी मला इथे पहिल्यांदा आणलं तेव्हा ती म्हणत होती.. "संदिप! माझ्या राजा! अरे असं काय करतोस.. माझ्यावर विश्वास नाही का तुझा? माझं तुझ्यावर प्रेम आहे.... तु असं का वागलास? अजूनही मी तुझ्याशी लग्न करून तुझी काळजी घेईन! " .अजून बरंच काही.. . .ती खरोखरच अनिता आहे हेच त्यांना माझ्या मनावर ठसवायचं होतं. त्यांनी माझी खात्री पटवायचा आटापिटा केला.
इथे आल्यानंतरही मला बर्‍याचदा वाटलं की मी तरी इतकं निष्ठुरपणे कशाला वागतोय? अनिता.. जिच्यावर माझंपण प्रेम आहे तिच्यावर विश्वास मी का ठेऊ नये? पण ते सगळं अगदी बिनचूक, चपखल बसणारं ...टू पर्फेक्ट.. म्हणूनच ते खरं नव्हतं.. ते अनिताचं रूप घेउन दररोज येत होते. मग दोन तीन दिवसांनी एकदा.. मग काही आठवड्यांनी.. आणि मग शेवटी त्यांनी येणं बंद केलं. पण मला नाही वाटत "ते" इतक्या सहजा-सहजी हार मानतील. मला वाटतं त्यांचं हे वाट पहाणं सुद्धा त्यांचीच एक चाल आहे. मी जिवात जीव असे पर्यंत त्यांना शरण जाणार नाही. मला बाकिच्यांचं काय झालंय ते माहित नाही, पण माझी खात्री आहे की मी स्वतःहून त्यांना शरण आल्याशिवाय ते माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. जर असं असेल तर.. कदाचित.. मी त्यांच्या वाटेतला अडसरच असेन.. म्हणूनच ते माझ्या शरणागतीसाठी इतक्या युक्त्या काढत आहेत. कदाचीत अनिता अजूनही जिवंत असेल.. आणि कदाचीत माझ्यावर ताबा मिळवण्यासाठीम्हणून तिला जिवंत ठेवलं असेल... नाही.. मी कधीच हार मानणार नाही.. मरेपर्यंत नाही.
========================
डॉक्टरांनी संदिपने लिहिलेले पेपर हातात घेतले.. त्यावरची वेडीवाकडी अक्षरं  जेमतेम  वाचता येत होती...दिसत नसतानाही संदिपने इतकं लिहिलं होतं. डॉक्टरांच्या डोळयात अभिमानाची झाक दिसत होती. संदिपच्या कणखर वृत्तीचं.. ... एकाकीपणाने झुंज देण्याच्या विश्वासाचं  त्यांना खूप कौतूकच करावंसं वाटत होतं..अर्थात त्यांना माहित होतं की त्याचं वेड आता आटोक्यात येणं शक्य नव्हतं
कोणत्याही शहाण्या माणसात इतका कणखरपणा.. स्वतःवर इतका विश्वास कुठला असायला ?
  
डॉक्टरांना आनंद झाला होता... त्यांना संदिपच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायची होती. त्यांना जोराने ओरडून "त्यांना" सांगायचं होतं.. "तुम्ही हरलात!" ...
इतक्यात त्यांच्या डोक्यात बसवलेल्या चकतीमधून झिणझीण्या आल्या आणि एक तीव्र वेदना त्यांच्या चेहर्‍यावर उमटली.. एखाद्या कळसूत्री बाहूलीप्रमाणे पावले टाकत ते संदिपच्या खोलीत शिरले.. आणि त्याला हे सगळे त्याचा मनाचेच खेळ आहेत हे समजावून सांगू लागले.
(समाप्त)